झारखंड: मॉब लिंचिंगमध्ये मारहाण झालेल्या मुस्लीम युवकाचा मृत्यू

    • Author, रवी प्रकाश
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

"ती 17 जूनची रात्र होती. माझे पती जमशेदपूरहून गावाकडे परत येत होते. तेव्हाच त्यांना घातकीडीह गावातल्या लोकांनी ताब्यात घेतलं. त्यांच्यावर चोरीचा आरोप लावला आणि वीजेच्या खांबाला बांधून ठेवलं. त्यांना खूप मारहाण करण्यात आली. जय श्री राम आणि जय हनुमानच्या घोषणा देण्यास सांगितलं. त्यांना त्याला नकार दिला तर त्यांना मारहाण करण्यात आली. सकाळी त्यांनी माझ्या पतीला सरायकेला पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांकडे सोपवलं. पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी माझ्या पतीलाच तुरुंगात टाकलं. माझ्या पतीला अंतर्गत जखमा झाल्या होत्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला."

हे सांगत असतानाच शाइस्ता परवीन हंबरडा फोडून रडतात. काही महिन्यांपूर्वीच त्यांचं लग्न कदमडीहा गावच्या तबरेज अन्सारी या युवकाशी झालं होतं. हे गाव सरायकेला जिल्ह्यातल्या खरसांवा पोलीस हद्दीत येतं.

शाइस्ता यांनी बीबीसीला सांगितलं की मी पोलिसांकडे याची लेखी तक्रार केली आहे. माझा रिपोर्ट नोंदवून त्यांनी मला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तबरेज फक्त 24 वर्षांचे होते. त्यांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलीस आणि तुरुंग प्रशासनाने हलगर्जी केली आहे. या गोष्टीची उच्चस्तरीय चौकशी व्हावी.

सरायकेला स्टेशनचे प्रमुख अविनाश कुमार यांनी माध्यमांना सांगितलं की धातकीडीह गावच्या लोकांनी तबरेज अन्सारींना चोरीच्या आरोपात पकडलं होतं.

कुमार सांगतात, गावकऱ्यांनी तबरेज यांना कमल माहतो यांच्या छतावरून उडी मारताना पाहिलं. त्यांच्याबरोबर दोन जण होते ते पळाले. तबरेज यांना लोकांनी पकडलं. त्यानंतर गावकऱ्यांनी सांगितलं याने चोरी केली आहे आणि आमच्या हवाली केलं. त्यांच्याविरोधात चोरीचा रिपोर्ट नोंदवण्यात आली. आम्ही तबरेजची आरोग्य तपासणी केली आणि कोर्टात घेऊन गेलो. नंतर त्यांना सरायकेला तुरुंगात पाठवण्यात आलं. यात पोलिसांनी कोणताच हलगर्जीपणा केला नाही.

तबरेज यांच्या मृत्यूनंतर पोलीस त्यांचा मृतदेह सरायकेला सदर रुग्णालयात पोस्ट मार्टमसाठी घेऊन आले. त्यानंतर तिथे लोक जमा झाले आणि त्यांनी गोंधळ सुरू केला. गोंधळ सुरू झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. नंतर तबरेज यांचा मृतदेह जमशेदपूरला पाठवण्यात आला.

दरम्यान, तबरेज अन्सारींना मारहाण करतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. यात गावकऱ्यांनी त्यांना एका खांबाला बांधून मारहाण करत असल्याचं दिसत आहे. तबरेज यांनी त्यांची ओळख सांगितल्यानंतर जय श्री राम आणि जय हनुमानच्या घोषणा लोकांनी दिल्या. या व्हीडिओत काही महिलाही दिसत आहेत. काही लोकांनी हा व्हीडिओ सरायकेला खरसांवाच्या एसपींकडे सोपवला आहे.

झारखंडमध्ये मॉब लिंचिंगच्या घटना सातत्याने होत आहेत. झारखंड जनाधिकार मोर्चाच्या रिपोर्टनुसार सध्या असलेल्या भाजप प्रशासनात किमान 12 लोकांचा मॉब लिंचिंगमध्ये मृत्यू झाला आहे.

त्यापैकी 10 मुस्लीम आहेत आणि दोन आदिवासी. बहुतांश प्रकरणात धार्मिक तेढ निर्माण झाली आहे आणि आरोपींचा संबंध भाजप किंवा विश्व हिंदू परिषद किंवा सहकारी संघटनांशी असल्याचं समजलं आहे.

रामगढ येथे अलीमुद्दीन अन्सारी यांचा मॉब लिंचिंगमध्ये मृत्यू झाला होता. या प्रकरणातील आरोपींना जामीन मिळाल्यावर या आरोपींचं स्वागत तत्कालीन मंत्री जयंत सिन्हांचा पुष्पहार घालून केलं होतं. त्यावरून गदारोळ झाला होता. बीबीसीला दिलेल्या इंटरव्यूमध्ये सिन्हांनी सांगितलं की त्यांनी आरोपींना केस लढण्यासाठी आर्थिक मदत केली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)