You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काश्मीर कलम 370 : 'तिथे राहणं, परतणं, दोन्हीही अवघड होतं'
- Author, मिसबाह रेशी
- Role, विद्यार्थिनी, दिल्ली विद्यापीठ
दिल्ली विद्यापीठाच्या एका विद्यार्थिनीने श्रीनगरमध्ये पाच दिवस राहून वातावरणाचा अनुभव घेतला. रविवार दिनांक 4 ऑगस्ट ते गुरूवार दिनांक 8 ऑगस्टपर्यंत तिला आलेला अनुभव तिने शब्दांत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. बीबीसीच्या वाचकांसाठी तिने आपले अनुभव लिहिले आहेत.
रविवार
संघर्षग्रस्त प्रदेशांनी इतका हिंसाचार आणि विश्वासघात अनुभवलेला असतो की, तिथली कोणतीही अपुरी माहिती अचूक असल्याप्रमाणे बाहेर पसरवली जाते. बनावट बातम्यांची खरी तीव्रता या प्रदेशांमध्ये राहिल्यावरच लक्षात येते.
काश्मीरमध्ये जास्तीची सैन्यदलं तैनात करण्यात आली आणि अमरनाथ यात्रेकरूंना व बिगर काश्मिरी लोकांना खोऱ्यातून बाहेर पडण्याचे आदेश देण्यात आले, यासंबंधीची विविध कारणं विविध लोकांकडून ऐकायला मिळत होती.
शुक्रवारपासून सोमवारपर्यंत आम्ही अजाण अवस्थेत ही श्रवणभक्ती करत राहिलो.
जम्मू-काश्मीर राज्याचे तीन भाग केले जाणार आहेत, काश्मीरला केंद्रशासित प्रदेश केलं जाईल, जम्मूला राज्याचा दर्जा मिळेल, अनुच्छेद 370 व 35 A रद्द केले जातील आणि यासिन मलिक यांचा मृत्यू झाला आहे, अशा विविध गोष्टी लोक बोलू लागले होते. आपली बातमी सत्य आहे असं शपथेवर लोक सांगत होते.
सोमवारी संचारबंदी लागू झाल्याच्या अफवा पसरल्या. दीर्घ कालावधीसाठी कठोर संचारबंदी लागू झाली तर अडचणी वाढतील, अशा भीतीने मी लाल बाजारहून नाईद कदलमधील माझ्या घराकडे निघाले.
रस्त्यावर सगळ्यांच्या हालचालींमध्ये लगबग जाणवत होती. एटीएमसमोर लांब रांगा लागल्या होत्या, प्रत्येक किराणा दुकानाबाहेर दहा-पंधरा कार थांबलेल्या होत्या, आणि पेट्रोल पंपांवर खडखडाट होता. शुक्रवारी रात्रीच नागरिकांना यासंबंधी नकार मिळू लागला होता.
माझा चुलतभाऊ पेट्रोलपंपावर गेला तेव्हा त्याला सांगण्यात आलं की, पंपावर पेट्रोल आहे, पण आता ते सीआरपीएफ व पोलिसांसाठी राखून ठेवण्याचे आदेश आले आहेत, त्यामुळे नागरिकांना इंधन उपलब्ध होणार नाही.
सहा ऑगस्टला माझ्या भावाची परीक्षा होती. तो संध्याकाळी अभ्यासात व्यग्र होता तेव्हाच काश्मीर विद्यापीठाने उरलेल्या परीक्षा रद्द केल्याची सूचना आली.
मी रात्री साडेदहा वाजता मैत्रिणीला मोबाईलवरून मेसेज करत होते, पण तो जातच नव्हता. तरी, माझ्या घरातलं इंटरनेट सुरू होतं, त्यामुळे फोन-इंटरनेट असं सगळंच बंद करण्यात आलं असेल, असं काही माझ्या मनात आलं नाही. माझे आईवडील दिल्लीला होते, त्यामुळे मी त्यांना तेवढा मेसेज केला आणि झोपले.
