World Press Freedom Day: ‘माझ्या पत्रकार आईच्या हत्येनंतर मी आजही न्यायासाठी लढा देतोय’

    • Author, मॅथ्यू कॅरुआना गॅलिझिया
    • Role, लेखक आणि शोध पत्रकार

माझ्या आईच्या खुनाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत मला दोन-चार महिन्यांतून एकदातरी एका खोलीत बसावं लागतं. हा अधिकारी जवळपास सहा वर्षांपूर्वी तिला अटक करण्यासाठी आमच्या घरी आला होता, तेव्हा आमची पहिली भेट झाली होती.

माझ्या आईने पंतप्रधानपदासाठीच्या एका उमेदवारावर एक व्यंगात्मक ब्लॉग लिहिला होता आणि त्या उमेदवाराच्या समर्थकाने त्या ब्लॉगविरोधात पोलीस तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारावर तिला अटक करण्यासाठी आमच्या घरी मध्यरात्री एक गुप्तहेर पाठवण्यात आला. त्याच्याकडे अटक वॉरंट होतं आणि 'बेकायदेशीर अभिव्यक्ती' असं कारण पुढे करत तिला अटक करण्यात आली.

त्यावेळी मी परदेशात नोकरी करत होतो आणि लोक मला तिचे व्हीडिओ पाठवत होते. रात्री दीड वाजता तिला पोलीस ठाण्यातून सोडण्यात आलं. त्यावेळी तिने माझ्या वडिलांचा शर्ट घातला होता.

घटनेच्या काही तासानंतर लगेच ती ऑनलाईन दिसली. ती तिच्या वेबसाईटवर सर्व मांडत होती. त्या लेखात तिने मध्ये-मध्ये पंतप्रधानांना वाटत असलेल्या असुरक्षिततेवर चिमटेही काढले आणि स्वतःच्या त्या शर्टमधल्या अवस्थेवर विनोदही केले होते.

या लेखात तिने लिहिलं, "माझ्या त्या अवताराबद्दल मी माफी मागते. मात्र जेव्हा मध्यरात्री पोलीस तुम्हाला अटक करायला तुमच्या घरी येतात, तेव्हा केस विंचरणे, पावडर, ब्लशर लावणे आणि कपाटातून छान ड्रेस काढून घालणे, या गोष्टी तुमच्या डोक्यातही येत नाहीत."

ज्या अधिकाऱ्याने माझ्या आईला अटक केली होती आज तोच तिच्या खुनाचा तपास करतोय.

डॅफ्नी कॅरुआना गॅलिझिया, हे माझ्या आईचं नाव. ज्या दिवशी तिची हत्या झाली, त्यादिवशी ती बँकेत गेली होती. एका मंत्र्याने तिचं बँक खातं गोठवलं होतं. खात्याचे अधिकार परत मिळावे, यासाठी ती बँकेत गेली होती.

ती फक्त 53 वर्षांची होती आणि तीस वर्षांच्या आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीतल्या शिखरावर होती.

तिच्या कार सीटखाली अर्धा किलो स्फोटकं एका यंत्रात घालून लावण्यात आली होती आणि रिमोटच्या साहाय्याने स्फोट घडवण्यात आला.

सरकारच्या समर्थकांनी या हत्येचा खुलेआम जल्लोष साजरा केला होता. या घटनेमुळे मला, 'ह्रांत डिंक' या टर्किश-अमेरिकन वृत्तपत्र संपादकाची गोळ्या घालून हत्या झाली होती, त्या प्रसंगाची आठवण ताजी झाली.

मीच माझ्या आईच्या हत्येचा कट रचल्याचा अप्रत्यक्ष आरोप काहींनी केला. तर काहींनी तिने स्वतःच ही परिस्थिती ओढावून घेतल्याची टीका केली. जेम्स फोली या अमेरिकन पत्रकाराचं सीरियात अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यावेळीदेखील त्यांच्यावर अशीच टीका झाली होती.

डॅफ्नी कॅरुआना गॅलिझियाची हत्या

  • ऑक्टोबर 2017: शोध पत्रकार असलेल्या डॅफ्नी यांचा माल्टा देशात कार बाँबस्फोटात मृत्यू. पंतप्रधान जोसेफ मस्कट यांनी हा 'निर्घृण' खून असल्याचं म्हटलं. शोकाकुल नातेवाईकांनी नेत्यांना अंत्यविधीत सहभागी होण्यापासून रोखलं.
  • डिसेंबर 2017: तिघांना अटक करण्यात आली आणि भाडोत्री गुंडांकरवी हत्या करण्यात आली असावी, या दिशेने तपास सुरू झाला.
  • जुलै 2018: माल्टाच्या सरकारने एक चौकशी समिती बसवली आणि या समितीच्या दंडाधिकाऱ्याने डॅफ्नी यांनी जे भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते, त्यातून पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नीची निर्दोष मुक्तता केली.
  • ऑगस्ट 2018: डॅफ्नी यांची हत्या रोखता आली असती का, याविषयीची सार्वजनिक चौकशीची मागणी डॅफ्नी यांच्या कुटुंबीयांनी केली.

