You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बच्चू कडू: विमा कंपन्यांविरोधात मोर्चे काढणाऱ्या शिवसेनेचे नेते मंत्रिमंडळात झोपा काढतात का? #5मोठ्याबातम्या
वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या आहेत :
1) मंत्रिमंडळात शिवसेनेचे मंत्री झोपा काढतात का? : बच्चू कडू
"शिवसेनेचे नेते हे विमा कंपन्यांविरोधात मोर्चे काढत आहेत. पण सरकारमध्ये असताना ते शिवसेनेचे मंत्री झोपा काढतात का?" अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
पिकांचं नुकसान होऊन अनेक दिवस झाले तरी राज्यातील शेतकर्यांना पीकविम्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी तणावात आहेत. यावर केंद्र आणि राज्य सरकार काहीही करताना दिसत नाही, असं बच्चू कडू यांनी पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले.
शेतकऱ्यांना विमा देताना काही भ्रष्टाचार झाला का, याची चौकशी करायला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
"मी सर्व बँकांना, विमा कंपन्यांना 15 दिवसांची मुदत देतोय. 15 दिवसांत कर्जमुक्ती झालेल्या सर्व शेतकर्यांना पैसे मिळालेचं पाहिजेत," असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं.
2) गडचिरोलीतील 100 मुलींनी सोडले वसतिगृह
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा शासकीय आश्रमशाळेत महिला अधीक्षकाची नियुक्ती करा, अशी मागणी करूनही ही जागा भरली जात नसल्यानं तिथल्या 100 मुलींनी आश्रम शाळा सोडून दिली आहे. ZEE 24 तासनं ही बातमी दिली आहे.
या ठिकाणी आश्रमशाळेची सुसज्ज इमारत आहे, शिक्षक आहेत, साधनं आहेत. विद्यार्थिनींची प्रवेशसंख्या उत्साहवर्धक आहे. मात्र सुरक्षित वातावरणाची उणीव आहे. सुमारे 6 वर्षांपासून मुलींच्या वसतिगृहात महिला अधीक्षक नाहीयेत, असं या बातमीत म्हटलं आहे.
2013 साली हे वसतिगृह सुरू झाले होते. मात्र ही पदं कधीही भरली गेली नाहीत. विद्यार्थिनींनी वारंवार यासंदर्भात प्रशासनाला जाणीव करून दिली होती. 17 जुलै रोजी विद्यार्थिनींनी एक पत्र देत 20 तारखेपर्यंत अधिक्षका नेमणूक न झाल्यास शाळा बंद करून मूळ गावी परतू, असा इशारा दिला होता, असंही या बातमीत म्हटलं आहे.
3) मी फक्त भाजपचाच नाही तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस
"मी फक्त भाजपचाच नाही तर मी शिवसेनेचाही मुख्यमंत्री आहे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भाजप कार्यकारिणीच्या मुंबईत आयोजित बैठकीत देवेंद्र फडणवीस बोलत होते. ABP माझानं ही बातमी दिली आहे.
"मी पुन्हा येईन, मग तुम्ही काळजी कशाला करता? मी केवळ भाजपचा मुख्यमंत्री नाही, शिवसेनेचाही मुख्यमंत्री मीच आहे. आरपीआय, रासप आणि शिवसंग्रामसह सर्व मित्रपक्षांचा मुख्यमंत्रीदेखील मीच आहे," असं फडणवीस म्हणाले.
शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात कोणत्याही पदावरून वाद नसल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे.
"कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्रिपदाच्या वादात आपल्याला पडण्याचं कोणतंही कारण नाही. मुख्यमंत्री हा जनता निवडत असते. आपल्या मित्रपक्षांकडे खुमखुमी असणाऱ्या लोकांची कमतरता नाही. तरीदेखील मीच पुढचा मुख्यमंत्री असेन," असंही ते म्हणाले.
4) चंद्रपूर राज्यातलं 'सगळ्यात प्रदूषित' शहर
चंद्रपूर राज्यातलं 'सगळ्यात प्रदूषित' शहर असल्याचं राष्ट्रीय हरित लवादाच्या (NGT) प्रदूषण नियमन मंडळाने म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.
देशातील सर्वात प्रदूषित आणि औद्योगिक शहरांची यादी NGTने जाहीर केली आहे.
हवा प्रदूषणात चंद्रपुरचा राज्यात पहिल्या तर देशात आठव्या क्रमांकावर आले आहे. तर तारापूर (औद्योगिक वसाहत), दिल्ली आणि मथुरा देशात अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
यामध्ये संबंधित शहरातले पाणी, हवा आणि जमीनतल्या प्रदूषित घटकांचा निष्कर्श लावला जातो.
याव्यतिरिक्त राज्यातील आणखी 9 शहरे सगळ्यांत प्रदूषित असल्याचं NGTने जाहीर केलं आहे. यामध्ये तारापूर, चंद्रपूर, औरंगाबाद, डोंबिवली, नाशिक, नवी मुंबई, चेंबुर, पिंपरी चिंचवड आणि महाड यांचा क्रमांक लागत असल्याचं या बातमीत म्हटलं आहे.
5) नौदलाच्या नवीन पाणबुड्यांना 'ब्रह्मोस'चे कवच
नौदलाच्या ताफ्यात लवकरच 6 नवीन पाणबुड्या येणार आहेत. या पाणबुड्या 'ब्रह्मोस' या अत्याधुनिक क्षेपणास्त्राने सज्ज असतील, असं महाराष्ट्र टाइम्सनच्या बातमी म्हटलं आहे.
'ब्रह्मोस' हे ध्वनीपेक्षा अधिक वेगाने मारा करणारे क्षेपणास्त्र भारत आणि रशिया संयुक्तपणे विकसित करीत आहे. त्यासाठी DRDOअंतर्गत ब्रह्मोस एरोस्पेस लिमिटेड या संयुक्त कंपनीची स्थापना झाली आहे.
आतापर्यंत जमिनीवरून जमिनीवर, आकाशातून जमिनीवर आणि समुद्रावरून हल्ला करता येणारे क्षेपणास्त्र विकसित केले आहे.
आता समुद्राच्या आतून अर्थात पाण्याखालून मारा करता येणारे ब्रह्मोसही शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. हे क्षेपणास्त्र नवीन पाणबुड्यांवर बसविण्याची योजना आहे, असं या बातमीत म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)