मेधा पाटकर: नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या गावांनाही मोदी पर्यटनस्थळ म्हणूनच पाहातात

गुजरातमध्ये सरदार सरोवरच्या पाण्याची पातळी 134 मीटरपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील अनेक गावांमध्ये पूर आला आहे. या गावात राहणाऱ्या नागरिकांचं जीवन पुरामुळे बिकट बनलं आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचं आढळून येत आहे.

याविरोधात सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आपल्या काही सहकाऱ्यांसोबत मध्य प्रदेशच्या बडवानी जिल्ह्यात बड्डा गावात आमरण उपोषणाला बसल्या होत्या. 9 दिवस उपोषण केल्यावर त्यांची प्रकृती बिघडू लागली होती. मागण्या मान्य न झाल्यास उपोषण सुरूच राहील, असं मेधा पाटकर यांनी सांगितलं होतं.

अखेर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमल नाथ यांनी एक शिष्टमंडळ पाठवून मेधा पाटकर यांना उपोषणा सोडण्याची विनंती केली. त्यांचे माजी मुख्य सचिव एस. सी. बेहार यांच्याशी चर्चा केल्यावर पाटकर यांनी लिंबूपाणी पिऊन आपलं उपोषण सोडलं.

मेधा पाटकर मागच्या 34 वर्षांपासून नर्मदा बचाव आंदोलनाअंतर्गत सरदार सरोवर धरणामुळे स्थलांतरित झालेल्या लोकांच्या हक्कांसाठी लढत आहेत. बीबीसीचे प्रतिनिधी तेजस वैद्य यांनी बड्डा गावात जाऊन मेधा पाटकर यांच्याशी रविवारी बातचीत केली.

तेजस - सरदार सरोवर धरणाच्या उंचीवरून पाणी व्यवस्थितपणे जात असून तुम्ही हे पाहिलं पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पण तुम्ही इथं उपोषणासाठी बसल्या आहात. हा विरोधाभास कशासाठी?

मेधा - नरेंद्र मोदी एक राजकीय नेते आहेत. ही आपली जनता आहे. नरेंद्र मोदींचा दृष्टिकोन वेगळा आहे. ते देशातील नैसर्गिक साधनसंपत्तीची काळजी करत नाहीत. त्यांना आपल्या परंपरांबाबत श्रद्धा नाही.

आपण सगळी पारंपारिक सिंचनपद्धती सोडावी लागणार असल्याचं मोदी यांनी आपल्या भाषणात जलसिंचनाबद्दल सांगितलं होतं. पण देशात मोठ-मोठी धरणं असतानाही दुष्काळ आणि पुराच्या चक्रात महाराष्ट्रासारखं राज्य आलं आहे. अमेरिकेने सुद्धा हजारो धरणं फोडून टाकली आहेत. मोदी धरणं आणि नद्यांकडे पर्यटनस्थळ म्हणून पाहातात.

तेजस - तुम्हाला असं का वाटतं की सरदार सरोवर धरणाला पाण्याऐवजी पर्यटनाचा मुद्दा बनवण्यात आला आहे?

मेधा - त्यांचं प्रत्येक पाऊल पाहून असंच वाटतं. नदी किनाऱ्यावरच्या गावांनासुद्धा ते पर्यटनस्थळासारखंच पाहत आहेत. त्यांचं संपूर्ण लक्ष त्याकडेच आहे.

गुजरातच्या स्थलांतरितांचं आजपर्यंत पूर्णपणे पुनर्वसन होऊ शकलं नाही. ज्यांना दुसरीकडे वसवण्यात आलं, ते लोक ठिक-ठिकाणी मोलमजुरी करून गुजराण करतात. अनेकांना खराब दर्जाची जमीन मिळाली आहे. अनेकांचं पुनर्वसन करण्यात आलेल्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत आहे.

तेजस - तुम्ही 34 वर्षांपासून सातत्याने आंदोलन करत आहात, यावेळी उपोषणातील महत्त्वाचे मुद्दे काय आहेत?

