You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काश्मीर कलम 370 : 'विरोधाचं प्रतीक बनलेल्या व्हायरल फोटोची खरी कहाणी
- Author, प्रशांत चहल
- Role, फॅक्ट चेक टीम, बीबीसी न्यूज
सोशल मीडियावर काश्मीरमधल्या एका शाळकरी मुलाचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमागचे सत्य तपासण्याचा प्रयत्न बीबीसीने केला आहे.
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढण्याच्या निर्णय घेतला. हा फोटो म्हणजे या निर्णयाविरोधात भारत प्रशासित काश्मीरच्या 'विरोधाचं प्रतिक' म्हटलं जातंय.
सोमवारी कलम 370 रद्द करण्याच्या घोषणेनंतर हा फोटो भारत आणि पाकिस्तानात व्हायरल होतोय.
#KashmirBleedsUNSleeps, #SaveKashmirSOS आणि #ModiKillingKashmiris यासारख्या हॅशटॅगसोबत हा फोटो ट्विटर आणि फेसबुकवर शेकडोवेळा पोस्ट करण्यात आला आहे.
काही लोकांचा दावा आहे की हा फोटो काश्मीरमधल्या सध्याच्या तणावादरम्यानचा आहे. मात्र, हे खरं नाही.
हा फोटो वर्षभरापूर्वीचा आहे आणि फोटो जर्नलिस्ट पीरजादा वसीम यांनी उत्तर काश्मीरमध्ये हा फोटो काढला होता.
या फोटोविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही श्रीनगरमध्ये राहणारे 24 वर्षीय वसीम यांच्याशी बोललो.
कधी आणि कुठचा आहे फोटो?
पीरजादा वसीम सांगतात की त्यांनी हा फोटो 27 ऑगस्ट 2018 रोजी श्रीनगरच्या वायव्येकडे असलेल्या सोपोरमध्ये काढला होता.
26 ऑगस्ट 2018 रोजी श्रीनगर आणि अनंतनागसह दक्षिण काश्मीरच्या काही भागांमध्ये सर्वोच्च न्यायालय कलम 35-A वर सुनावणी करणार असल्याची अफवा पसरली होती.
वसीम सांगतात की या अफवेमुळे फुटीरतावादी गटांनी काश्मीरच्या अनेक भागांमध्ये बंदचं आवाहन केलं होतं. मोर्चा काढण्याचीही धमकी दिली होती.
वसीम यांनी गेल्या वर्षी पसरलेल्या अफवेविषयी जी माहिती बीबीसीला दिली, त्याची जम्मू-काश्मीरचे एडीजी (सुरक्षा) मुनीर अहमद खान यांचं एक ट्वीट पुष्टी करते.
मुनीर अहमद यांनी 27 ऑगस्ट 2018 रोजी हे ट्वीट केलं होतं. त्यात ते लिहितात, "सर्वोच्च न्यायालय आज कलम 35-A वर सुनावणी करणार असल्याची अफवा पसरली आहे. हे सत्य नाही. अशी अफवा पसरवणाऱ्याची आम्ही चौकशी करत आहोत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल."
मात्र, या अफवेमुळे श्रीनगर, अनंतनाग आणि सोपोरच्या काही भागांमध्ये तीन दिवस बंद पाळण्यात आला. काही ठिकाणी सैन्याची आंदोलनकांशी हिंसक चकमकही उडाली.
फोटोमागचं सत्य
गेल्या चार वर्षांपासून काश्मीर खोऱ्यात फोटो जर्नलिस्ट म्हणून काम करणारे पीरजादा वसीम यांनी बीबीसीला सांगितलं की कलम 35-A विषयीच्या अफवेमुळे संपूर्ण खोऱ्यात तणाव होता. सोपोरमध्ये परिस्थिती अधिकच चिघळली होती.
ते सांगतात, "सोपोरमध्ये जमावाला शांत करणं सीआरपीएफच्या जवानांना कठीण होऊन बसलं होतं. जेव्हा मी तिथे पोचलो तेव्हा अनेकांकडे अशी माहिती होती की सर्वोच्च न्यायालयाने काश्मीरमधून कलम 35-A रद्द केलं आहे. अफवा मोठ्या प्रमाणात पसरली होती."
"पोलिसांनी शाळा-महाविद्यालयं आधीच बंद करायला सांगितली होती. मात्र, मी जेव्हा सोपोरमध्ये पोचलो तेव्हा तिथल्या मुख्य चौकातली दुकानं सुरू होती. थोड्या अंतरावर घोषणाबाजी सुरू होती. सीआरपीएफचे जवान नाकाबंदी करत होते."
वसीम सांगतात की बघता बघता सोपोरच्या मुख्य चौकातल्या एका दिशेने दगडफेक सुरू झाली. जवानांनी पॅलेट गनने त्याला उत्तर दिलं.
ते पुढे म्हणतात, "गोळीबार सुरू होताच व्यापारी दुकानं बंद करून गल्लीत पळून गेले. तेवढ्यात शालेय गणवेशातल्या 6-7 मुलांचा एक घोळका गल्लीतून येत असल्याचं मला दिसलं. व्यापाऱ्यांनी घाईगडबडीत दुकानांच्या बाहेर सोडून दिलेल्या खुर्च्या त्यांनी उचलल्या."
"यातल्या एका मुलाने एका दुकानासमोर खुर्ची टाकली. तो तिथे बसला आणि ओरडला, 'आता गोळी झाडा. बघूच किती हिंमत आहे'."
फोटोत दिसणारा मुलगा त्यावेळी अकरावीत शिकत असल्याचा वसीम यांचा दावा आहे.
मुलाचं काय झालं?
मात्र, जवानांनी या मुलावर पॅलेट गन झाडली का? यावर वसीम सांगतात जवानांनी गोळ्या झाडल्या होत्या. मात्र, छर्रे त्या मुलाला लागले नाही.
ते सांगतात, "सोपोरमध्ये झालेल्या या चकमकीत इतर काही शालेय विद्यार्थी पॅलेट गनच्या गोळीबारात जखमी झाले होते. यातल्या काही विद्यार्थ्यांना मी हॉस्पिटलमध्ये भेटलो. हा सगळा गोंधळ जवळपास तीन दिवस सुरू होता."
27 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2018 या दरम्यान माध्यमांमध्ये जवान आणि स्थानिकांमध्ये झालेल्या चकमकीच्या बातम्या छापून आल्या होत्या. मात्र, या चकमकीत कुणी ठार झाल्याचं वृत्त नाही.
पीरजादा वसीम सांगतात की 2018 सालीसुद्धा त्यांनी काढलेला हा फोटो खूप शेअर झाला होता.
फुटीरतावादी नेते मीरवाईज उमर फारुख यांनी हा फोटो शेअर करत लिहिलं होतं, "आमच्या तरुणांवर पॅलेट गन झाडून त्यांना अंध करण्यात येत असल्याचं ऐकून वाईट वाटतं. तेही त्या देशाकडून जो स्वतःला अहिंसेचा पुरस्कर्ता म्हणतो. जे केवळ मूलभूत अधिकारांची मागणी करत आहेत त्यांच्याशी हा देश इतका अमानवी व्यवहार करतोय."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)