महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: चंद्रपुरात दारूबंदीचा प्रयोग फसला आहे का?

    • Author, विनायक गायकवाड
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी, चंद्रपूरहून

सकाळी सकाळी हॉटेलच्या रूमचा पडदा बाजूला केला आणि औष्णिक विद्युत केंद्राच्या दोन अवाढव्य चिमण्या अगदी आ वासून समोर उभं होतं. चंद्रपूर म्हटलं की सगळ्यांत पहिल्यांदा डोळ्यासमोर येतात त्या कोळशाच्या खाणी आणि औष्णिक विद्युत प्रकल्प आणि आज याच चंद्रपूरात आम्ही 'महाराष्ट्र कुणाचा' या प्रश्नाचा शोध घेत घेत आलो होतो.

दिवसाची सुरुवात जशी औष्णिक विद्युत केंद्राच्या सानिध्यात झाली तशी प्रदुषणाच्याही. कोळशानं संपन्न अशा चंद्रपूरचा तिढा आहे तो पर्यावरणाचा ढासळणारा समतोल. एकीकडे खाणींमुळे वाढणारं प्रदूषण, हवेत पसरणारी राख आणि धूळ आणि त्यातच इतर विदर्भापेक्षा 1-2 टक्के जास्त असणारं तापमान.

केंद्र सरकारनं बुधवारीच कोळशाच्या खाणींमध्ये 100 टक्के FDI चा निर्णय घेतलाय. पण याचा येत्या निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नाही, असं झी मीडियोचे पत्रकार आशिष अंबाडे यांना वाटतं. चंद्रपूरातील लोक एका वेगळ्या प्रकारे मतदान करतात असं ते सांगतात.

364 दिवस लोक अनेक प्रश्नांबद्दल चर्चा करतात, बोलतात. पण मतदानाच्या दिवशी बेरोजगारी, शिक्षण, प्रदूषण हे सर्व मुद्दे बाजूला पडतात आणि सगळं काही विसरत मतदान होतं असंही ते म्हणतात. प्रदूषणाची समस्याही चंद्रपूरसाठी नवीन नाही. कोळशाच्या खाणी जशा चंद्रपूरात बहरल्या तशा श्वसनाच्या, त्वचेच्या, आरोग्याच्या समस्यांचा चंद्रपूरभोवती विळखा पडला. पण विकासाच्या नावाखाली चंद्रपूरकरांनीही काही प्रमाणात त्याकडे पाठ फिरवली आणि म्हणूनच प्रदुषणाच्या बातम्या या चंद्रपूरच्या स्टेपल स्टोरीज असल्याचंही आशिष सांगतात.

चंद्रपुराला अवैध दारूविक्रीचा विळखा

प्रदूषण ही तर एक समस्या पण दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात अवैध दारूची होणारी सर्रास विक्री हा तर चंद्रपूरकरांसमोर पडलेला सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न. हे आणि असेच काही प्रश्न घेऊन आम्ही सरदार पटेल कॉलेजमध्ये पोहोचलो. 'कसलं काय भाऊ, दारू बंदी - दारू बंदी म्हणत आत्ता इथे सर्वांत दास्त दारू विकली जाते ना...' विनिता अगदी पोटतिडकीनं बोलत होती. चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या महाराष्ट्रातल्या तीन जिल्ह्यांमध्ये दारूबंदी आहे पण ही बंदी यशस्वीपणे राबवण्यात प्रशासनाला, यंत्रणांना आणि सरकारला यश आलंय का? तर उत्तर नाही असंच आहे.

चंद्रपूरात दारूबंदी नाही तर दारू महाग झाल्याचं मत पत्रकार संजय वैद्य मांडतात,"चंद्रपूर हे श्रमिकांचं शहर आहे. इथे फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर देशातून अनेक कामगार कामासाठी येत असतात, अशा परिस्थितीत दारूबंदी करणं सरकारला खरंच शक्य आहे का? आणि जर मग शक्य नसेल तर हा फार्स का असा प्रश्नही ते विचारतायत."

सरकारनं दारूबंदीचा निर्णय घेतला खरा पण त्याचबरोबर त्याची अंमलबजावणीकडे साफ दुर्लक्ष केलं. परिणामी अवैध दारूच्या किमती महागल्या आणि जो कामगार दिवसाच्या मजुरीतून दारू प्यायची. आता तर घरातले पैसे मारूनही दारू प्यायला लागलाय. त्यामुळे या वरवरच्या कारवाईमुळे काही ठोस परिणाम होणार नसल्याचं पत्रकार अनिल ठाकरे सांगतात.