मेधा - पूर येऊ नये. गावच्या गाव बुडलेले राहतात. घरं पडतात. जमिनीचा तुकडा म्हणून याची ओळख राहते. यांतर आणखी पाच मीटर पाणी वाढलं तर हाहाकार माजेल. त्यानंतर पुनर्वसन करणंसुद्धा अवघड होऊन बसेल.

तेजस - पाण्याची पातळी 134 मीटर झाल्यामुळे मध्य प्रदेशातील किती गावं प्रभावित झाली आहेत?

तेजस - आतापर्यंत डोंगराळ भागातील गावांमध्ये पाणलोट क्षेत्रात कमी घरं आहेत. पण ती सगळी पुनर्वासित नाहीत. ज्यांना वर घर बांधावं लागलं आहे, त्यांना दुसऱ्या जागा मिळाल्या नाहीत.

निमाडच्या मैदानी भागात मोठमोठाली गावं आहेत. सुपीक जमीन आहे. शेकडो मंदीरं आहेत. हजारो जनावरं आहेत. एका-एका गावात हजारो झाडं आहेत. तिथं सध्या 50 ते 80 गावं प्रभावित झाली आहेत.

पाण्याची पातळी 139 मीटरवर गेल्यास 192 गावं आणि एक शहर पूरग्रस्त होईल. मागच्या मध्य प्रदेश सरकारने केंद्रासोबत मिळून अनेक गावांना (16 हजार कुटुंब) पाणलोट क्षेत्रातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. पण तो चुकीचा होता, हे दिसून येत आहे.

त्यांनी गावांची संख्या 176 वर आणली. सगळी गावं रिकामी झाली, पुनर्वसनासाठी कोणीच बाकी नाही, असं ते सांगू लागले. हेसुद्धा खोटं असल्याचं आता सिद्ध होत आहे.

आतापर्यंत फक्त गावांच्या लोकसंख्येच्या हिशोबाने 32 हजार कुटुंब प्रभावित होते. आजसुद्धा 30 हजारांच्या जवळपास ही संख्या पोहोचली आहे.

तेजस - सरदार सरोवर धरणाजवळ रिव्हर राफ्टिंग सुरू झालं आहे. पर्यटनासाठी अनेक गोष्टी याठिकाणी सुरू होणार आहेत. जर पर्यटनातून विकास होत असेल, तर इथल्या आदिवासींना रोजगार मिळाला असेल, तर यात अडचणी काय आहेत?

मेधा - आदिवासींच्या ग्रामसभांमध्ये विचारून विकास झाला पाहिजे. बाहेरचे लोक येऊन त्यांची शांतता, त्यांची शेती आणि त्यांची यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त करतील, असा विकास त्यांना नको आहे.

त्यांना जी नोकरी आता मिळाली आहे, तिथं फक्त तीन-तीन महिने काम मिळत आहेत. कंत्राटी कामगारच जास्त असतील. त्यांचा साधेपणा, स्वाभिमान, नैसर्गिक संस्कृती कशा प्रकारे बदलली आहे, याचासुद्धा विचार झाला पाहिजे.

पर्यटन बिल्कुल होऊ नये, असं आम्ही म्हणत नाही. पण बाहेर मोठ-मोठ्या कंपन्या आणि कंत्राटदार आणले जात आहेत. याऐवजी आदिवासी गावातील आदरातिथ्य परंपरेला वाढण्याची संधी दिली असती, तर ती गोष्ट वेगळी ठरली असती. त्यांचा खूपच वेगळा दृष्टीकोन आहे आणि त्यामुळे इतरांचा दृष्टीकोन वेगळा बनत आहे.

तेजस - तुमच्या उपोषणाला 8 दिवस झाले आहेत. तुमची तब्येत बिघडत चालली आहे. हे उपोषण किती दिवस चालेल?

मेधा - मी सांगू शकत नाही. हे उपोषण आमरण काळासाठी आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)