You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदी भाषणात उद्धव ठाकरेंना 'लहान भाऊ' का म्हणाले?
मुंबईत मेट्रो मार्ग आणि मेट्रो भवनाच्या भूमिपूजनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी दोघांनीही एकमेकांचं कौतुक केलं.
मुंबईतील नवे मेट्रो मार्ग, मेट्रो भवन आणि मेट्रो स्टेशनच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही यावेळी उपस्थित होते.
सध्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच पाहायला मिळत असताना, आजचा दिवस महत्त्वाचा मानला जात आहे.
नरेंद्र मोदी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा 'लहान भाऊ' असा उल्लेख केला.
तर दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात युतीचा पुनरुच्चार केला. "हे सरकार आता पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहे. पुन्हा युतीचंच सरकार येणार आहे." असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
या दोन्ही गोष्टींवरून राजकीय वर्तुळात चर्चांन उधाण आलंय. कारण काही दिवसांपूर्वीच अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'तून भाजपवर अप्रत्यक्षरित्या टीका केली. त्यामुळं व्यासपीठांवर एक भूमिका आणि पाठीमागून एक भूमिका अशी भाजप-शिवसेनेचं धोरण आहे की, युतीच्या आगामी राजकारणाची बिजं यात आहेत, हे आम्ही तपासून पाहिलं.
मोदींनी उद्धव ठाकरेंना 'लहान भाऊ' का म्हटलं?
महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युती झाल्यानंतर कायमच शिवसेना आपण 'मोठा भाऊ' असल्याचं सांगत आलीय. त्यामुळं आता मोदींनी उद्धव ठाकरेंना 'लहान भाऊ' म्हटल्यानं शिवसेनेला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केलाय का, अशी चर्चा सुरू झाली.
"अडवाणी कायमच शिवसेनेला उद्देशून म्हणायचे की, 'वो (शिवसेना) राम है और हम लक्ष्मण है.' त्यामुळं एकेकाळी स्वत: भाजपच शिवसेनेला महाराष्ट्रात मोठा भाऊ मानत होती, हेही खरंच आहे," असं ज्येष्ठ पत्रकार योगेश पवार म्हणाले.
यावर ज्येष्ठ पत्रकार योगेश पवार बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "एका सभेत बाळासाहेब म्हणाले होते, हे भाजपवाले फार पुढे पुढे करतायत, पण यांना म्हणावं, तुमच्या कायमच 'उप, उप'च राहणार. त्यावेळी भाजप-शिवसेनेची सत्ता होती आणि भाजपचे गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते. असं असताना भाजप आज शिवसेनेच्या खूप पुढे निघून गेलाय. त्यामुळे जरी भाजपकडून 'लहान भाऊ' हे प्रेमाचे शब्द असले, तरी एकप्रकारे आपली वाढलेली ताकद दाखवण्याचाही प्रयत्नही केला जातोय."
मुंबई मिरर या इंग्रजी वृत्तपत्राच्या पत्रकार श्रुती गणपत्ये यांच्या मते, "उद्धव ठाकरे हे मोदींपेक्षा लहान आहेत, त्यामुळं स्वाभाविक ते लहान भाऊ म्हणणार. पण राजकीय दृष्ट्या विचार केल्यास लोकसभा आणि विधानसभेत भाजपनं जास्त जागा मिळवल्या आहेतच. त्यामुळं शिवसेनेच्या तुलनेत भाजप स्वत:ला लहान भाऊ म्हणवून घेत असेल, त्यात चूकही काही नाहीय."
'सामना' वृत्तपत्रातून व्यक्त होणाऱ्या शिवसेनेच्या मतांबाबत योगेश पवार म्हणतात, "सामना हे मुखपत्र आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना बांधून ठेवणं गरजेचं असतं, त्यामुळं सामनातून आक्रमक भाषा आवश्यक असते. कारण शिवसैनिक या भाषेनं सुखावतात. त्यामुळं तसा सामनातल्या भूमिकेचा युतीच्या संबंधांवर परिणाम होईल, असं वाटत नाही."
उद्धव ठाकरे वारंवार मंदिराचा मुद्दा का काढतात?
मेट्रो मार्गाच्या भूमिपूजनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रोच्या मार्गांमुळं मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईकरांना किती फायदा होईल, शिवाय महाराष्ट्रात कोणते नवे प्रकल्प होऊ घातले आहेत, हे सांगत होते. मात्र, त्याचवेळी उद्घव ठाकरे यांनी काश्मीर, राम मंदिर असे मुद्दे उपस्थित केले.
