You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोटरसायकल रेसिंगच्या विश्वचषकावर नाव कोरणारी ऐश्वर्या पिस्साई
- Author, इमरान कुरेशी
- Role, बंगळुरूहून बीबीसी हिंदीसाठी
बंगळुरूची ऐश्वर्या पिस्साई चार दिवसांपूर्वी आपला 24 वा वाढदिवस साजरा करायला घरी आली. तिचा हा वाढदिवस खास होता. कारण ती नुकतीच एफआयएम विश्वचषकाच्या महिला विभागामध्ये जिंकणारी पहिली भारतीय बनली आहे.
या स्पर्धेमध्ये मोटरसायकलवर स्वार होत वेगवेगळ्या भागांमधून प्रवास करावा लागतो. यामध्ये चिखल, दलदल आणि खडकाळ रस्त्यांचाही समावेश असतो. दोन दिवसांमध्ये 800 ते 1000 किलोमीटरचं अंतर पार करावं लागतं.
रविवारी (11 ऑगस्ट) हंगेरीमध्ये पार पडलेल्या या टूर्नामेंटमध्ये 25 वर्षांखालील वयोगटामध्ये ती दुसऱ्या क्रमांकावर होती. महिला आणि पुरुष असे दोघेही या स्पर्धेमध्ये भाग घेतात.
ऐश्वर्याने दुबईमध्ये झालेल्या पहिल्या राऊंडमध्ये विजय मिळवला. मग पोर्तुगालमध्ये ती तिसऱ्या क्रमांकावर होती. स्पेनमध्ये तिनं पाचवा आणि हंगेरीत चौथा क्रमांक पटकावला.
पूर्ण स्पर्धेमध्ये ऐश्वर्याने एकूण 65गुण मिळवले. संपूर्ण स्पर्धेत ती दुसऱ्या क्रमांकावर होती पण महिला गटात ती सर्वात आघाडीवर होती. पोर्तुगालच्या रीता वाइयेरियाला तिच्यापेक्षा चार गुण कमी मिळाले आणि ती दुसऱ्या क्रमांकावर आली.
मोटरसायकल रेसिंगबद्दल ऐश्वर्या सांगते, "हेल्मेट घातल्यानंतर जसं मुलगा आहे की मुलगी हे समजत नाही त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्येही तुम्ही मुलगा आहात की मुलगी याने काही फरक पडत नाही."
लहानपणापासून रेसिंगची आवड
ऐश्वर्या लहान असताना तिला हे समजायचं नाही की बाबांच्या मोटरसायकलच्या हँडलशी खेळताना तिला इतकी मजा का येते.
बीबीसी हिंदीशी बोलताना तिनं सांगितलं, "जेव्हा कधी बाबा मला त्यांच्या मोटरसायकलच्या टाकीवर बसवायचे तेव्हा मला हँडलसोबत खेळायला आवडायचं. मला तेव्हा माहीत नव्हतं, की एक दिवस मी रेसिंगमध्ये जाईन."
१८ वर्षांची असताना ऐश्वर्याने एका ट्रेनिंग अॅकॅडमीमधून मोटरसायकल रायडिंगचं ट्रेनिंग सुरू केलं. तेव्हा 'हे मुलांचं काम आहे. तू दुसरं एखादं साधं काम करं, हे क्षेत्र मुलींसाठी नाही,' असं अनेकांनी तिला सांगितलं.
ऐश्वर्या म्हणते, "पण ट्रेनिंगदरम्यान माझे सहकारी, कोच आणि मोटर स्पोर्ट्स फेडरेशनने नेहमीच मला मदत केली. त्यांनी मला ट्रेनिंग दिलं. त्यानंतर कोणी असं बोललं तरी माझ्यावर परिणाम नाही व्हायचा."
त्यानंतर अशी एक गोष्ट घडली ज्यामुळे पुढे जाण्याचे ऐश्वर्याचे मनसुबे आणखी मजबूत झाले. ती सांगते, "पहिली रेस हरल्यानंतर मला पुढे जाण्याची आणि आणखी चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली." ती अधिक कठोर ट्रेनिंग घ्यायला लागली.
'द डकार' वर लक्ष
पॅरिसपासून सेनेगलची राजधानी डकारपर्यंत होणाऱ्या मोटरसायकल रॅलीला 'द डकार' म्हटलं जातं. या स्पर्धेला सगळ्यात कठीण क्रॉस-कंट्री रेस मानलं जातं. ही स्पर्धा पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये होणार आहे. ऐश्वर्या आता या स्पर्धेचीच तयारी करतीये.
ती म्हणते, "तुमच्याकडे ट्रेनिंग असणं गरजेचं असतं. आणि जर 'द डकार'मध्ये ड्राईव्ह करायचं असेल तर अनुभवाचाच फायदा होतो."
ज्या स्पर्धेमध्ये ऐश्वर्याने भारतासाठी रेकॉर्ड केला, त्यामध्ये ती 250 सीसीची बाईक चालवत होती. त्याचवेळी इतर स्पर्धकांकडे450 सीसीची मोटरसायकल होती.
ऐश्वर्या म्हणते, "मी जिथेही जाते तिथे मला इतरांसारखी मोटरसायकल मिळत नाही. त्यांच्याकडे स्वतःची 450 सीसीची मोटरसायकल असते. यामुळे फरक तर पडतोच. स्पीड वाढवायला मदत मिळते पण तुमचं कौशल्यच सर्वात जास्त फायद्याचं ठरतं."
आपलं कौशल्य वाढवण्यासाठी ऐश्वर्याला 'मेरी कॉम' चित्रपटातून प्रेरणा मिळाली. ही फिल्म तिनं अनेकदा पाहिली आहे. या फिल्ममध्ये बॉक्सर मेरी कॉमची भूमिका करणारी प्रियांका चोप्रा आपली आवडती अभिनेत्री असल्याचं ती सांगते. पण आपला आवडता अभिनेता कोण हे मात्र ती सांगू शकत नाही.
ऐश्वर्याला घरचं जेवण अतिशय आवडतं. ती म्हणते, "जेव्हा तुम्ही भरपूर काळ बाहेर राहून परतता तेव्हा घरी बनवलेलं जेवण हवं असतं. मसाला डोसा माझा फेव्हरेट आहे."
'द डकार' रॅलीसाठी ऐश्वर्या झोकून देऊन तयारी करतीये आणि यामध्ये तिला मजा येतीये. ती म्हणते, "ज्यामध्ये थ्रिल असेल अशा गोष्टी करायला मला लहानपणापासून आवडतं."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)