संजीव भट्ट: मोदींना विरोध करणारे आयपीएस अधिकारी कोठडीतील मृत्युप्रकरणी दोषी

गुजरातमधील बडतर्फ आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना जामनगर न्यायालयानं 30 वर्षांपूर्वी घडलेल्या कोठडीतील मृत्युप्रकरणी दोषी ठरवलं आहे.

न्यायालयानं त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

या प्रकरणी भट्ट यांच्याविरोधात 1990 पासून खटला सुरू होता. भट्ट यांच्याबरोबर प्रवीण सिंग झाला यांनाही दोषी ठरवण्यात आलं आहे.

गेल्या आठवड्यात भट्ट यांना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. या प्रकरणातील अतिरिक्त 11 साक्षीदारांची चौकशी व्हावी अशी मागणी संजीव भट्ट यांनी केली होती. या 11 साक्षीदारांची चौकशी अत्यंत महत्त्वाची आहे असं त्यांचं मत होतं.

1990 मध्ये भारत बंदच्या दरम्यान जामनगरमध्ये हिंसा झाली होती. तेव्हा संजीव भट्ट तिथले एसएसपी होते. या हिंसेदरम्यान पोलिसांनी 100 लोकांना अटक केली होती. त्यातील माधव प्रभुदास याचां रुग्णालयात मृत्यू झाला होता. प्रभुदास यांचे बंधू अमृत वैष्णवी यांनी संजीव भट्ट यांच्याविरोधात तक्रार केली होती. कोठडीमध्ये मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता.

संजीव भट्ट कोण आहेत?

संजीव भट्ट यांनी आयआयटी मुंबईमधून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. 1998 साली ते भारतीय पोलीस सेवेच्या गुजरात केडरमध्ये कार्यरत झाले.

डिसेंबर 1999 ते सप्टेंबर 2002 पर्यंत राज्य गुप्तचर विभागामध्ये उपायुक्त होते. गुजरामधील सर्व अंतर्गत सुरक्षा प्रकरणांची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती. तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेबरोबर, सीमा सुरक्षा व किनारी भाग सुरक्षेची जबाबदारी त्यांच्याकडे होती.

संजीव भट्ट नोडल ऑफिसर होते. केंद्रीय तपास यंत्रणा आणि लष्कराशी माहितीची देवाणघेवाण करण्याचं काम त्यांच्याकडे होतं. 2002 साली गुजरातमध्ये दंगली झाल्या तेव्हा ते या पदावर कार्यरत होते.

गुजरात दंगलींच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या विशेष तपासणी पथकावर आपला विश्वास नाही, असं सांगत तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबाबत त्यांनी शंका उपस्थित केल्या होत्या. नरेंद्र मोदी यांची या दंगलीत कथित भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला.

अर्थात नरेंद्र मोदी यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. मोदी यांच्याविरोधात संजीव भट्ट यांनी खोटे आरोप केल्याचे गुजरात राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. 2015 साली भट्ट यांना सेवेतून वगळण्यात आले होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)