संजीव भट्ट यांना जेलमध्ये पाठवणारं कोठडी प्रकरण नेमकं काय आहे?

    • Author, विनीत खरे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

गुजरातमधील बडतर्फ आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना जामनगर न्यायालयानं 30 वर्षांपूर्वी घडलेल्या कोठडीतील मृत्युप्रकरणी दोषी ठरवलं आहे. त्यांच्याबरोबरच सात जनांना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे.

न्यायालयानं संजीव भट यांच्यासहित दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

सरकारी वकील तुषार गोकानी यांनी सांगितल्यानुसार, "7आरोपींपैकी दोघांना प्रभुदास माधवजी वैशनानी यांच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे, तर उरलेल्या 5 जणांना अटकेत असलेल्या लोकांना यातना दिल्याप्रकरणी शिक्षा दिली आहे."

"हा निर्णय मानवाधिकारांसाठी महत्त्वपूर्ण आहे. या निर्णयाला ते वरच्या न्यायालयात आव्हान देतील, जेणेकरून बाकी 5 दोषींनाही जन्मठेपेची शिक्षा मिळावी," असं ते पुढे सांगतात.

अनेकदा प्रयत्न करुनही संजीव भट्ट यांच्या वकिलांशी संपर्क झाला नाही.

1998मध्ये ते गुजरात पोलीस सेवेत हजर झाले होते. वरिष्ठांची परवानगी न घेता गैरहजर राहिल्या प्रकरणी तसेच सरकारी गाडीचा दुरुपयोग केल्याचा आरोप ठेवत त्यांना 2011मध्ये निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर ते पुन्हा सेवेत रूजू झाले आणि त्यांना 2015 मध्ये पुन्हा निलंबित करण्यात आलं होतं.

याविषयी 19 ऑगस्ट 2015ला त्यांनी ट्वीट करत म्हटलं होतं की, "27 वर्षं आयपीएस म्हणून काम केल्यानंतर मला नोकरीवरून हटवण्यात आलं. मी पुन्हा सेवेत येण्यासाठी तयार आहे. पण, मला कुणी परत बोलावणार आहे का?"

2002च्या गुजरातमधील दंग्यांप्रकरणी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. गुजरात दंग्यांशी संबंधित आरोप नरेंद्र मोदी यांनी नेहमीच नाकारले आहेत.

संजीव भट्ट सप्टेंबर 2018पासून कथित ड्रग प्लांटिंग प्रकरणात तुरुंगात आहेत.

मला खोट्या केसमध्ये अडकवण्यात आलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे.

आता त्यांना ज्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे, ते प्रकरण 1990मधील आहे.

त्यावेळी संजीव भट्ट जामनगरमध्ये एएसपी अर्थात असिस्टेंट सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस या पदावर कार्यरत होते.

1990 मध्ये प्रभुदास माधवजी वैशनानी यांच्यासहित 133 लोकांना टाडा कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती. काही कालावधीनंतर या आरोपींवरील टाडा हटवण्यात आला होता.

रथयात्रेनंतर उसळल्या होत्या दंगली

1990 हा काळ होता जेव्हा भाजप नेते लालकृष्ण आडवाणींच्या अयोध्या रथयात्रेला बिहारमध्ये थांबवण्यात आलं होतं आणि त्यांना अटक करण्यात आली होती.

त्यांच्या अटकेनंतर भारत बंदची हाक देण्यात आली होती आणि अनेक ठिकाणी दंगे झाले होते.

पोलिसांनी दंगेखोरांना कथितरीत्या वाईट पद्धतीनं झोडपलं, हा संजीव भट्ट यांच्यावरील आरोप आहे.

अटकेत मृत्यू

ज्यांना अटक करण्यात आली होती त्यापैकी 39 वर्षांचे प्रभुदास माधवजी वैशनानी हे होते.

तो 30 ऑक्टोबर 1990चा दिवस होता, त्यादिवशी प्रभुदास यांचे मोठे भाऊ अमृतभाई घरीच होते.

प्रभुदास यांच्या कुटुंबात पत्नी, तीन मुलं ज्यांचं वय 4, 6 आणि 8 वर्षं होतं.

अमृतभाईंनी बीबीसीला सांगितलं, "माझ्या दोन भावांना पोलिसांनी उचलून नेलं होतं. त्यांना उचलून का नेण्यात आलं, हे आजवर मला लक्षात आलेलं नाही. त्याकाळी मला कायदा वगैरे समजत नव्हता. त्याकाळात पोलिसांना लोक खूप भीत असत. त्यांना का नेण्यात आलं, कसं नेण्यात आलं, हे विचारायला वेळसुद्धा नाही मिळाला. पोलिसांनी काही सांगितलं नाही. नंतर माहिती झालं की, त्यांना टाडाअंतर्गत अटक करण्यात आली म्हणून."

घरात घुसून भावांना उचलून नेणाऱ्या पोलिसांमध्ये संजीव भट्ट यांचादेखील समावेश होता, असं अमृतभाई सांगतात.

त्यांच्या दुसऱ्या भावाचं नाव रमेश भाई आहे.

