You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तीन हजार कोटी खर्चून बांधलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’मध्ये घुसलं पावसाचं पाणी #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1. तीन हजार कोटी खर्चून बांधलेल्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'मध्ये घुसलं पावसाचं पाणी
तीन हजार कोटी रुपये खर्चून बनवलेल्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'च्या प्रेक्षक गॅलरीमध्ये पावसाचं पाणी घुसलं आहे. अनेक पर्यटकांनी फरशीवर पसरलेल्या तसंच छतावरून ठिबकणाऱ्या पाण्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एनडीटीव्ही इंडियानं ही बातमी दिली आहे.
सोशल मीडियावर हे व्हीडिओ आणि फोटो शेअर झाल्यानंतर लोकांनी मोदी सरकारच्या या प्रकल्पावर प्रश्न उपस्थित करायला सुरूवात केली आहे.
स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे. जगातील सर्वांत उंच पुतळा अशी याची ओळख आहे. नर्मदा नदीतील साधू बेटावर उभारण्यात आलेल्या या पुतळ्याचे लोकार्पण 31 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं.
पुतळ्याच्या गॅलरीत पाणी शिरल्याची बाब जिल्हाधिकारी आय. के. पटेल यांनी मान्य केली आहे. 135 मीटर उंचीच्या या गॅलरीसमोर ग्रिल लावण्यात आले आहेत. वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळं पावसाचं पाणी आतमध्ये घुसल्याचं पटेल यांनी सांगितलं.
2. विधानसभेसाठी संघटना मजबूत करा- राहुल गांधींचा महाराष्ट्रातील नेत्यांना सल्ला
लोकसभेची निवडणूक हरलो. पण, आता विधानसभा निवडणुकीसाठी तरी संघटना मजबूत करा. राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य मित्रपक्षांशी राज्य स्तरावर जागावाटपाची चर्चा सुरू करा, असा सल्ला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना दिला आहे. राहुल गांधी यांनी शनिवारी संध्याकाळी सुमारे दोन तास प्रदेश काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली. लोकसत्तानं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर पक्ष संघटना कमकुवत झाली असली तरी नव्या उमेदीनं काम करावं लागणार आहे. महाराष्ट्रासह, झारखंड, हरियाणा, दिल्ली या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून आपल्यामुळे प्रदेश स्तरावर पक्षनेत्यांची आणि कार्यकर्त्यांची अडचण होऊ नये यासाठी बैठका घेत असल्याचं राहुल यांनी पक्षनेत्यांना सांगितले
या बैठकीला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील, विजय वडेट्टीवार, वर्षां गायकवाड, रजनी पाटील, राजीव सातव, अमित देशमुख, माणिकराव ठाकरे आदी नेते बैठकीला उपस्थित होते.
3. आरोग्य मंत्रालयाच्या बैठकांमधून बिस्किटांऐवजी मिळणार बदाम, अक्रोड आणि खजूर
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आरोग्य मंत्रालयाच्या बैठकांदरम्यान चहासोबत बिस्कीटं देण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकांमधून कुकीज आणि इतर फास्ट फूडही हद्दपार होणार आहे. यापुढे बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना बदाम, चणे, अक्रोड, खजूर असे पौष्टिक पदार्थच दिले जातील. एबीपी माझानं हे वृत्त दिलं आहे.
आरोग्यमंत्र्यांनी यासंबंधी एक परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे. केवळ आरोग्य मंत्रालयाच्या बैठकीदरम्यानच नाही तर सरकारी कँटिनमधूनही बिस्कीट हटविण्याचा आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे.
प्लास्टिक बाटल्यांमधील पाणीही आरोग्याला हानीकारक असल्याचंही या परिपत्रकात म्हटलं असून येत्या काळात आरोग्य मंत्रालयाच्या बैठकांमधून बाटलीबंद पाणीही बाद होऊ शकते.
4. मुंबई-परिसरात पावसानं गाठली जून महिन्याची सरासरी
मुंबई आणि परिसरात शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या पावसामुळं जून महिन्यातील सरासरी गाठली गेली आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
शुक्रवारी रात्रभर पाऊस पडल्यानंतर शनिवारी सकाळी काही काळ पावसाने विश्रांती घेतली. मुंबईमध्ये शुक्रवारी सकाळी 8.30 ते शनिवारी सकाळी 8.30 या कालावधीमध्ये सांताक्रूझ येथे 234.8 मिलीमीटर आणि कुलाबा येथे 81.2 मिलीमीटर पाऊस पडला. त्यामुळे सांताक्रूझ येथे शनिवार सकाळपर्यंत एकूण 422.2 मिलीमीटर तर कुलाबा येथे 262.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
रविवारी बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडे कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे मध्य भारतातील मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी मदत होईल. येत्या पाच दिवसांमध्ये कर्नाटकची किनारपट्टी, कोकण, गोवा तसेच ओडिशा आणि छत्तीसगढमध्ये मान्सून स्थिरावेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
5. मुंबईतही राबवली जाणार प्रधानमंत्री आवास योजना
प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय) आता मुंबईतही राबविण्यात येणार आहे. पीएमएवाय योजनेचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी म्हाडा उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील गोरेगाव परिसरामध्ये पीएमएवाय योजनेंतर्गत तीन हजार घरे बांधण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. लोकमतनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यामुळे मुंबईमध्ये प्रथमच या योजने अंतर्गत घरे बांधण्याचा मार्ग खुला झाला आहे.
स्वत:चे घर घेणे परवडत नाही, अशा अल्प उत्पन्न गटातील नागरिकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेत अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना कमी दरामध्ये परवडणारी घरे बांधून देण्यात येतात.
2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत देशातील सर्वांना हक्काची घरे देण्याची घोषणा केली आहे. 2017 मध्ये या योजनेला सुरुवातही करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांमध्ये 11 लाख घरं पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)