You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कलम 370 : काश्मिरी नागरिकांचं काय आहे म्हणणं - ग्राऊंड रिपोर्ट
- Author, झुबैर अहमद
- Role, बीबीसी प्रतिनिधी
मी ही बातमी ऐकल्यावर मला दोनदा टॉयलेटला जावं लागलं - ही प्रतिक्रिया होती काश्मीरमधील भारतीय जनता पक्षाशी निगडीत असणाऱ्या एका मुस्लीम नेत्याची. कलम ३७० वर भारत सरकारचा निर्णय जाहीर होण्याआधी त्यांना खूप दडपण आलं होतं.
बीबीसीला त्यांनी सांगितलं, "मी अजूनही धक्क्यात आहे. सगळ्याच काश्मिरींना इतका मोठा धक्का बसलाय की हे सगळं नेमकं कसं झालं हे कोणाच्याच लक्षात येत नाहीये. असं वाटतंय की आता काही क्षणांनी ज्वालामुखीचा स्फोट होणार आहे."
संसदेमध्ये गृहमंत्री अमित शाहांनी कलम ३७० विषयीची घोषणा करण्यापूर्वी काही दिवसांपासूनच काश्मीरबद्दलच्या विविध शंका व्यक्त केल्या जात होत्या. पण जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारं कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येईल असं फार कमी लोकांना वाटलं होतं.
वरवर पाहता खोऱ्यात शांतता आहे. एका ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की हिंसेच्या तुरळक घटना वगळता सगळीकडे शांतता आहे.
काश्मीरमध्ये जन्माला येणाऱ्या पिढ्या हे विसरू शकणार नाहीत
भारतीय घटनेचा अभ्यास असणारे एक ज्येष्ठ तज्ज्ञ जफर शाह यांनी बीबीसीसोबत बोलताना भारत सरकारचा हा निर्णय घटनेच्या विरोधात असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, "माझ्या मते हा निर्णय संविधानाच्या विरोधात आहे. ३५ए चं प्रकरण अजूनही सुप्रीम कोर्टात आहेत. अशामध्ये या निर्णयालाही न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं."
जफर शाह यांच्या मते हा निर्णय धक्कादायक असून काश्मीरमध्ये जन्माला येणाऱ्या पिढ्या हे विसरू शकणार नाहीत. लोकांच्या रागाला हिंसक वळण लागू शकतं, हे पोलिसही मान्य करतायत.
राशिद अलींचं औषधाचं दुकान आहे. ते म्हणतात, "अवघ्या काश्मीर खोऱ्याला एका खुल्या तुरुंगाचं स्वरूप आलंय. नेत्यांना नजरकैद करण्यात आली आहे. सगळीकडे पोलीस आणि सुरक्षा दलं तैनात आहेत. सगळीकडे कर्फ्यू आहे. अशामध्ये लोकांचं घरातून बाहेर पडणं कठीण झालंय. हे सगळं जेव्हा हटवण्यात येईल, तेव्हा लोक रस्त्यावर उतरतील."
जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवण्याच्या निर्णयावर खोऱ्यातल्या लोकांचं असं म्हणणं आहे की जर भारतामध्ये तेलंगणासारखी नवी राज्य तयार होऊ शकतात तर मग जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून का घेतला जात आहे.
श्रीनगरला एखाद्या वॉर झोनचं रूप
मंगळवारी दिवसभर मी श्रीनगरच्या अनेक मोहल्ल्यांमधून फिरलो. कोपऱ्याकोपऱ्यावर सुरक्षारक्षक तैनात आहेत. प्रत्येक मोठा रस्ता आणि महत्त्वाच्या इमारतींबाहेर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.
श्रीनगरला एखाद्या वॉर झोनचं रूप आलंय. दुकानं आणि बाजार बंद आहेत. शाळा-कॉलेजंही बंद आहेत. लोकांनी काही दिवसांसाठी पुरेल इतकं अन्नधान्य आणि गरजेच्या इतर वस्तूंची तजवीज केलेली आहे. पण पुढच्या काही दिवसांत जर दुकानं उघडली नाहीत, तर लोकांना अडचणींचा सामना करावा लागेल.
टेलिफोन लाईन्स, मोबाईल कनेक्शन्स आणि ब्रॉड बॅण्ड सेवा बंद करण्यात आल्या आहेत. आमच्यासारख्या दिल्लीहून आलेल्या पत्रकारांना एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतोय. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार पुढच्या काही दिवसांमध्ये ना कर्फ्यू हटेल ना फोन लाईन्स - मोबाईल्स सेवा सुरू होतील.
शहरातल्या मुख्य बस स्थानकावर अडकलेल्यांची संख्या शेकडोंमध्ये आहे. हे ते लोक आहेत जे दुसऱ्या राज्यांतून आले होते किंवा असे काश्मिरी आहेत ज्यांना खोऱ्यातून बाहेर पडायचंय.
मंगळवारी सकाळी ६ वाजल्यापासून शेकडो प्रवासी आपल्या सामानासकट बसची वाट पाहत उभे होते. पोलिस त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होते. पण बसेसची संख्या कमी असल्याने अडचणी वाढल्या आहेत.
स्थलांतरित मजूर बाहेर पडण्याच्या प्रयत्नात
बिहारमधून आलेले मजूर एका गटाने वेगळीकडे उभे राहून बसची वाट पाहत होते. ते गेल्या दोन दिवसांपासून काश्मीर खोऱ्यातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नांत असल्याचं त्यांनी सांगितलं. पण ते अजूनही इथेच अडकले आहेत.
त्यातल्या एकाने सांगितलं, "दोन दिवस झाले आम्ही काही खाल्लेलं नाही, मोबाईल सुरू नसल्याने घरी फोनही करू शकलो नाही. आम्ही त्रस्त आहेत."
तर स्थानिकांना मोकळेपणाने बोलायला भीती वाटतेय. पण जे थोडी हिंमत गोळा करून बोलले, ते सरकारवर नाराज आहेत.
एअरपोर्टजवळच्या सुरक्षारक्षकांमधील एका काश्मिरी तरुणाने न घाबरता सांगितलं की हा निर्णय त्यांना मंजूर नाही. त्यांचं म्हणणं आहे की दहशतवाद पाहता गैर-काश्मिरी तरुण इथे येऊन स्थायिक होण्याची किंवा इथे मालमत्ता विकत घेण्याची शक्यता नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)