महालक्ष्मी: मुसळधार पाऊस, 12 तास आणि शेकडो असहाय्य प्रवासी...

    • Author, स्वाती पाटील राजगोळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

मुंबई ते कोल्हापूर असा प्रवास दररोज करणारी महालक्ष्मी एक्सप्रेस शुक्रवारीही आपल्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी कोल्हापूरकडे निघाली. गाडीत सुमारे 1,050 प्रवासी होते.

महालक्ष्मी एक्सप्रेस मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून निघून कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, सातारा आणि मिरजमार्गे रोज सकाळी 7 वाजून 25 मिनिटांनी कोल्हापुरात दाखल होते. रात्री साडेनऊच्या सुमारास गाडी कल्याणमध्ये दाखल झाली. तिथं काही वेळ थांबून ती पुढच्या प्रवासासाठी कर्जतच्या दिशने रवाना झाली.

प्रवाशांनी जेवण उरकून झोपायची तयारी सुरू केली. काहीजण अजूनही टिंगलटवाळी, टाईमपास करत होते. एकूणच एका रेल्वे प्रवासात जे काही घडतं, पाहायला मिळतं, ते सगळंच पद्धतशीरपणे सुरू होतं.

प्रत्येकाला आपल्या इच्छित स्थळी जाण्याची आस लागलेली होती. पण पुढे एका संकटाला सामोरे जाणार आहोत याची कल्पना कोणत्याही प्रवाशाला नव्हती.

पुरामुळे गाडी थांबली

सुरुवातीला रेल्वे वेळेवर धावत होती. पण अंबरनाथजवळ मुसळधार पावसामुळे रेल्वेमार्गावर पाणी साठलेलं होतं. त्यामुळे त्याठिकाणी काही काळ रेल्वे थांबवण्यात आली.

बराच वेळ गाडी थांबल्यानंतर प्रवासी अस्वस्थ झाले. पाणी थोडंसं कमी झाल्यानंतर गाडीने पुन्हा आपला रस्ता धरला. बदलापूर मागे टाकून गाडी पुढे निघाली. पण बदलापूरपासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर कासगावजवळ गाडी पुन्हा थांबली. काही वेळ गाडी थांबून पुन्हा पुढे निघेल अशी प्रवाशांना अपेक्षा होती. पण यावेळी मोठं संकट उभं राहिलं.

मुंबई ते पुणे रेल्वेमार्गावर कर्जत ते ठाण्यादरम्यान रेल्वेमार्गाला समांतर अशी उल्हास नदी वाहते. परिसरातील मुसळधार पावसामुळे नदीचं पाणी वाढायला सुरूवात झाली. रेल्वे ट्रॅकवरही मोठ्या प्रमाणात पाणी भरायला सुरुवात झाली होती.

साधारणपणे रात्री दीड-दोनच्या सुमारास रेल्वे वांगणीजवळ कासगाव इथं होती. त्यावेळी रेल्वे मार्गावर पाणी तुंबल्याचं रेल्वेचालकाच्या लक्षात आल्यामुळे गाडीचा वेग कमी करत त्याने गाडी थांबवली.

रेल्वेचालकाने ही बाब नियंत्रण कक्षाला कळवली आणि गाडी आहे त्याच ठिकाणी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रवाशांच्या सुरक्षेसाठीच हा निर्णय घेतल्याचं मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

पावसाचा जोर कमी होत नव्हता. त्यामुळे रेल्वेमार्गावरचं पाणी वाढायला सुरुवात झाली.

प्रवासी चिंतातूर

अंबरनाथप्रमाणे काही वेळानंतर गाडी पुन्हा पुढे निघेल, असा प्रवाशांना अंदाज होता. पण बराच वेळ झाला गाडी जागची हलली नाही. बरेच प्रवासी झोपलेले होते. पण जागे असलेल्या प्रवाशांनी अस्वस्थ होऊन खिडक्या उघडून पाहिलं. अंधार असल्यामुळे जास्त काही दिसत नव्हतं. गाडीच्या खिडक्या आणि दरवाजांतून बाहेर पडलेल्या प्रकाशात आजूबाजूला पाणी असल्याचं दिसून आलं.

त्यानंतर एकच गोंधळ सुरू झाला. आवाजामुळे झोपलेले प्रवासीही उठले. पाण्यात अडकल्याचं कळताच सगळ्याच प्रवाशांमध्ये अस्वस्थता पसरली . तितक्यात रेल्वे पोलिसांनी प्रत्येक डब्यात जाऊन प्रवाशांना गाडी थांबवण्यात आल्याची माहिती द्यायला सुरुवात केली. त्यांनी डब्यात जाऊन प्रवाशांना काळजी करण्याचं कोणतंही कारण नसल्याचं सांगितलं. तसंच लवकरच योग्य ती मदत मिळणार असल्याबाबत विश्वास दिला.

ती भयावह रात्र

पुरात अडकल्याची माहिती मिळाल्यापासूनच प्रवाशांमधली बेचैनी वाढत चालली होती. अनेकांनी आपल्या घरी तसंच जवळच्या व्यक्तींना फोन करून परिस्थितीची माहिती दिली. बघता बघता पाणी वाढू लागलं होतं. पावसाची रिपरिप सुरूच होती. कधी एकदा मदत मिळेल आणि इथून सुटका होईल, असा विचार सगळे करत होते. एक एक क्षण परीक्षा पाहणारा होता. भीतीने अनेकांची झोपसुद्धा उडून गेली.

