जयंत पवार: नाटकांचे प्रयोग बंद पाडल्यावरून वाद – ‘डावं आणि मुसलमान असण्यात काय गैर आहे?’

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी

महाराष्ट्राच्या नाट्यवर्तुळात सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या एका पत्राची चर्चा आहे. हे पत्र 'साहित्य अकादमी पुरस्कार'प्राप्त नाटककार जयंत पवार यांनी लिहिलं आहे. गेल्या महिन्याभरात दोन नाटकांशी संबंधित घडलेल्या घटनांबद्दल त्यांनी लिहिलं आहे.

'तथागत' आणि 'रोमिओ, रविदास और ज्युलिएट देवी' या नाटकाच्या प्रयोगादरम्यान अनुक्रमे मुंबई आणि पुणे इथे घडलेल्या पोलीस चौकशीचे प्रसंग सांगत त्यांनी नाट्यकर्मी आणि नाट्यप्रेमी यांना तुम्ही या घटनांचा निषेध कराल का, असा प्रश्न विचारला आहे.

दिल्लीस्थित 'जन नाट्य मंच' या नाट्यसंस्थेनं बसवलेल्या 'तथागत' या नाटकाचे मुंबईत 9 ते 11 ऑगस्टदरम्यान आठ प्रयोग होते. यातल्या दोन प्रयोगांदरम्यान पोलिसांनी येऊन आयोजकांची, नाटक करणाऱ्यांची चौकशी केली आणि नाटक बघायला आलेल्यांचेही फोटो काढले, असं जयंत पवारांनी आपल्या या पत्रात म्हटलं आहे.

"11ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजता अंधेरीच्या हरकत स्टुडिओ या छोट्या नाट्यगृहात असलेल्या प्रयोगाच्या आधी वर्सोवा पोलीस स्टेशनचे दोन सीआयडी नाट्यगृहात आले. त्यांनी नाटकाच्या सेटचे फोटो काढले. त्यानंतर जन नाट्य मंच ग्रुपचे प्रमुख सुधन्वा देशपांडे यांची चौकशी केली. नाटकाच्या स्वरूपाबाबत चौकशी केली. त्यानंतर हरकत स्टुडिओच्या मॅनेजरकडे यांना प्रयोगाला परवानगी कशी दिली, अशी विचारणा करत चौकशी केली.

"त्यानंतर हे पोलीस इमारतीच्या बाहेर गेले आणि तिथे प्रयोग बघण्यासाठी आलेल्या लोकांचेही त्यांनी फोटो काढले. पुढे नाटकाचा प्रयोग सुरू झाल्यावर 5 ते 7 मिनिटांनी हे दोन्ही पोलीस नाट्यगृहात घुसले आणि रंगमंचपासून चार ते पाच फुटांवर असलेल्या प्रवेशद्वारात उभे राहिले. तिथून त्यांनी प्रयोग पाहिला. नंतर काहीच झालं नाही. ते निघून गेले," पवार म्हणतात.

'प्रेक्षकांचे फोटो ही काढले'

मुंबईच्या 'लोकसांस्कृतिक मंच'ने यापैकी चार प्रयोग आयोजित केले होते. त्याचे आयोजक असणाऱ्या सुबोध मोरे यांनीही अशी घटना घडल्याचे सांगितले.

"10 तारखेला जेव्हा आंबेडकर भवनात दादरला कार्यक्रम होता तेव्हाही दोन साध्या वेशातले पोलीस आले आणि त्यांनी माझ्याकडे चौकशी केली. इथे लाल झेंडे का लावले आहेत असे प्रश्नही मला विचारले. पण दुसऱ्या दिवशी हरकत स्टुडिओमध्ये झालेल्या प्रयोगाला दोघे जण शेवटपर्यंत थांबून होते. नाटकाच्या सेटचे, आलेल्या प्रेक्षकांचे फोटो त्यांनी काढले. हे सगळं ते का करताहेत हे मात्र सांगितलं नाही. हे नाटक गौतम बुद्धांच्या काळाविषयी आणि 'राष्ट्र' या संकल्पनेचे त्या काळातले दूरचे संदर्भ आहेत. त्यात काही आक्षेप घेण्यासारखं नाही. तरीही त्यांनी असं का करावं?" सुबोध मोरे म्हणाले.

जयंत पवार त्यांच्या पत्रात उल्लेख करतात ती दुसरी घटना पुण्यात चिंचवड इथे घडली. 'रोमिओ रविदास और ज्युलिएट देवी'या नाटकाचा प्रयोग 14 ऑगस्टला पुणे विद्यापीठात 'ललित कला केंद्रा'त झाल्यावर जेव्हा या नाटकाचा प्रयोग 15 ऑक्टोबरला पुण्यात 'एफटीआयआय' इथं होणार होता.

हे नाटक मुंबई 'किस्सा कोठी' नावाची संस्था करते. पण या संस्थेच्या शर्मिष्ठा साहा यांनी लिहिलेल्या फेसबुक पोस्टनुसार त्यांना 'एफटीआयआय'च्या आयोजक असणा-या विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आलं की नाटकाचा प्रयोग महिन्याभराकरता पुढे ढकलावा लागेल. 'एफटीआयआय' प्रशासन परवानगी देत नाही आहे असं त्यांना सांगण्यात आलं. त्यामुळे अचानक त्यांनी चिंचवड इथे हॉटेल मुक्कामासाठी निवडलं आणि नाटकाची टीम तिथं गेली.

वॉरंटशिवाय तपासणी?

