You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चेन्नईत भीषण पाणीटंचाई; शहराला पाणीपुरवठा करणारे तलाव आटले
चेन्नई शहराला पाणीपुरवठा करणारे चार प्रमुख तलाव कोरडे झाले आहेत. भीषण पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी शहराला विविध उपाययोजना कराव्या लागत असून त्यासाठी नवीन बोअरवेलही खोदल्या जात आहेत.
पाण्याच्या सरकारी टाक्यांमधून पाणी भरण्यासाठी स्थानिकांना तासनतास रांगेमध्ये उभं रहावं लागतंय. आणि पाणी नसल्याने अनेक रेस्टाँरंट्स बंद झालेली आहेत.
"आता फक्त पाऊसच चेन्नईला यातून वाचवू शकतो," एका अधिकाऱ्याने बीबीसी तमिळशी बोलताना सांगितलं.
2011च्या जनगणनेनुसार चेन्नई हे देशातलं सहाव्या क्रमांकाचं सर्वात मोठं शहर आहे. आणि आता गेले अनेक आठवडे इथे भीषण पाणीटंचाई आहे.
तलावांतलं पाणी कमी होऊ लागल्यानंतर अनेक हॉटेल्स आणि रेस्टाँरंट्स तात्पुरती बंद करण्यात आली. चेन्नई मेट्रोने स्टेशन्समधील वातानुकूलन यंत्रणा बंद केली असून पाणी वाचवण्यासाठी अनेक ऑफिसांमध्ये कर्माचाऱ्यांना घरूनच काम करण्यास सांगण्यात आलं आहे.
काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरीच थांबण्यास सांगितल्याच्या बातम्यांना IT वर्कर्स असोसिएशनचे सचिव विनोद कालीगाई यांनी दुजोरा दिलाय. "पण घरीही पाणी नाही, मग आता आम्ही करायचं काय?" ते विचारतात.
यावरून आता स्थानिकांमध्येही वाद व्हायला लागले आहेत. पाण्यावरून झालेल्या भांडणातून शेजाऱ्याला भोसकणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी गेल्या आठवड्यात अटक केली.
अधिकाऱ्यांनी पाण्याचे इतर स्रोत शोधायला सुरुवात करण्यात केलेली आहे.
चेन्नई शहराचं पाणिपुरवठा खातं आता खाणींसाठी खणण्यात आलेल्या खड्ड्यांमधून पाणी काढायला लागलं आहे. पण कोरडे पडलेले तलाव आणि खाली गेलेली भूजल पातळी या दोन मुख्य समस्या आहेत.
"भूजल पातळी सुधारणं हाच यावरचा उपाय असेल. याआधीही काही वर्षं कोरडी गेली होती पण त्यावेळी भूजलामुळे वेळ निभावली." सामाजिक कार्यकर्ते असणाऱ्या नक्कीरन यांनी सांगितलं.
या भीषण पाणीटंचाईमुळे आता बहुतेक चेन्नई शहर हे पाणीपुरवठा खात्याकडून करण्यात येणाऱ्या पुरवठ्यावरच अवलंबून आहे. शहराच्या सर्व भागांमध्ये सरकारी टँकर्समधून पाणी पुरवण्यात येतंय.
"आता कुठे सुरुवात झालीय. जर यावर्षीही पाऊस पडला नाही, तर सगळी वाताहत होईल, " एका अधिकाऱ्याने सांगितलं.
हेही वाचलंत का?
हे पाहिलतं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)