दारूबंदी हवी की नको?

दारूबंदीचा मुद्दा हा चंद्रपूरमधली हॉट टॉपिक. महत्त्वाचं म्हणजे या मुद्द्यावर मुलांपेक्षा मुली जास्त व्होकल आहेत. विनिता आम्हाला सांगत होती की, चंद्रपुरात अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट आहे. आज शहरात आणि जिल्ह्यात बेरोजगारीचं प्रमाण कमालीनं वाढलंय. ज्यांना रोजगार नाही ते तरूण अवैध दारूची ने-आण करण्यात मदत करतात. याचेच का त्यांना दिवसाला काही पैसे मिळतात.

नोकरी नाही, धंदा नाही पण यावरच आज अनेक तरुणांची गुजराण होतेय. पण दारूबंदीच्या मुद्द्यावरही दोन मतप्रवाह चंद्रपूरात ऐकायला मिळतात. एक, ज्यांचा दारूबंदीला आणि जिल्ह्यातल्या अवैध दारू विक्रीला कडाडून विरोध आहे असा आणि दुसरा म्हणजे दारूबंदी कशाला हा प्रश्न विचारणाऱ्यांचा. दारूबंदीमुळे तसं काही साध्य होणार नाही उलट ब्लॅक मार्केटला चालना मिळावी यासाठी या बंदीचा फार्स केला जातोय असेही आरोप सरकारवर केले जातात. बंदी ही फक्त लोकांच्या डोळ्यात धूळफेक आहे वास्तव मात्र वेगळंच आहे पण खऱ्या परिस्थितीला प्रशासन, पोलीस यंत्रणा अशा सगळ्यांचंच पाठबळ असल्याचा आरोपही मुलींनी केला.

चंद्रपूर कुणाचं?

चंद्रपूर हा महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांचा जिल्हा. चंद्रपूरसाठी देवेंद्र फडणवीस नाही तर सुधीर मुनगंटीवारच राज्याचे मुख्यमंत्री असल्याचं साम टीव्हीचे पत्रकार संजय तुमराम सांगतात. अर्थमंत्री सुधीर मनगंटीवारांनी चंद्रपुरासाठी अनेक आश्वासनं दिली पण त्या आश्वासनांनीच जनतेचं पोट भरलंय असंही ते म्हणतात.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत अवैध दारू विक्रीचा मुद्दा उचलत काँग्रेसनं भाजपला मात देण्याचा प्रयत्न केला. सुरेश धानोरकरांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री असलेल्या हंसराज अहीर यांना पराभवाची धूळ चारली यात या दारूबंदीच्या मुद्द्याचं विशेष महत्त्व होतं आणि यावेळचा निवडणुकीतही हाच मुद्दा लावून धरण्याता काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं ते म्हणतात. पण चंद्रपूरात काँग्रेससमोर प्रश्न आहे तो गटातटाच्या राजकारणाचा. काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नाना पटोले हेही विदर्भाचे तर विरोधी पक्षनेते आणि स्क्रीनिंग समितीचे प्रमुख विजय वडेट्टीवारही इथलेच.

भाजपच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला उत्तर देण्यासाठी काढलेल्या महापर्दाफाश यात्रेवरून या दोघांत बिनसल्याच्या बातम्याही सध्या चंदिरपूरात आहेत. आणि म्हणूनच चंद्रपूरातल्या या सभेत या दोघांनी एकत्र स्टेजवर येण्याचं टाळलं असंही बोललं जातंय. पण जसा काँग्रेसला गटातटाचा राजकारणाचा फटका बसू शकतो तसा भाजपलाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही असं पत्रकार संजय वैद्य सांगतात.

2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाला घेऊन अहीर कमालीचे गंभीर आहेत. निवडणुकीत पक्षांतर्गत गटबादीचा फटका बसल्याचंही त्यांचे कार्यकर्ते सांगतात त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपमधील अंतर्गत धुसफुसही बाहेर येऊ शकते असंही वैद्य सांगतात. त्यामुळे पुन्हा एकदा चंद्रपूरात मुख्यमंत्री फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांची जादू चालणार की तंद्रपूरातील यशाबरोबर काँग्रेस विदर्भात कमबॅक करणार हे निकालानंतरच समजेल. पण सध्याची परिस्थिती बघता चंद्रपूरमध्ये दोन्ही पक्षांना समान संधी असल्याचा अंदाजही इथले स्थानिक जाणकार वर्तवतायत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)