हे खून महत्त्वाचे का आहेत?

आम्ही आमच्या दुःखातून पूर्णपणे सावरलोही नव्हतो, तेव्हा माझ्या भावाने युरोपातील राजनयिकांच्या शिष्टमंडळाला सांगितलं, "सत्य आणि विचार यांचा मुक्त संचार आणि पत्रकार यांच्यामुळे अधिक पारदर्शी आणि मुक्त समाज निर्मिती होत असते. यातून श्रीमंत आणि संवेदनशील समाज तयार होत असतात. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर जगण्यासाठी योग्य असा सुदृढ समाज तयार होत असतो."

आईच्या निधनानंतर सर्वच प्रकारच्या लोकांकडून व्यक्त होणारा पाठिंबा आणि दुःख हेच आमच्यासाठी आशेचा किरण होते. या सगळ्यामुळे मला खूप आश्चर्य वाटलं आणि मला माझ्या मित्राचे शब्द आठवले. तो एकदा म्हणाला होता, "चांगली माणसं सगळीकडेच असतात. तुम्हाला ती शोधावी लागतात."

मुक्त आणि खुला समाज, जिथे सर्वांसाठी समान कायदा असेल आणि मानवाधिकारांचा आदर राखला जाईल, अशा समाजाची इच्छा वैश्विक आहे. मात्र इतर अनेक इच्छांप्रमाणेच या इच्छेचीही किंमत मोजावी लागते.

दुर्धर आजारांसारखी असलेली काही माणसं कायम आपल्यासोबत असणारच आहेत, याची जाणीव आपल्याला होते तोवर बराच उशीर झालेला असतो.

आईच्या मृत्यूनंतर माझी भावंड, वडील आणि मी आम्ही आमच्यासाठी जे ध्येय ठरवलं ते फार मोठं आहे. ते ध्येय आहे, तिला न्याय मिळावा, तिने केलेल्या शोधपत्रकारितेला न्याय मिळावा आणि असं पुन्हा कधीच घडणार नाही, याची खात्री पटवणे, हे आमचं ध्येय आहे.

इतरांची निष्क्रियता आणि उदासीनता याबद्दल आपला संयम किती कमी पडतो, याविषयी कधीकधी आमच्या कुटुंबात चर्चा होते. विशेषतः ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याविषयी. त्यांचे कुटील डाव आणि त्यांची निष्क्रियता यावर प्रहार न करणं, आमच्यासाठी कठीण आहे.

टर्किश पत्रकार उगूर मम्कू यांचाही कार बाँबस्फोटात मृत्यू झाला होता. त्यांच्या मुलांनी आम्हाला सांगितलं की त्यांच्या वडिलांच्या हत्येनंतर तपास अधिकाऱ्यांनी "आम्ही काहीच करू शकत नाही. आमच्या समोर विटांची भिंत आहे," असं म्हणत आपल्या अपयशावर पडदा टाकला.

यावर त्यांच्या आईचं उत्तर होतं, "तर मग एक वीट काढा, मग दुसरी, जोवर संपूर्ण भिंत पडत नाही, तोवर वीट काढत राहा."

आणि हेच आम्ही आमच्या आईच्या हत्येनंतर आतापर्यंत करत आलोय.

सुरुवातीला मला वाटायचं काहीही झालं तरी सत्य समोर आलं पाहिजे. मात्र, आता असं वाटतं ही सर्व प्रक्रियादेखील ध्येयाइतकीच महत्त्वाची आहे.

आम्ही सांस्कृतिक बदल आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला सन्मान मिळावा, यासाठी लढतोय. त्यासाठीचा अंगीकारलेला मार्गसुद्धा अगदी सोपा आहे. यंत्रणेने त्यांचं कर्तव्य पार पाडावं आणि न्याय करावा.

'पारतंत्र्य' या आजाराविरोधात लढा देणाऱ्या आणि या प्रक्रियेत जगाला मानवाधिकारांच्या सन्मानाची शिकवण देणाऱ्या इतर संघटनांशीही आम्ही जोडलं गेलोय.

