You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गोवा मंत्रिमंडळ फेरबदल: मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव बाबूश मोन्सेरात यांच्या भाजप प्रवेशावरून नाराज
छोट्याशा पण अतिशय वेगवान राजकीय घडामोडी घडणाऱ्या गोवा राज्यात गेले दोन दिवस राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं होतं.
त्या तर्कांना आज पूर्णविराम मिळाला. गोव्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारने आधी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि आता गोवा फॉरवर्ड पक्षाला बाहेरचा रस्ता दाखवून काँग्रेसच्या दहा आमदारांना भाजपमध्ये प्रवेश दिला.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये आलेल्या चार आमदारांना नुकतीच मंत्रिपदाची शपथ दिली. यात जेनिफर मोन्सेरात, चंद्रकांत कवळेकर, फिलिप नेरी रॉड्रिग्स आणि मायकल लोबो यांचा समावेश आहे.
काही काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रवेशावर उत्पल पर्रिकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. उत्पल हे मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव आहेत.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आजारी असताना गोवा फॉरवर्ड पक्षाच्या तीन आमदारांनी आणि अपक्ष दोन आमदारांनी सरकार पडू न देता वाचवलं. सरकार अस्थिर होऊ न देता स्थिर ठेवले. मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर आधी महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी, आणि आता गोवा फॉरवर्ड पक्ष तसंच एका अपक्ष आमदाराला मंत्रिमंडळातून म्हणजेच सरकार मधून वगळण्यात आलं आहे. यावर गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी मनोहर पर्रिकर यांच्या समाधी स्थळी पत्रकारपरिषद घेऊन आपला निषेध नोंदवला.
पर्रिकरांच्या जागी काँग्रेसमधून निवडून येणारा नेता भाजपमध्ये
भाजपच्या अडचणीच्या काळात आम्ही त्यांना सहकार्य केलं. सरकार स्थिर ठेवलं पण भाजपने आम्हाला फसवलं. १६ जुलै पासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात विरोधी पक्षात बसून सरकारला नामोहरम करणार आहोत असंही त्यांनी सांगितलं.
मनोहर पर्रिकर यांच्या मतदार संघातून त्यांच्या पश्चात भाजपच्या उमेदवाराला हरवून काँग्रेसच्या तिकिटावर जिंकून आलेल्या बाबूश मोन्सेरात यांना भाजपमध्ये घेतल्याने अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
याबाबात खुद्द पर्रिकरांच्या मुलाने, उत्पल पर्रिकरांनी नाराजी व्यक्त केली. "बाबूश यांना भाजपमध्ये प्रवेश देणं म्हणजे मनोहर पर्रिकरांच्या कारकिर्दीवरून बोळा फिरवण्यासारखं आहे," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
दोन दिवसापूर्वी गोव्यातील कांग्रेस पक्षामधून दहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यात काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते चंद्रकांत (बाबू) कवळेकर, काँग्रेसच्या ताळगाव मतदारसंघाच्या आमदार जेनिफर मोन्सेरात आणि वेळी मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार फिलिप नेरी रॉड्रिग्स या तिघांना मंत्री मंडळात स्थान मिळालं. कवळेकर यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात येईल असं खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शपथविधीनंतर पत्रकारांशी बोलत असताना सांगितलं.
गंभीर गुन्हे दाखल असूनही पत्नीला मंत्रिपद
बाबूश मोन्सेरात याची वर्णी मंत्रिमंडळात न लागता त्यांच्या पत्नी जेनिफर मोन्सेरात यांची लागली याचंच सगळ्यात मोठं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. बाबूश मोन्सेरात यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असताना त्यांना थेट मंत्रिपद न देता त्यांच्या पत्नीला मंत्रीपद देऊन बाबूश यांना एखादं महामंडळ दिलं जाईल असे निष्कर्ष स्थानिक वृत्तपत्रांमधून व्यक्त झाले होते.
यात जेनिफर मोन्सेरात यांच्याकडे नगर नियोजन खातं देऊन 'प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी महामंडळ बाबूश स्वतःसाठी मागतील. जेणे करून घरातल्या घरातच खात्यांमध्ये समतोल राखला जाईल असं नियोजन बाबूश करत आहेत अशी चर्चा आहे. यासर्वांचे खाते वाटप सोमवार सकाळपर्यंत होईल.
दक्षिण गोव्यातील केपे मतदार संघातून चार वेळा निवडून आलेल्या आणि काँग्रेसचं गटनेतेपद असलेल्या विधानसभेचं गटनेपद चंद्रकांत कवळेकरांनी भाजपमध्ये प्रवेश करताच सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं गेलं.
त्यांच्याशी संपर्क साधून या पक्षांतराबद्दल विचारले असता, 'मी निवडून आलेल्या मतदारसंघातील लोकांची कामं करण्यासाठी मी हे पक्षांतर केलं आहे. मतदार संघाचा विकास अडकून आहे म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
गोव्यात सत्तेत असलेल्या भाजप आणि घटक पक्षाचे सरकार स्थिर असताना काँग्रेसच्या दहा आमदारांना प्रवेश देण्याची गरजच काय होती? असा प्रश्न उपस्थित झाल्यावर असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हणाले, "आम्हाला पूर्ण बहुमताचे सरकार बनवायचं होतं. घटक पक्षांना घेऊन सतत अस्थिरतेच्या वातावरणातून सरकारला बाहेर काढायचं होतं. सर्वांत महत्वाचं काँग्रेसचे आमदार स्वतःहून आमच्याकडे आले आणि त्यातून गोव्यात पूर्ण बहुमताचे सरकार बनलं आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)