सोमवार
सोमवारी सकाळी मी उठले तेव्हा स्वयंपाकघरात विचित्र शांतता होती. एरव्ही मी सकाळी उठते तेव्हा गुलिस्तान वाहिनीवरील सकाळच्या कार्यक्रमाचे आवाज येत असतात. आज मात्र सगळे शांत बसून नाश्ता करत होते.
पहाटे चार वाजल्यापासून सैन्यदलांचे जवान आमच्या घराबाहेर तैनात आहेत, असं मला सांगण्यात आलं. टीव्ही, लँडलाईन, मोबाईल वगैरे काहीच चालत नव्हतं.
बहुतांशवेळा संचारबंदी असली तरी बीएसएनएलच्या लँडलाईन फोनची सेवा ते सुरू ठेवतात, पण या वेळी तीसुद्धा बंद करण्यात आली.
आम्हाला अन्नाची काळजी वाटत होती. सगळी दुकानं बंद होती. कोणीही दुकानदार बाहेर दिसत नव्हता. माझे काका काही भाज्या मिळतायंत का ते शोधायला बाहेर गेले. पण एका सैनिकाने त्यांना थांबवलं आणि 'बाहेर फिरत राहिलात तर तुम्हीच अडचणीत याल' असा इशारा दिला.
काका रिकाम्या हाताने परत आले. जास्त लांब चालत जायची त्यांना भीती वाटली आणि वाटेत एक दुकान उघडं दिसलं, पण तिथल्या सगळ्या भाज्या संपल्या होत्या.
सुदैवाने काकूने घरात बाकीच्या गरजेच्या वस्तू साठवून ठेवल्या होत्या. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात भारत व पाकिस्तान यांच्यामधील तणाव वाढला तेव्हा आपण युद्धकाळात जगायची तयारी कशी करून ठेवली होती, हे काकूने अभिमानाने सांगितलं.
'जवळपास दोन महिन्यांसाठी लागतील अशा वस्तू व अन्नपदार्थ मी घरात साठवून ठेवले होते,' ती मला म्हणाली. त्याच तत्परतेने तिने याही वेळी शनिवार-रविवारमध्ये अनेक वस्तू विकत घेऊन ठेवल्या.
काश्मिरींसंबंधी कोणता निर्णय घेतला जाणार आहे, याबद्दल अस्पष्टता होती. मशिदीवरून नमाज पढून परतणाऱ्या माणसांकडूनच थोडीफार माहिती कानावर पडली.
दुपारनंतर कलम 370 रद्द करण्यात आल्याची बातमी घरापर्यंत आली. मशिदीत कोणीतरी यासंबंधी बोलत होतं, असं काका म्हणाले. पण हीसुद्धा अफवा असेल, असं म्हणून आम्ही त्यांची माहिती झिडकारली.
सध्या राज्य सरकार अस्तित्त्वात नाही, निवडणुका तोंडावर आहेत आणि हा प्रश्न अजूनही न्यायालयात आहे, अशा परिस्थितीत ते कलम 370 निश्चितपणे रद्द करणार नाहीत, असा युक्तिवाद मी चुलतभावाशी करत होते.
दुसरीकडे लक्ष गुंतवण्यासाठी आम्ही माझ्या लॅपटॉपवर चित्रपट बघण्यात दिवस घालवला. संध्याकाळी उशिरा टीव्हीवर काही वाहिन्यांच्या प्रदर्शनास त्यांनी मुभा दिल्याचं आम्हाला कळलं. टीव्ही सुरू केल्यावर केवळ दूरदर्शनच्या वाहिन्या सुरू झाल्याचं दिसलं. बाकीच्या वाहिन्या अजूनही बंदच होत्या.
आम्ही बातम्या लावल्या. राज्यसभेमध्ये 'जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक' मंजूर झाल्याचं तिथेच आम्हाला कळलं. काश्मीर व जम्मू हा आता केंद्रशासित प्रदेश झाला होता, तर लडाखला त्यांच्यापासून तोडून वेगळ्या केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. कलम 370 व 35 A रद्द करण्यात आले.