राम मंदिराचा मुद्दा उद्धव ठाकरे सातत्यानं उपस्थित करत असतात. त्यामुळं ते अप्रत्यक्षपणे भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतायत का, अशीही चर्चा सुरू झालीय.
"मुंबईत वारंवार पावसामुळं खेळखंडोबा होतोय. मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यामुळं शिवसेनेनं इन्फ्रास्ट्रक्चरवर बोलण्यास सुरुवात केली, तर मुंबईतले प्रश्न विचारले जातील. पर्यायानं उद्धव ठाकरेंकडे बोलायला मुद्दा राहत नाही. त्यामुळं ते राम मंदिरासारखे मुद्दे आणतात. ज्यातून विषयही वळवता येतो आणि भाजपचीही कोंडी करता येते." असं योगेश पवार म्हणतात.
यावर श्रुती गणपत्ये म्हणतात, "फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, केवळ भाजपचे नेते नाहीत. त्यामुळं त्यांनी विकासावर बोलणं सहाजिकच आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे हे केवळ पक्षाचे प्रमुख आहेत, त्यामुळं त्यांनी राजकीय विषयांवर बोलणंही सहाजिक आहेच."
तसेच, "भाजपला आता राम मंदिराच्या मुद्द्याला हवा तसा प्रतिसाद मिळला नाही. भाजपच्या अजेंड्यामध्ये राम मंदिराचा मुद्दा आहेच. कलम 370, तिहेरी तलाकवरील निर्णय पाहता राम मंदिराबाबतही भाजप पावलं उचलू शकते. त्यामुळं राम मंदिरावरून कोंडी होण्याचा तसा आता प्रश्न नाही. शिवाय, राज्याबाहेर शिवसेनेची एवढी ताकद नाहीय की ते भाजपला अडचणीत आणतील." असं श्रुती गणपत्ये म्हणतात.
मेट्रो मार्गांचं भूमिपजून
मुंबईतील नवे मेट्रो मार्ग, मेट्रो भवन आणि मेट्रो स्टेशनच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. मीरा रोडमधील गायमुख ते शिवाजी चौक (मेट्रो मार्ग 10), मुंबईतील वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मेट्रो मार्ग 11) आणि कल्याण ते तळोजा (मेट्रो मार्ग 12) यासह भविष्यात निर्माण होणाऱ्या मेट्रो जाळ्यावर नियंत्रणासाठी 32 मजली मेट्रो भवनाच्या इमारतीच भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं.
याचसोबत, मेट्रो-7 या मार्गावरील बाणोडोंगरी या अत्याधुनिक सुविधायुक्त स्टेशनचं उद्घाटन मोदींनी केलं. तसेच, 'महामुंबई मेट्रो ब्रँड व्हिजन' या पुस्तकाचेही प्रकाशनही यावेळी करण्यात आलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी आपल्या भाषणाची सुरुवात मराठी भाषेतून केली. उपस्थितांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही मराठीतूनच दिल्या.
मोदींच्या भाषणातले प्रमुख मुद्दे -
- मुंबई आणि महाराष्ट्रातील लोकांचा साधेपणा आणि स्नेह मला कायमच भारावून टाकतो. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मी महाराष्ट्रातील अनेक शहरातील लोकांशी संवाद साधला. त्यावेळी मुंबईत झालेल्या रात्रीच्या सभेची आजही चर्चा होते.
- आपल्या ध्येयासाठी कसं रात्रंदिवस मेहनत केली जाते, प्रतिकूल परिस्थितीवर मात केली जाते आणि आव्हानात्मक स्थितीत कशाप्रकारे संयमीपणानं ध्येय गाठले जातात, हे इस्रोच्या शास्त्रज्ञांकडून शिकू शकतो.
- सर्वोच्च ठिकाणी तेच लोक पोहोचू शकतात, जे मोठमोठी आव्हानं असूनही सातत्यपूर्ण प्रयत्न करून आपलं ध्येय गाठतात.
- चांद्रयान-2 सोबत पाठवलेलं ऑर्बिटर अजूनही तिथंच आहे, ते सातत्यानं चंद्राभोवती फिरतंय, त्यामुळं हेही एक ऐतिहासिक पाऊल आहे.
- मुंबई असं शहर आहे, ज्याच्या वेगानं देशालाही वेग मिळतो, इथली कष्टकरी जनता या शहरावर प्रेम करते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)