2017 साली लेखक यामीन रशीद यांची मालदीवमध्ये त्यांच्या घराबाहेर हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येच्या पाचच दिवस आधी आमच्याशी बोलताना ते म्हणाले होते, "विवेकाच्या स्वातंत्र्यापासूनच स्वातंत्र्याची सुरुवात होते. मनाचं मूलभूत स्वातंत्र्य नसेल तर इतर स्वातंत्र्याचं तुम्ही काय करणार?"

माझ्या आईप्रमाणेच त्यांच्या हत्येनेही हेच सिद्ध केलंय की आपल्या देशांमध्ये या स्वातंत्र्याला काहीच किंमत नाही. स्वातंत्र्याची लढाई लढण्याची जबाबदारी केवळ हत्या करण्यात आलेल्यांची किंवा तुरुंगात असलेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांची, त्यांच्या मित्रपरिवाराची नाही.

ही फार मोठी जबाबदारी आमच्या खांद्यांवर येऊन पडली आहे. मात्र ती केवळ आम्ही एकट्याने पेलू शकत नाही. त्यासाठी आम्हाला चांगल्या माणसांची साथ हवी आहे.

जागतिक प्रसार माध्यम स्वातंत्र्य दिवस (World Press Freedom Day)

  • संयुक्त राष्ट्राने 1993 साली जागतिक प्रसार माध्यम स्वातंत्रता दिनाची घोषणा केली. दरवर्षी 3 मे रोजी हा दिवस पाळला जातो.
  • 2019 सालचा विषय आहे 'पत्रकार आणि चुकीची माहिती वेगाने पसरणाऱ्या आजच्या काळातील निवडणुका'.
  • जगभरात माध्यमस्वातंत्र्य साजरं करणं, त्याचा पुरस्कार करणं, त्याचं मूल्यांकन करणं आणि आपलं कर्तव्य बजावताना मृत्यू पत्करलेल्या पत्रकारांना आदरांजली वाहणं, हा या दिवसाचा उद्देश आहे.
  • आंतरराष्ट्रीय पत्रकार महासंघाच्या माहितीनुसार गेल्या वर्षी जगभरात जवळपास 95 पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींची बॉम्बहल्ल्यात किंवा गोळीबारात हत्या झाली.
  • इतरही आहेत, याची मला कल्पना आहे. सौदीचे स्तंभलेखक जमाल खाशोगी यांच्यावर सगळीकडचेच लोक प्रेम करायचे, हे लक्षात असू द्या. केवळ एकाच व्यक्तीला ते नकोसे होते आणि तेवढी एकच व्यक्ती त्यांच्या हत्येसाठी पुरेशी ठरली.

माझ्या आईसह या सर्व हत्यांमध्ये दोषींना शिक्षा व्हावी, यासाठी सत्ताधाऱ्यांकडून कुठलेच प्रयत्न होताना दिसत नाही.

त्यामुळे आम्हीच पहिली वीट काढून याची सुरुवात केली आहे. आम्ही सार्वजनिक चौकशीची मागणी केली आहे. माल्टाच्या अतिशय महत्त्वाच्या पत्रकाराची हत्या रोखण्यात कोणती चूक झाली, याचा तपास आता आम्हीच करणार आहोत.

त्यानंतर आम्ही दुसरी वीट काढणार. मला रोज वाटतं की माझ्या आईने देशासाठी हा त्याग केला नसता तर ती आज जिवंत असती. मात्र मानवाधिकार संघटनांनी ज्यांच्या तुरुंगवासाचं वर्णन 'कायदे धाब्यावर बसवून दिलेली शिक्षा' असं केलं आहे, ते पत्रकार खादिजा इस्माईलोव्हा यांनी म्हटल्याप्रमाणे, "आपण एखाद्यावर प्रेम करत असू तर ती व्यक्ती जी आहे तीच असावी, असं आपल्याला वाटतं. आणि डॅफ्नी तशीच होती - लढाऊ आणि हिरो."

एक गोष्ट जी माझ्या आईला कधीच कळणार नाही ती म्हणजे तिच्या मृत्यूने माल्टा आणि माल्टाबाहेरही हजारो लोकांना प्रेरित केलं आहे.

माझ्या आईसोबत जे झालं तसं इतर कुठल्याच पत्रकाराच्या बाबतीत होऊ नये, हे या प्रेरित झालेल्या प्रत्येकाच्या कृतीतून साधलं जावं, अशी माझी इच्छा आहे.

(मॅथ्यू कॅरुआना गॅलिझिया स्वतः एक शोधपत्रकार आहेत. ते ऑक्टोबर 2017मध्ये कार बॉम्बस्फोटात ठार झालेल्या डॅफ्नी कॅरुआना गॅलिझिया यांचे सुपुत्र आहेत.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)