आम्हाला नजिकच्या आणि दूरच्या भविष्यात कोणत्या भयंकर परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे, याच्या कल्पनेनेच माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. पुढची पंधरा मिनिटं मी शांत बसून राहिले. समोर दिसणारी बातमी पचवत मी विचार करत होते. इतकी वर्षं आम्ही कित्येक विश्वासघाताच्या घटना सहन केल्या, त्या यादीत ही आणखी भर पडली.
सहा आणि नऊ वर्षांची माझी चुलतभावंडं कंटाळली, त्यामुळे आम्ही सगळे घराच्याच आवारातील बागेत खेळायला गेलो. या मुलांना आवडणारा 'आईस-वॉटर' खेळ आम्ही खेळायला लागलो, इतक्यात आमच्या बागेत अश्रुधूर पसरला.
दोन्ही लहान मुलं खोकायला लागली आणि त्यांच्या डोळ्यांमधून पाण्याच्या धारा लागल्या, पण हट्टानं त्यांनी खेळ सुरूच ठेवला. मी बळजबरीनेच त्यांना घरात परत नेलं आणि धुरापासून दूर जाण्यासाठी खोल्या पक्क्या बंद केल्या.
मंगळवार
दिल्लीला परत जाण्यासाठी मी गुरुवारच्या विमानाचं तिकीट काढलं होतं. सुरक्षितरित्या विमानतळापर्यंत पोहोचण्याची चिंता आम्हाला होती.
काकांचं घर तसं विमानतळाजवळच होतं, त्यामुळे बुधवारी अगदी तांबडं फुटण्याच्या आधीच विमानतळाच्या दिशेने निघायची योजना आम्ही आखली.
मंगळवारी दुपारनंतर त्यांनी बहुतेकशा टीव्ही वाहिन्यांचं प्रदर्शन सुरू केलं. आम्हाला बातम्या बघवतही नव्हत्या. इतर ठिकाणी लोक आनंद साजरा करत असल्याचं टीव्हीच्या पडद्यावर दिसत होतं.
कोणाशीही संवाद साधणं अशक्य झालेल्या अवस्थेत आम्ही आपापल्या घरांची दारं बंद करून बसलो होतो. आमच्या भवितव्याविषयी केंद्र सरकार सत्तेचा खेळ मांडत होतं आणि त्याबद्दल असहमती किंवा संताप व्यक्त करणंही आम्हाला शक्य उरलं नव्हतं.
मंगळवारी संध्याकाळी पुन्हा अश्रुधूर आमच्या घरात भरून राहिला. एक नातलग घरी आले होते. श्रीनगरमध्ये बाजारपेठेच्या परिसरात त्यांचं घर होतं, पण त्यांच्या घराबाहेर बरीच दगडफेक झाली आणि अश्रुधुराने मुलंही घाबरून गेली होती, त्यामुळे त्यांचं कुटुंब दूर अंतरावरच्या घरात राहायला जाणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.
एकाच खोलीत आपल्याला बंद करून ठेवावं, असा हट्टच मुलं धरत होती.
आमच्या घरांवर अनेक हेलिकॉप्टरं घोंघावत होती. घरात आम्ही अश्रुधुराने गुदमरत होतो, आणि वर हेलिकॉप्टरांचा आवाज वाढत होता, त्यामुळे बहुधा युद्धच सुरू झालं असावं, असं आम्हाला वाटत होतं. काही तरुण मुलांना जीव गमवावा लागला आहे आणि इतरही काही जीवितहानी झाल्याच्या बातम्या पुरुषमंडळींकडून मिळत होत्या, पण कोणालाच काही खात्रीने सांगता येत नव्हतं.