अटक केल्यानंतर या दोघांना पोलिसांनी दांडक्यानं मारलं आणि उठबशा काढायला लावल्या. काठीचा मार आणि उठाबशीमुळे त्यांच्या किडनीवर परिणाम झाला. दोन्ही भावांना किडनीचा प्रॉब्लेम झाला, ते पुढे सांगतात.

किडनीच्या आजारामुळे प्रभुदास यांचं 18 नोव्हेंबरला निधन झालं आणि रमेश भाई यांना 15 ते 20 दिवसांनंतर दवाखान्यातून 'किडनीच्या रिकव्हरी'नंतर सुट्टी मिळाली.

या दोन भावांमधील किडनीच्या आजारात नेमका काय फरक होता, हे अमृतभाईंशी बोलून कळू शकलं नाही.

भावाच्या पोस्टमॉर्टमसाठी एसडीएमला अर्ज दिला होता, ज्यात पोलिसांच्या मारामुळे मृत्यू झाला, असं लिहिण्यात आलं होतं, असं अमृतभाई सांगतात.

"एसडीएमनं आम्हाला मंजुरी दिली आणि त्याला पोलीस विभागाकडे पाठवलं. पोलीस विभागानं आमच्या अर्जाला एफआयआरमध्ये बदललं," ते सांगतात.

1990मध्ये या प्रकरणाची चौकशी सीआयडीनं सुरू केली. पण, चार्जशीट दाखल करण्यासाठी सरकारची सहमती न मिळाल्यानं हे प्रकरण लांबत गेलं.

सरकारी वकील तुषार गोकानी सांगतात, "चार्जशीट दाखल करण्याची परवानगी 1995-96मध्ये मिळाली आणि त्याला आरोपीनं न्यायालयात आव्हान दिलं. उच्च न्यायालयाच्या टीकेनंतर 2012मध्ये चार्जशीट दाखल झाली आणि 2015मध्ये प्रकरणाची सुनावणी सुरू झाली."

मोठ्या भावाच्या मृत्यूनंतर इतर भावांनी मिळून प्रभुदास यांच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली, असं अमृतभाई सांगतात.

ते सांगतात, "आम्ही त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी स्वीकारली आणि आजही ती पार पाडत आहोत. जितकं करता येईल तितकं आम्ही केलं. यासाठी आम्हाला खूप त्रास झाला. एकीकडे कुटुंबाची देखभाल करावी लागली, दुसरीकडे कायद्याची लढाई लढावी लागली. दोन्हीकडून आम्हाला लढावं लागलं."

रमेशभाईंचं जामनगरमध्ये पुस्तकांचं छोटंसं दुकान आहे.

संजीव भट्ट यांच्या पत्नी श्वेता भट्ट यांचं काय म्हणणं आहे?

संजीव भट्ट यांच्या पत्नी श्वेता भट्ट यांच्याशी बीबीसीने संवाद साधला आणि त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

"अटक करण्यात आलेल्या 133 जणांपैकी यात मृत्युमुखी पडलेली व्यक्ती आणि त्यांचे भाऊ कधीच संजीव भट्ट किंवा त्यांच्या स्टाफच्या अटकेत नव्हते," श्वेता सांगतात.

"31 ऑक्टोबर 1990ला पोलिसांनी प्रभुदास माधवजी वैष्णवी अथवा 133 जणांना स्थानिक न्यायालयात हजर केलं, तेव्हा त्यांच्यापैकी कुणीही छळाची तक्रार केली नाही.

"अटकेत असताना छळ झाल्याची तक्रार अमृतलाल माधवजी वैष्णवी यांनी केली, ती सुद्धा प्रभुदास यांच्या मृत्यूनंतर. अमृतलाल हे विश्व हिंदू परिषद आणि भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत," श्वेता सांगतात.

"संजीव भट्ट यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारी या राजकीय सूडबुद्धीनं करण्यात आल्याचं एक उदाहरण आहे.

"2011 मध्ये, संजीव भट्ट यांना 2002च्या दंगलीच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती नानावटी आणि न्यायमूर्ती मेहता आयोगाने आयोगाचे साक्षीदार म्हणून बोलावले होते," श्वेता सांगतात.

या प्रकरणाची सुनावणी सुरू झाल्यापासून 300 साक्षीदारांपैकी फक्त 32 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. 1990 पासून 2012 पर्यंत शांत राहिलेला तक्रारदार अचानक जागरुक झाला आणि सर्वोच्च न्यायालयासह इतर न्यायालयांत वरिष्ठ वकिलांना नियुक्त केलं.

अंतर्गत किंवा बाह्य आघात किंवा जखमांच्या कोणत्याही संकेतांशिवाय, 18 दिवसांनंतर कैदेतून बाहेर पडल्यावर मृत्यू कसा होतो, हे समजणं विचित्र आहे.

फोरेन्सिक वैद्यकीय तज्ज्ञांनी तपासणी केल्यानंतर स्पष्ट केलं होतं की, संबंधित व्यक्तीचा छळ झालेला नव्हता. पण नंतर याला हत्येचं स्वरूप देण्यात आलं, असं श्वेता भट्ट यांचं म्हणणं आहे.

फोनवरील संभाषणादरम्यान त्या जामनगरहून अहमदाबादला परतत होत्या.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)