त्या रात्री काय घडलं याविषयी साहा त्यांच्या पोस्टमध्ये लिहितात. "आम्ही पाच जण होतो. प्रियांका चरण, दिलीप कुमार पांडे, यश खान, अमित कुमार सिंग आणि मी. पुरुष एका खोलीत थांबले, मी आणि प्रियांका एक खोलीत. रात्री अडीचच्या सुमारास पुरुषांच्या खोलीचं दार वाजलं. यशनं दार उघडलं. दारात एक पोलीस आणि हॉटेलचे दोघे जण होते.

पोलिसानं विचारलं, "यश खान कोण आहे?" यशनं उत्तर दिलं. पोलिसांनी आत येऊन इतर सा-यांना उठवलं. त्यांना विचारलं की ते यशला कसे ओळखतात आणि ते पुण्यात का आलेत? त्यांनी सगळं सामान पाहिलं, ट्रंकमधली नाटकाची प्रॉपर्टी पाहिली. यशशी ते अत्यंत उद्धटपणे वागले. हे सगळं ते कोणत्याही वॉरंटशिवाय करत होते. मग ते गेले." सकाळी साहा यांनी त्यांच्या वकिलाशी याबाबतीत बोलणी केली आणि त्यांच्यासोबत काय झालं हे फेसबुक पोस्टमध्ये मांडलं.

जयंत पवार या घटनेविषयी त्यांच्या पत्रात लिहितात," 15 ऑगस्ट्च्या सुरक्षेसाठी ही तपासणी आहे, असं त्यांनी नंतर सांगितल्याचं कळतं. पण तसं असेल तर संपूर्ण हॉटेलची किंवा इतर खोल्यांची झडती वा अन्य माणसांची चौकशी झालेली नाही. म्हणजे यश खान नावाच्या एका तरुणाकडूनच धोका असल्याची खबर पोलिसांना मिळाली असावी. ती कोणी दिली व त्यातून काय निष्पन्न झालं, या प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत, मात्र नाटकाचे बॅक्स्टेज सांभाळणा-या यश खान या एका साध्या तरुणाच्या मनात आणि त्याच्या कुटुंबात कायमची दहशत मात्र निर्माण झाली. या दोन्ही घटना नाट्यकर्मींमध्ये प्रत्यक्ष दहशत निर्माण करणा-या आहेत, असं मला वाटतं आणि त्या एका सरकारी यंत्रणेकडून घडवल्या गेलेल्या आहेत."

पुण्याच्या काही रंगकर्मींना हा प्रकार समजल्यावर त्यांनी मदतीसाठी धाव घेतली आणि त्यांना पाठिंबा म्हणून दुस-या दिवशी एक प्रयोग आयोजित करण्यात आला.

विचारानं डावं असणं आणि मुसलमान असणं आक्षेपार्ह आहे का?

या पत्रात शेवटी जयंत पवार काही प्रश्न विचारतात. ते लिहितात,"वर नमूद केलेल्या गोष्टी गंभीर वाटतात का? त्या मराठी नाटकांशी संबंधित नाहीत, म्हणून आपण त्या दुर्लक्षित करणं रास्त ठरेल का? वरीलपैकी पहिलं नाटक करणारी संस्था डाव्या विचारांची आहे. (प्रसिद्ध रंगकर्मी सफदर हाश्मी यांच्या पत्नी मालोश्री या या संस्थेच्या प्रमुख आहेत. सफदर हाश्मी यांची 1989 मध्ये हत्या झाली होती. )

दुसऱ्या नाटकाच्या ग्रूपमध्ये एक रंगकर्मी धर्माने मुसलमान आहे. विचारांनी डावं असणं आणि मुसलमान असणं या दोन्ही गोष्टी आज अक्षेपार्ह आहेत असं तुम्हाला वाटतं का? राज्यकर्त्यांच्या विरोधी विचारसरणी असेल तर तो गुन्हा ठरेल का? सरकारी आदेशाविना पोलीस अशा प्रकारे आदेशपत्राची अधिकृत प्रत नसताना कुठेही घुसखोरी करून चौकशी व झडती करू शकतील असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही या घटनेचा जाहीर निषेध कराल का? सरकारला याबद्दल कोणी जाब विचारला तर तुम्ही त्याचं समर्थन कराल का?"

या पत्राविषयी आम्ही जयंत पवार यांच्याशीही बोललो. त्यांना हे पत्र समाजमाध्यमांमध्ये पसरल्यानंतर नाटकाशी संबंधित अनेक संस्थांकडून आणि व्यक्तींकडून प्रतिक्रिया येत आहेत. "नाटकाला अशा प्रकारचा धोका हा काही पहिल्यांदा दिसलेला नाही. पण सध्या कम्युनल हार्मनीबाबत परिस्थिती आपल्याभोवती आहे, ती पाहता या घटनांकडे आपण कसं पहायला हवं, हे मला वाटलं. आणि माझा आक्षेप ज्या प्रकारे ही चौकशी केली गेली त्यालाही आहे. त्या चौकशीतून मिळालं काय हेही कोणी सांगत नाही," जयंत पवार म्हणाले.

पोलिसांचं म्हणणं हे आहे की नाटक वा व्यक्ती म्हणून कोणाचीही चौकशी केली नाही आहे. चिंचवड येथील घटनेविषयी पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांना जेव्हा आम्ही विचारलं तेव्हा ते म्हणाले की हा नेहमीच्या चौकशीचाच भाग होता. "15 ऑगस्ट असेल वा गणेशोत्सव असेल तेव्हा अलर्ट असतो. आम्ही सगळ्याच हॉटेल वा हॉस्टेल्सवर चौकशी करतो. कोणत्या नाटकासाठी वा एखाद्या व्यक्तीसाठी आम्ही चौकशी केली नाही," रामनाथ पोकळे 'बीबीसी मराठी'शी बोलतांना म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)