मंगळवारी रात्री माझा चुलतभाऊ कटरामधील एका विद्यापाठातून परतला. सर्व काश्मिरी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपापल्या घरी परत जावं, कारण महाविद्यालयाच्या आवारात व आवाराबाहेर त्यांच्या सुरक्षिततेला धोका आहे, अशा सूचना देण्यात आल्या. परत येताना सैन्यदलाच्या अनेक चौक्यांना तोंड देत, विनवणी करत तो घरी पोचला, पण या प्रवासासाठी त्याला तब्बल 24 तास लागले.
हे असं किती काळ सुरू राहाणार आहे, याच्या चिंतेतच मंगळवारची रात्र गेली.
बुधवार
मी पहाटे पाच वाजता उठले आणि पीरबागेच्या (विमानतळाजवळचा एक परिसर) दिशेने निघाले. काकूने अश्रुभरल्या डोळ्यांनी मल निरोप दिला. दुबईत काम करणाऱ्या तिच्या मुलाला फोन करावा, असंही तिने सांगितलं.
रविवारी रात्रीपासून त्याच्याशी फोनवर बोलत आलं नव्हतं, त्यामुळे तिची चलबिचल वाढली होती. पुन्हा कधी त्याच्याशी बोलायला मिळेल, याचाही काही अंदाज नव्हता. माझ्या माध्यमातून त्याच्यापर्यंत इथली वार्ता पोचवता आली असती.
बाहेर रस्त्यांवर सगळीकडे बॅरिकेड आणि काटेरी कुंपणं लावलेली होती. छोट्या मोकळ्या जागा शोधून आम्ही कशीबशी आमची कार पुढे नेत होतो. अजून धड उजाडलंही नव्हतं, त्यामुळे कोणी आम्हाला थांबवलं नाही.
पीरबागेच्या भोवतीही बॅरिकेड रचलेले होते. या भागातल्या अगदी लहानसहान गल्ल्यांमध्येही प्रवेशाला बंदी होती.
संध्याकाळी उशिरा माझ्या काकूला बातमी मिळाली की, तिच्या चुलतभावाच्या मुलाला अश्रुधुरामुळे गंभीर संसर्ग झाला असून ते सगळे घरातच अडकलेत. त्यांना औषधं आणण्यासाठीही घराबाहेर जाता आलं नाही, त्यांच्या कारमध्ये पेट्रोल नव्हतं, आणि संचारबंदीमुळे सार्वजनिक वाहतूकही उपलब्ध नव्हती.
गुरुवार
दिल्लीकडे रवाना होणं माझ्यासाठी अवघडच होतं. गेल्या चार दिवसांमध्ये मी आईवडिलांशी बोलूही शकले नव्हते. ते चिंताग्रस्त झाले असतील, याची मला जाणीव होती. पण काश्मीरमधल्या कुटुंबाचा निरोप घेणंही मला शक्य होत नव्हतं.
मी 'नॉर्मल' वातावरणात जात असताना या सगळ्यांना अशा अवस्थेत कसं सोडायचं, या विचाराने माझा गोंधळ उडाला. दिल्लीत परतल्यावर यासंबंधी काहीतरी करायचं, असा निर्धार करून मी निघाले.
दिल्लीत पोचल्यावर मी बाहेरगावी असलेल्या माझ्या सर्व चुलतभावंडांना फोन केला. नुकतीच काश्मिरात मी त्यांच्या आईवडिलांना भेटले, ते सुरक्षित आहेत, हेही कळवलं. त्यांच्या घरात आवश्यक किराणा सामान व औषधं साठवलेली आहेत, हेही भावंडांना सांगितलं.
निराशा व असहाय अवस्थेत या वर्षी ईद साजरी केली जाईल, आणि येणारा दीर्घ काळ हीच भावना आम्हाला अनुभवत राहावी लागेल, याबद्दलही आम्ही बोललो.
(लेखिकेने सेंट स्टीफन्स कॉलेजमधून तत्त्वज्ञानाची पदवी (ऑनर्स) घेतली आहे. सध्या त्या दिल्ली विद्यापीठातील फॅकल्टी ऑफ लॉ इथल्या कॅम्पस लॉ सेंटरमध्ये कायद्याचा अभ्यास करत आहेत.)
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)