You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काश्मीर: राज्यपाल सत्यपाल मलिक यांची घोषणा - दोन-तीन महिन्यात 50 हजार सरकारी नोकऱ्या भरू
काश्मीरमध्ये पुढच्या दोन ते तीन महिन्यात 50 हजार सरकारी नोकऱ्या भरू, अशी घोषणा जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केली आहे
काश्मीरमधील परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी मलिक यांनी आज श्रीनगरमध्ये पत्रकार परिषद घेतली. तेव्हा त्यांनी जाहीर केलं, "पुढील दोन ते तीन महिन्यांत ही भरती होईल. आम्ही तरुणांना आवाहन करतोय की त्यांनी या भरतीत सहभागी व्हावे. या राज्याच्या इतिहासात ही सर्वांत मोठी नोकरभरती असेल, जी एकाच वेळी केली जात आहे. या भरतीशिवाय केंद्र सरकारकडून लष्कर, निमलष्करी दलाची वेगळी भरती होईल."
काश्मीरला विशेष दर्जा देणारी कलम 370 रद्द केल्याबद्दल ते म्हणाले, "सरकारने इथल्या लोकांच्या भल्यासाठीच हा निर्णय घेतला आहे. लोक मागे राहून जात होते, कारण त्यांचा विकास नव्हता होत. ते काम आता होणार आहे, म्हणून यावर वाद घालण्याची गरजच नाही."
"निश्चिंत राहा, पुढच्या सहा महिन्यात काश्मीरमध्ये एवढा विकास घडेल की पलीकडच्या काश्मिरातले लोकही म्हणतील की आम्हाला त्यांच्यासारखं व्हायचंय. यासाठी केंद्र सरकार सातत्याने बैठका घेत आहेत आणि केंद्रीय मंत्रालयांचे शिष्टमंडळ भेट देत आहेत," असं ते पुढे म्हणाले.
काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर एकाही नागरिकाचा जीव आम्ही जाऊ दिला नाही, हे सरकारचं मोठं यश असल्याचं ते म्हणाले. शिवाय, लवकरच फोनबाबतचे निर्बंध दूर होतील, असंही त्यांनी म्हटलंय. "जे निर्बंध आहेत ते सर्वांनी समजून घ्यायला हवेत. फोन आणि इंटरनेटचा फायदा दहशतवाद्यांना, पाकिस्तानींना अधिक आहे. हे आमच्या विरोधातील एकप्रकारचे हत्यार आहे, म्हणून आम्ही त्यावर निर्बंध घातले आहेत. हळूहळू आम्ही ते सुरू करू."
यावेळी त्यांनी काश्मीरबाबत काँग्रेसनं अजूनही आपली भूमिका स्पष्ट केलेली नसून निवडणुकीत लोक त्यांना जोड्यानं मारतील, असंही वक्तव्य केलं. "राहुल गांधी यांनी काश्मीरबाबत राजकीय असंमजपणा दाखवला आहे. त्यामुळे आज पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राला दिलेल्या पत्रात त्यांच्या वक्तव्यांचा उल्लेख केला आहे.
"जेव्हा संसदेमध्ये त्यांच्या पक्षाचा नेता काश्मीरच्या मुद्द्याला संयुक्त राष्ट्रांशी जोडून बोलत होता, तेव्हाच राहुल गांधींनी बोलायला हवं होतं. त्याच वेळी त्यांनी त्या नेत्याला थांबवून सांगायला पाहिजे होतं की आमची काश्मीरबाबत ही भूमिका आहे. आजतागायत त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही.
"जेव्हा देशात निवडणुका होतील, त्यांच्या विरोधकांना काहीही बोलण्याची गरज नाही. विरोधकांनी एवढं जरी म्हटलं की हे कलम 370 चे समर्थक आहेत, तर लोक त्यांना बुटाने मारतील," असं ते म्हणाले.
'10-20 दिवस हा त्रास सहन करा'
"जेव्हा हा निर्णय घेतला गेला, त्यावेळी आमचं पूर्ण लक्ष यावर होते की कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठला प्रश्न निर्माण होऊ नये, ज्यामध्ये एकाही व्यक्तीचा मृत्यू जाता कामा नये.
"खूप सांगितलं जातंय की फोन झाला नाही, अडचण होतेय. मी या सर्वांना हात जोडून विनंती करत आहे की या सर्व अडचणी तेव्हाही होत्या जेव्हा फोन नव्हते. 10-20 दिवस हा त्रास सहन करा. आमच्यासाठी प्रत्येक काश्मिरी बांधवांचा जीव महत्त्वाचा आहे आणि एकाही काश्मीर व्यक्तीचा आमच्यामुळे जीव जावा, हे आम्हाला नकोय," असं ते म्हणाले.
सत्यपाल मलिक यांनी सांगितलं की 2008 मध्ये पहिल्या दोन आठवड्यांतच 50 लोकांचा जीव गेला होता. 2010 मध्ये 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. 2016 मध्ये 80 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
"जर काही लोकांना मानवी जीवाची कदर नसेल तर गोष्ट वेगळी आहे, पण आम्हाला याची काळजी आहे. पंचायत निवडणुका, लोकसभा निवडणूक यांमध्ये इतकी कडेकोट सुरक्षा ठेवली की कुणाचा जीव गेला नाही. थोडेफार उपद्रवी लोक जखमी आहेत, पण तेही कमरेच्या खाली जखमी आहेत. सुरक्षा दलाच्या काही जवानांना जीव गमवावा लागला आहे, पण आम्ही सामान्य नागरिकांचा जीव जाऊ दिलेला नाही. आम्ही या गोष्टीला एक मोठे यश मानतो," असं ते म्हणाले.
पुढे त्यांनी म्हटलं की, "मृत्यू झाल्याचं लपवलं जातंय, असा आरोप केला जातोय. तुम्ही सांगा की मृत्यू कसे लपवले जाऊ शकतील. आम्ही तर एखाद्याला छर्रा लागला असेल तर त्याचीही नोंद ठेवली आहे. एक घटना सोडल्यास बहुतेकांना कमरेच्या खाली छर्रे लागले आहेत. एका व्यक्तीला मानेत छर्रा लागला होता, ती व्यक्तीही आता धोक्याबाहेर आहे."
काश्मीरबाबत अफवा पसरवल्या जात असल्याचा दावाही त्यांनी केला. "तुम्हाला माहीत असेल की काही दिवसांपूर्वी असं पसरवलं गेलं की जम्मू-काश्मीर पोलिसांना नि:शस्त्र करण्यात आलं आहे. रुग्णालयांमध्ये औषधं नसल्याचंही सांगितलं गेलं, जेव्हा की मी त्यावेळी रुग्णालयातच होतो आणि सर्व गोष्टी उपलब्ध होत्या," असा दावा त्यांनी केला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)