तुंबलेली मुंबई : पूर तर रशियात पण येतो - संजय राऊत

मुंबई मध्यरात्री पासून पावसाचा जोर कायम आहे. मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरात भिंत कोसळल्यानं 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पावसामुळे शाळा-कॉलेज आणि आफिसेसला सुट्टी देण्यात आली आहे. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मुंबईत दरवर्षी पाणी का तुंबतं याची कारणं वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

पूर तर रशियात पण येतो - संजय राऊत

मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुबंणं किंवा मालाडमध्ये झालेल्या दुर्घटेनेबाबत बोलताना, हे मुंबई महापालिकेचं अपयश नाही, हा अपघात आहे असं म्हणत संजय राऊत यांनी रशियामध्ये सुद्धा मॉस्कोत असा पूर येत असल्याचं म्हटलं आहे. मुंबईत खूप पाऊस पडतो, तसंच अनधिकृत बांधकाम सुद्धा त्याला जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

24 तासांमध्ये आणखी मुसळधार

येत्या 24 तासांमध्ये मुंबई आणि परिसरात आणखी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. मुंबई आणि उपनगर परिसरात 24 तासांमध्ये 200 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे.

भिंत कोसळून 18 ठार

मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरातल्या पिंप्रिपाडा परिसरात ही दुर्घटना घडली आहे. वस्तीला लागून असलेली ही भिंत कोसळल्यानं त्याखाली दबून आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 75 जण जखमी झाले आहेत.

NDRF ची घटनास्थळी दाखल झाली आहे. या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

मृतांच्या नातेवाईकांना राज्यसरकारनं 5 लाखांची मदत जाहीक केली आहे.

सार्वजनिक सुट्टी जाहीर

पावसामुळे नगरिकांची तारांबळ उडू नये म्हणून राज्य सरकारनं आज सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कोकण पट्ट्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

मुंबईत विक्रमी पाऊस

मुंबईत गेल्या 2 दिवसांमध्ये झालेला पाऊस हा गेल्या दशकातला सर्वाधिक पाऊस आहे, मुंबई महापालिकेनं म्हटलं आहे. साधारणतः संपूर्ण जूनमध्ये जेवढा पाऊस पडतो तेवढा म्हणजेच 550 मिलीमीटर पाऊस फक्त गेल्या 2 दिवसांमध्ये मुंबईत झाला आहे.

सकाळी 7 वाजता - लोकल सेवा विस्कळीत

रेल्वे रुळांवर पाणी आल्यामुळे मुंबईतल्या तिन्ही महत्त्वाच्या मार्गांवरची रेल्वे वाहतूक कोलमडली आहे. मध्य रेल्वेची सीएसटीएम-ठाणे, तर पश्चिम रेल्वेची बोरीवली-वसई वाहतूक ठप्प झाली आहे. हर्बर मार्गावरील वाशी-सीएसटीएम वाहतूक ठप्प आहे.

नवाब मलिकांच्या घरात घुसलं पाणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी त्यांच्या घरात रात्री उशीरा पाणी घुसल्याचे फोटो ट्वीट केले आहेत. हे ट्वीट करताना त्यांनी मुंबई महापालिकेतल्या सत्ताधारी शिवसेनेवर टीका देखील केली आहे.

मिठी नदीला पूर

मुंबईतल्या मिठी नदीला पूर आल्यामुळे कुर्ल्याच्या क्रांतीनगर भागातल्या जवळपास 1000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेकडून ही माहिती देण्यात आली आहे.

नौदल आणि NDRF ची मदत

तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईत जागोजागी सखल भागात पाणी तुंबलं आहे. या पाण्यातून वाट काढताना मुंबईकरांची दैना उडाली आहे. त्यामुळेच आता नौदलाच्या काही तुकड्या आणि NDRF च्या पथकांची मदत घेतली जात आहे.

INS तानाजीवरील एक तुकडी तसंच Material Organisation नं आपलं काम सुरू केलं आहे. नौदलाच्या डायव्हिंग टीमही या पथकांना मदत करणार आहेत.

INS तानाजीला तुंबलेलं पाणी आणि त्यात अडकलेल्या वाहनांमुळं अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांच्या वाहनांना घटनास्थळी पोहोचताना त्रास होत आहे. लाइफ जॅकेटसारखी सुरक्षेची साधनं घेऊन INS तानाजीची टीम पाण्यातून वाट काढत पायी जात आहे. वृद्ध, महिला आणि मुलांना सुरक्षित स्थळी हलविण्याला त्यांचं प्राधान्य असेल.

NDRF, अग्निशमन दल, नौदलाची पथकं तसंच स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीनं आतापर्यंत 1 हजार जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं आहे. नौदलाची पथकंही आवश्यकता पडल्यास मदत करण्यासाठी पूर्णपणे तैनात आहेत.

नाशिकमध्ये भिंत कोसळून 2 ठार

नाशिकमध्ये बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीसाठी बांधलेली पाण्याची टाकी कोसळून 2 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 1 जण जखमी झाला आहे.

कल्याणमध्ये भिंत कोसळून 3 ठार

कल्याण पश्चिमेकडील दुर्गाडी किल्ल्यासमोरच्या नॅशनल उर्दू हायस्कूलची संरक्षण भिंत कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर जखमी झाला आहे.

मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. मृतांमध्ये मध्ये २ महिला आणि ३ वर्षीय मुलाचा समावेश आहे. शोभा कांबळे (६०), करीना मोहम्मद चांद (२५) आणि हुसेन मोहम्मद चांद (वय), अशी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावं आहेत.

मुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतल्या परिस्थितीचा आढावा घेतला. पावसामुळं उद्भवलेल्या समस्यांसंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी पुणे, कल्याण तसंच मालाडमध्ये संरक्षक भिंती कोसळून घडलेल्या दुर्घटनांचा उल्लेख केला. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

मुंबईत अनेक ठिकाणी टेकड्यांच्या पायथ्याशी झोपड्या आहेत. येत्या दोन दिवसातला पावसाचा इशारा विचारात घेऊन लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मुंबईत जागोजागी पाणी तुंबण्याच्या समस्येवरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. मुंबईत सात ठिकाणी पंपिग स्टेशन सुरू करायचे होते. मात्र सध्या पाच ठिकाणीचं पंप सुरू आहेत. मोठ्या प्रमाणावर पाऊस आल्यामुळे पाणी अपेक्षित वेगानं उपसलं गेलं नाही आणि अनेक ठिकाणी वॉटर लॉगिंग पहायला मिळाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मध्य रेल्वेवरही फ्लडिंग झालं असून या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्यांचं फडणवीस यांनी म्हटलं.

मुंबईत हाय टाइडचा इशारा देण्यात आलाय. हाय टाइड आणि पावसामुळं शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

नालेसफाई न झाल्यामुळं पाणी तुंबलं का, या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी नकारात्मक उत्तर दिलं. नालेसफाई झाली नाही, असं म्हणता येणार नाही. पण पावसाची तीव्रता ही नाल्यांच्या ड्रेनेज वाहून नेण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक आहे. त्यामुळे पाणी तुंबण्याची समस्या निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)