You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मराठी शिकवणं बंधनकारक, मग शाळा कुठल्याही बोर्डाची असो - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1. सर्व शाळांमध्ये मराठी बंधनकारक करण्यासाठी कडक कायदा करू- मुख्यमंत्री
महाराष्ट्रात कोणत्याही बोर्डाची शाळा असली तरीही मराठी शिकवणं बंधनकारक असेल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मराठी विषय बंधनकारक करण्यासाठी सरकार कठोर कायदा करेल, असंही मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत सांगितलं.
काही शाळा विशेषतः CBSE आणि ICSE बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी भाषा कायद्याचं पालन केलं जात नाही, असं लक्षात आलं आहे. हा प्रकार रोखण्यासाठी सध्याच्या कायद्यात निश्चितपणे बदल केला जाईल.
"महाराष्ट्रात मराठी शिकवणं सर्वच शाळांना बंधनकारक राहील. मग ती कोणत्याही बोर्डाची शाळा असो त्या शाळेला मराठी शिकवावं लागेलच," असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
2. हिमाचल प्रदेशात बस दरीत कोसळून 44 ठार
हिमाचल प्रदेशात खासगी बस दरीत कोसळून 44 लोकांचा मृत्यू झाला तर 34 लोक जखमीही झाले.
कुल्लू जिल्ह्यातील बंजरहून गडगुशनी-खौली इथे जात असलेली ही बस बंजर येथील दरीत 500 फूट खाली कोसळून हा अपघात झाला. द हिंदूने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
सुरुवातीला 32 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र मृतांची संख्या जास्त असल्याचं नंतर लक्षात आलं.
या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी दिली आहे. तसंच या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून दुःख व्यक्त केले आहे.
3. पुढचा पक्षाध्यक्ष मी निवडणार नाही - राहुल गांधी
लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर पक्षाध्यक्षपदावरून पायऊतार होण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या राहुल गांधी यांनी आपण पुढील अध्यक्षाच्या निवडीत नसू, असं स्पष्ट सांगितलं आहे. न्यूज 18. कॉमने हे वृत प्रसिद्ध केले आहे.
25 मे रोजी काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये पक्षाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र समितीने त्यांचा निर्णय एकमताने अमान्य केला होता.
राहुल गांधी यांनी लोकसभेत काँग्रेस गटनेते पदाची जबाबदारीही स्वीकारली नसून ती पाचवेळा निवडून आलेले खासदार अधिर रंजन चौधरी यांच्याकडे देण्यात आली आहे. पक्षातील नेत्यांनी आग्रह केला असला तरी आपण हे पद सोडण्यावर ठाम आहोत, असं राहुल यांनी सांगितलं आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला 52 जागांवर विजय मिळाला आहे.
4. तेलगू देसम पक्षाचे 4 खासदार भाजपमध्ये
तेलगू देसम पार्टीच्या राज्यसभेतील 6 पैकी 4 खासदारांनी भाजपात प्रवेश केला. या खासदारांमध्ये माजी केंद्रीय मंत्री YS चौधरी, CM रमेश, T व्यंकटेश, G मोहन राव यांचा समावेश आहे. 4 खासदार वाढल्यामुळे भाजपचे राज्यसभेतील संख्याबळ 75 वर गेले आहे.
या चौघांपैकी चौधरी आणि रमेश गेली अनेक वर्षं पक्षाध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांचं दिल्लीमधील सर्व कामकाज पाहायचे. तेलगू देसम पक्षाचा आंध्र प्रदेश विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत मोठा पराभव झाला होता.
भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, राज्यसभेचे नेते थावरचंद गेहलोत, तेलगू देसमचे चौधरी, रमेश आणि व्यंकटेश या तीन खासदारांनी एकत्र जाऊन राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची काल भेट घेतली. हे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलं आहे.
5. MMRDAची हद्द वाढली
मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राची हद्द वाढवून त्यात रायगड, पालघर, ठाणे जिल्ह्यांमधील गावांचा समावेश करण्याचा ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आला होता. पायाभूत सुविधांमध्ये वाढ व्हावी आणि मुंबई शहरावरील ताण कमी करण्यासाठी ही हद्दवाढ करण्यात आली आहे.
पश्चिमेला अरबी समुद्र, उत्तरेला पालघर तालुक्याची उत्तर आणि पूर्व सीमा, वसई तालुक्याची तालुक्याची तानसा नदीपर्यंत पूर्व सीमा आणि नंतर तानसा नदीपर्यंत हद्दवाढ करण्यात आली आहे.
पूर्वेला कल्याण, भिवंडी, अंबरनाथ तालुक्यांच्या पूर्व सीमा आणि कर्जत तालुक्यातील गावे आणि दक्षिणेला खालापूर, पेण, अलिबाग तालुक्याची दक्षिण सीमा, अशी ही हद्द वाढवली आहे. MMRDAच्या विस्तारामुळे लोकल ट्रेन थेट अलिबागपर्यंत धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लोकमतने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)