फारुख अब्दुल्लांना पिस्तूल रोखून सभागृहात आणू शकत नाही : अमित शाह #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. फारुख अब्दुल्लांना पिस्तूल रोखून सभागृहात आणू शकत नाही : अमित शाह

फारुख अब्दुल्लांना सभागृहात यायचंच नसेल तर मी पिस्तुल रोखून त्यांना आणू शकत नाही, असं विधान गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. कसभेत जम्मू-काश्मीर आणि कलम 370 वर चर्चा सुरू होती. या चर्चेदरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अमित शाह यांनी हे वक्तव्य केलं. हिंदुस्तान टाइम्स मराठीनं हे वृत्त दिलं आहे.

चर्चेदरम्यान फारूख अब्दुल्लांची कमतरता जाणवत आहेत. ते सभागृहात का उपस्थित नाहीत, असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना अमित शाह यांनी म्हटलं, "फारुख अब्दुल्ला ना अटकेत आहेत ना ते नजरकैदेत आहेत. ते आपल्या घरात मजेत आहेत."

दरम्यान, कलम 370 रद्द करण्याचा निर्णय लोकशाही विरोधी आहे. आम्ही याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असं फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलं. 'आम्हाला मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझा मुलगा तुरुंगात आहे,' असंही जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार फारुक अब्दुल्ला यांनी म्हटलं.

2. कलम 370 हटवण्याच्या निर्णयाचे ज्योतिरादित्य सिंधिंयांकडून समर्थन

जम्मू-काश्मिरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटविल्याबद्दल संसदेमध्ये काँग्रेस सरकारला विरोध करत असतानाच पक्षाचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ज्योतिरादित्य यांनी त्यासंबंधीचे ट्वीटही केले आहे. एनडीटीव्ही इंडियानं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

जम्मू-काश्मीर आणि लडाखसंबंधी उचलली गेलेली पावलं आणि या प्रदेशांचं भारतात पूर्णपणे एकीकरण करण्याचं मी समर्थन करतो. हा निर्णय राष्ट्रहितासाठी घेण्यात आला आहे, असं ज्योतिरादित्य यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

अर्थात, हा निर्णय घेताना घटनात्मक प्रक्रियेचं पालन केलं गेलं असतं तर कोणतेही प्रश्न उपस्थित झाले नसते, असंही सिंधिया यांनी म्हटलं आहे

3. मुख्यमंत्र्यांनी पूरपरिस्थितीमुळे थांबवली महाजनादेश यात्रा

मुंबई, ठाणे, नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रात सततच्या पावसामुळे पूर परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांची महाजनादेश यात्रा सोडून मुंबईत परतणार असून पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी (7 ऑगस्ट) होणार आहे. लोकमतनं यासंबंधीची बातमी दिली आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विविध उपाययोजनांबाबत निर्णय घेण्यात येतील.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सध्या विदर्भात आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ती बुधवारी (7 ऑगस्ट) सकाळी बुलढाण्यामधून सुरू होणार होती.

4. पुणे-मुंबईत मुसळधार, मराठवाड्याला मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा

पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक पट्ट्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणं काठोकाठ भरली आहेत. या पाचही जिल्ह्यात सरासरी पाऊस झाला आहे, मात्र मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. सकाळनं हे वृत्त दिलं आहे.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात सरासरी 592 मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा मात्र 754.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात सरासरीच्या 18 टक्के कमी पाऊस झाला आहे.

5. नरेंद्र मोदींनी स्तुती केलेल्या अकोल्यातील शेतकऱ्यावर का आली आत्महत्येची वेळ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मधून जाहीर कौतुक केलेले शेतकरी मुरलीधर राऊत यांच्यावर सरकारी अनास्थेमुळे आत्महत्येची वेळ आली असल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. यामधून सरकारची शेतकऱ्यांप्रती निष्क्रियता आणि उदासीनता दिसून येत असल्याची टीकाही अशोक चव्हाण यांनी केली. लोकसत्तानं हे वृत्त दिलं आहे.

राष्ट्रीय महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मोबदला न मिळाल्यामुळे सोमवारी (5 ऑगस्ट) अकोला जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन केलं होतं. या घटनेवर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

"त्या सहा शेतकऱ्यांपैकी मुरलीधर राऊत यांचे अकोला-बाळापूर मार्गावर 'मराठा'नावाचं हॉटेल आहे. नोटाबंदीच्या काळात रोख रकमेची आणि सुट्या पैशांची मोठी अडचण निर्माण झाली होती. त्या काळात मुरलीधर राऊत यांनी प्रवाशांसाठी विनाशुल्क जेवणाची व्यवस्था केली होती," असं चव्हाण यांनी सांगितलं. त्यांच्या याच कामाची दखल खुद्द पंतप्रधानांनीच 'मन की बात'मधून घेतली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)