काहीजण उजाडण्याची वाट पाहत होते. तोपर्यंत रेल्वेच्या पहिल्या पायरीपर्यंत पाणी वाढलं होतं. उजाडायला लागताच प्रवाशांना पुराची गंभीरता लक्षात आली. रेल्वेमार्ग थोडासा उंचावर होता. गाडीच्या चहूबाजूंना समुद्र असल्याचा भास सर्वांना झाला. साठ फूटांवर नदी आणि जवळची झाडं, आजूबाजूला दिसणाऱ्या तुरळक घरांनाही पाण्याने कवेत घेतलं होतं.

रेल्वेचे काही कर्मचारी सकाळी आले. अखेरीस एनडीआरएफचं पथक पाण्यात अडकलेल्या रेल्वेकडे दाखल झालं. मदत मिळाल्यानंतरच प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.

बचावकार्य सुरू

ठाणे जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ शिवाजी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून निघालेली महालक्ष्मी एक्सप्रेस बदलापूरजवळ पाण्यात अडकली असल्याची माहिती पहाटे 5 वाजून 53 मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळाली.

त्यानंतर जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी NDRF च्या पथकांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार अंधेरी इथून एनडीआरएफची 90 जणांची 3 पथकं वांगणीच्या दिशेने रवाना झाली.

तर ठाण्याहून TDRF चं (ठाणे महानगर पालिकेचं आपत्ती व्यवस्थापन पथक) एक पथक सोबत होतं. प्रचंड पावसात पायी पायी जात बचावकार्याच्या साधनासह ही पथक 8 च्या सुमारास महालक्ष्मी एक्सप्रेसजवळ पोहचली.

गाडीतले काहीजण स्वतःहूनच रेल्वेमार्गावरून चालत निघाले होते. त्या सात जणांना सर्वप्रथम सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. त्यांनतर बोटींमध्ये हवा भरून एनडीआरएफच्या जवानांनी अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढायला सुरुवात केली.

यात वयस्कर व्यक्ती आणि लहान मुलं यांना बोटीच्या सहाय्याने रस्त्यापर्यत आणण्यात आलं. जवळच असलेल्या मंगल कार्यालयात सर्व प्रवाशांसाठी चहा बिस्कीटांसह खाण्याचे पदार्थ उपलब्ध करुन देण्यात आले होते.

साधारण पाच ते सहा तास हे बचावकार्य सुरू होतं. महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये नऊ गर्भवती महिला प्रवास करत होत्या. त्यापैकी एका महिलेला गाडीत असतानाच प्रसूतीवेदना सुरू झाल्या होत्या. मात्र प्रशासनाकडन तब्बल २० डॉक्टरांची टीम याठिकाणी पोहोचल्याने सर्वांना वेळेवर मदत उपलब्ध करण्यात आली.

प्रवाशांचा अनुभव

रेल्वेने प्रवास करणारे स्वप्नील लुगडे यांनी देखील हा सगळा अनुभव सांगितला. नोकरीनिमित्त मुंबईत राहणारे स्वप्नील लुगडे दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी सुट्टी असल्याने रेल्वेने कोल्हापूरला येतात.

कालही संध्याकाळी ते याच रेल्वेने प्रवास करत होते. ते सांगतात, "रात्री साडेदहाच्या दरम्यान ट्रेन थांबल्याचं माझ्या लक्षात आलं पण थोड्या वेळाने सुरू होईल असं समजून बहुतांश प्रवासी झोपी गेले. पण पहाटे ३ वाजता ही ट्रेन पावसांच्या पाण्याने थांबल्याची माहिती मिळाली. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळं सकाळी ६ वाजता ट्रॅकवरचं पाणी ट्रेनच्या पहिल्या पायरीपर्यंत पोहचलं. त्यावेळी थोडं घाबरायला झालं. पण जसा पाऊस कमी झाला तसं पाणी ओसरायला सुरुवात झाली."

त्यानंतर बचावपथकाकडून मिळालेल्या मदतीने प्रवासी रेल्वेतून बाहेर पडले. पण पाण्याने भरलेल्या ट्रकवरून 700 मीटर चालत जात पुन्हा 4 किमी डोंगर चढत बदलापूर स्थानकाजवळ प्रवाशांना यावं लागलं. पण या कठीण प्रंसगात रेल्वेकडून केलेल्या नियोजन आणि योग्य माहिती मिळाल्याने सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडले. यात वांगणी ग्रामस्थांची मोठी मदत झाल्यालं लुगडे यांनी आवर्जून सांगितलं.

ग्रामस्थांचे सहकार्य

श्वास चित्रपटाच्या लेखिका माधवी घारपुरे या कोल्हापूरला कामानिमित्त येत होत्या. त्याही या ट्रेनमध्ये होत्या त्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाची मदत वेळेवर मिळाली नाही. हेलिकॉप्टरच्या चार फेऱ्या झाल्या मात्र मदत मिळू शकली नाही. वांगणी आणि आसपासच्या ग्रामस्थांनी प्रवाशांना धीर देत गाडीतून खाली उतरवलं. यावेळी प्रवाशांना समोसे बिस्कीटं असे खाद्यपदार्थ ग्रामस्थांकडून देण्यात आले. त्यानंतर बोटीच्या सहाय्याने बदलापूर स्थानकाजवळ पोहचवण्यात आलं.

दरम्यान, पावसाचा जोर कमी झाला आहे. पण ट्रॅकवर पाणी साठल्याने कर्जत ते कल्याण दरम्यान एकही रेल्वे सोडता आलेली नाही. महालक्ष्मी एक्सप्रेसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे. मात्र रेल्वे अजूनही तिथून हलवण्यात आलेली नाही, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार विवेक भावसार यांनी दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)