काश्मिरी घरांमध्ये भारतीय सैन्यानं आग लावण्यामागचं सत्य - फॅक्ट चेक

    • Author, फॅक्ट चेक टीम
    • Role, बीबीसी न्यूज

सोशल मीडियावर जळणाऱ्या घरांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. भारत प्रशासित काश्मीरमधल्या बांदिपुरा परिसरात भारतीय सैन्याने लोकांच्या घरांमध्ये आग लावल्याचा दावा करत हा व्हीडिओ शेअर केला जात आहेत.

सुमारे सव्वा मिनिटांचा हा व्हीडिओ फेसबुकवर 10 हजारपेक्षाही जास्त वेळा शेअर करण्यात आला आहे. तीन लाखांहून अधिक वेळा तो पाहिला गेला आहे.

पण आम्ही केलेल्या तपासणीत हा दावा चुकीचा असल्याचं सिद्ध झालं आहे. हे प्रकरण काही सध्याचं नाही. तर दीड वर्षांपूर्वीची ही घटना आहे.

काश्मीरमधून चालणारं रायझिंग काश्मीर आणि काश्मीर ऑब्झर्व्हर या न्यूज पोर्टलनुसार 27 मार्च 2018ला उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या लाचीपोरा गावात ही घटना घडली होती.

या गावात चार घरांमध्ये आग लागली होती. यामुळे सात कुटुंबांना याचा फटका बसला होता. सुमारे 20 जनावरं या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती.

जवळपास कोणतीच अग्निशमन सुविधा नसल्यामुळे आग इतकी वाढल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता.

आणखी काही चुकीच्या बातम्या

सोमवारी राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात येणार असल्याची घोषणा केली. या घोषणेपूर्वी जम्मू-काश्मीरमधली इंटरनेट आणि टेलिफोन सेवा बंद करण्यात आली होती. शनिवारी जम्मू-काश्मीरमध्ये अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आलं होतं. यानंतर अनेक घडामोडी घडू लागल्या.

आतासुद्धा जम्मू-काश्मीरचा संपर्क तुटलेलाच आहे. तिथल्या स्थितीबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. पण या दरम्यान सोशल मीडियावर जम्मू-काश्मीरशी संबंधित अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. त्यांचा सत्य जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला.

काश्मिरी झेंडा हटवला?

उजव्या विचारसरणीच्या सगळ्याच फेसबुक ग्रुप्समध्ये श्रीनगरच्या सचिवालयाचा एक फोटो शेअर केला जात आहे. यामध्ये सरकारी इमारतीवरून आता काश्मीरचा झेंडा हटवण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.

आमच्या पडताळणीत आम्हाला आढळलं की हा फोटो 2016 मधला आहे. याला पूर्वीचा फोटो आणि आताचा फोटो अशी तुलना करण्यासाठी वापरण्यात येत आहे.

या फोटोला एडिट करून यातून काश्मीरचा झेंडा हटवण्यात आला आहे. इमारतीच्या वर फक्त तिरंगा लावण्यात आला आहे.

सोशल मीडियावर चुकीच्या माहितीसह शेअर करण्यात येत असलेले हे दोन्ही फोटो लक्ष देऊन पाहिल्यास इतर सगळ्या गोष्टी जशाच्या तशा असल्याचं तुम्हाला दिसेल.

न्यूज एजन्सी एएनआय, माजी आयएएस अधिकारी शाह फैसल आणि भाजपचे काश्मीरचे प्रवक्ते अल्ताफ ठाकूर यांनीही काश्मीरच्या सचिवालयावर पूर्वीप्रमाणेच दोन्ही झेंडे असल्याचं मान्य केलं आहे.

पोलिसांचा लाठीचार्ज

उजव्या विचारसरणीचे अनेक यूजर सोशल मीडियावर मुस्लिमांना मारहाण केली जात असल्याचा एक व्हीडिओ शेअर करत आहेत. जम्मू-काश्मीरच्या पोलिसांनी आंदोलकांना आणि दगडफेक करणाऱ्यांना मारण्यास सुरूवात केली असा दावा व्हीडिओ शेअर करताना केला जात आहे.

यामध्ये पोलीस काही जणांना मारताना दिसत आहेत. काही ग्रुप्समध्ये हे शेअर करताना लिहिलं आहे, काश्मीरमध्ये कलम 370 आणि 35 A हटवल्यानंतर प्रसादवाटप सुरू झालं.

पण ही दिशाभूल करणारी माहिती आहे. रिव्हर्स इमेज सर्चने तुम्हाला कळू शकेल. हा व्हीडिओ ऑगस्ट 2015 मधला आहे. ही घटना बिहारची राजधानी पटनामधल्या गर्दनीबाग परिसरात घडली होती.

जुन्या मीडिया रिपोर्टनुसार, मदरशांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांनी राज्यातील 2400 मदरशांमधली कामाची स्थिती सुधारण्याच्या मागणीसाठी गर्दनीबाग स्टेडियमवर आंदोलन केलं होतं. आंदोलक स्टेडियमबाहेर येताच पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला होता.

या घटनेनंतर पोलिसांनी यावर स्पष्टीकरणही दिलं. आंदोलक मुख्यमंत्री निवासाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होते असं पोलिसांनी सांगितलं.

गिलानींचा जुना व्हीडिओ

पाकिस्तानात भारत प्रशासित काश्मीरचे फुटीरतावादी नेते आणि हुर्रियत कॉन्फरन्स (गिलानी गट) चे अध्यक्ष सईद अलीशाह गिलानी यांचा एक व्हीडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

भारत सरकारने कलम 370 हटवण्यापूर्वी गिलानी यांना कशा प्रकारे अटक केलं हे पाहा, असं सांगत हा व्हीडिओ शेअर करण्यात येत आहे.

या व्हीडिओत गिलानी बोलत आहेत. दरवाजे उघडा, मी भारतीय लोकशाहीच्या अंत्ययात्रेत सहभागी होणार आहे.

पण या व्हीडिओचा जम्मू-काश्मीरच्या सध्याच्या घडामोडींशी संबंध नाही. हा व्हीडिओ एप्रिल 2018 चा आहे.

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार एप्रिल 2018 मध्ये शोपियाँ जिल्ह्यात भारतीय सैन्य आणि कट्टरतावाद्यांमध्ये झालेल्या तीन मोठ्या एनकाऊंटरनंतर सईद अलीशाह गिलानी यांच्यासह इतर फुटीरतावादी नेत्यांनी मोर्चा काढणार असल्याचं घोषित केलं होतं.

पण भारतीय सैन्याने गिलानी यांना मोर्चा सुरू करण्यापूर्वीच त्यांच्या घरात नजरकैद केलं. व्हायरल होणारा हा व्हीडिओ त्यावेळचा आहे.

पाकिस्तानमध्ये यापूर्वी फुटीरतावादी नेते यासीन मलिक यांची दिल्लीतील तिहार जेलमध्ये मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. यानंतर जेल प्रशासनाने हे वृत्त फेटाळलं आणि यासीन मलिक ठिक असल्याचं स्पष्ट केलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)