वंदे मातरमला मुस्लिमांचा खरंच विरोध आहे का?

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

8 मे 2013. लोकसभेमध्ये वंदे मातरम वाजू लागलं आणि सगळे खासदार रीतीप्रमाणं उठून उभे राहिले. पण एक खासदार उठले आणि लोकसभा सभापतींसह सगळ्या खासदारांकडे पाठ करून सभागृहातून बाहेर गेले. लोकसभेच्या तत्कालीन सभापती मीरा कुमार यांच्या नजरेतून हा प्रकार सुटला नाही.

नेहमी संयमाने वागणाऱ्या कुमार या कृत्यामुळे चांगल्याच संतप्त झाल्या होत्या. वंदे मातरम संपल्यावर त्यांनी हा प्रकार सर्वांना सांगितला आणि वंदे मातरमच्या वेळेस बाहेर जाण्याचं कारण मला समजलं पाहिजे आणि 'धिस शूड नेवर बी डन अगेन...' अशा कडक शब्दांमध्ये त्यांनी सर्वांना समज दिली.

हे खासदार होते बहुजन समाज पक्षाचे शफीकूर रहमान बर्क. त्यांच्या अशा वागण्यानंतर देशभरात वंदे मातरमवर चर्चा सुरू झाली. बर्क यांनी आपली भूमिका सोडण्यास नकार दिला. वंदे मातरम म्हणणं इस्लामविरोधी आहे असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं.

त्यानंतर गेल्या काही वर्षांमध्ये वंदे मातरमवर अनेकदा चर्चा झाली आहे. 17 व्या लोकसभेत नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीदरम्यान वंदे मातरमवरून पुन्हा एकदा गोंधळ झाला.

यावेळीही शफीकूर रहमान बर्क यांनीच वंदे मातरम म्हणणं इस्लामविरोधी आहे आणि आम्ही ते म्हणू शकत नाही, असं शपथ घेतल्यावर संसदेत सांगितलं. आता फक्त ते बसपा ऐवजी समाजवादी पक्षात आहेत एवढाच काय तो फरक.

वंदे मातरमबरोबर 'भारत माता की जय' म्हणण्यालाही काही खासदारांनी विरोध दर्शवला होता. एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असादुद्दिन औवेसी यांनी माझ्या गळ्यावर सुरा ठेवला तरी मी 'भारत माता की जय' म्हणणार नाही असं वक्तव्य केलं होतं. तर तेव्हा राज्यसभेचे खासदार असलेल्या जावेद अख्तर यांनी सभागृहात बोलताना 'भारत माता की जय' म्हणायला आपली काहीच हरकत नाही, असं सांगत या घोषणेचा त्रिवार उच्चार केला होता.

वंदे मातरम म्हणण्याला खरंच धार्मिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे कात्याला मुस्लीम समुदायातील काही लोक का विरोध करतात हे प्रश्न उरतातच.

'या मुद्द्यावरील दोन्ही प्रतिक्रिया गैरलागू'

वंदे मातरम गाण्यावरून सुरू झालेल्या चर्चेबाबत ज्येष्ठ विचारवंत अब्दुल कादर मुकादम यांनी बीबीसी मराठीकडे प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, "वंदे मातरम म्हणत म्हणत स्वातंत्र्यचळवळीत अनेक जण फासावर गेले. हे गीत आनंदमठ कादंबरीत समाविष्ट करण्यात आले होते. या कादंबरीचा संदर्भ मुस्लीम विरोधी होता. त्यामुळे तेव्हा त्याला विरोध झाला होता. शेवटी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली."

"समितीच्या निर्णयानंतर या गीताची पहिली दोन कडवी वापरण्यात यावी अशी सूचना करण्यात आली आणि त्याला सर्वमान्यता मिळाली. या प्रकरणावर तेथेच पडदा पडला. या गीतानं भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात महत्त्वाचा टप्पा गाठला होता हे निःसंशय," असं अब्दुल कादर मुकादम यांनी म्हटलं आहे.

"स्वातंत्र्यानंतर जन गण मन हे राष्ट्रगीत आणि वंदे मातरम 'राष्ट्रीय गाणं' म्हणून स्वीकारलं गेलं. आता वंदे मातरम हे राष्ट्रगीतच नाही परंतु वंदे मातरम म्हटलं की मुस्लीमांची प्रतिक्रिया येते हे लक्षात आल्यावर ते मुद्दाम वाजवलं जातं किंवा त्याबद्दल चर्चा केली जाते. मुस्लीमही त्यावर व्यक्त होतात. शफीकूर रेहमान बर्क यांनी काल शपथ घेतल्यावर वंदे मातरमबद्द्ल बोलणं गैरलागू होतंच. पण त्यावर संसदेत आणि बाहेर उमटलेली प्रतिक्रियाही गैरलागू होती."

'पहिल्या दोन कडव्यांना कोणाचाच विरोध नाही'

वंदे मातरमचा मुद्दा खरंतर कधीच निकालात निघाला आहे, मात्र त्याचा राजकारणासाठी वापर केला जातो असं गुजरातमधील ज्येष्ठ लेखक उर्विश कोठारी यांनी बीबीसी मराठीला बोलताना सांगितले.

ते म्हणाले, "या गीताच्या पहिल्या दोन कडव्यांना कोणाचाच विरोध नव्हता. त्यामुळे योग्य चर्चेनंतर या दोन कडव्यांना स्वीकारण्यात आलं. त्यात जमीन, मातृभूमीचे वर्णन आहे. मात्र पुढच्या कडव्यांमध्ये राष्ट्राला देवीचे स्वरूप देण्यात आले आहे त्यामुळे त्याला विरोध झाला. आता पहिल्या दोन कडव्यांना कोणाचाच विरोध नाही हे कित्येक वर्षांपूर्वी सर्वांनी मान्य केले होते. परंतु तरीही हा मुद्दा वारंवार चर्चेत येतो. याचा राजकारणाशी संबंध असावा."

'वंदेमातरमला विरोध आणि इस्लामचा संबंध नाही'

वंदे मातरमला विरोध करण्याला कोणताही धार्मिक संदर्भ नाही, अशा शब्दांत मुस्लीम सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष शमसुद्दिन तांबोळी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले.

ते म्हणाले, "वंदे मातरम इस्लामविरोधी आहे असा युक्तिवाद केला जात असेल तर तो अयोग्य आहे. या विरोधाचा आणि इस्लामचा काहीही संबंध नाही. उलट आपण ज्या भूमीत राहातो, देशात राहातो त्याच्याशी एकनिष्ठ राहा असे मार्गदर्शन केल्याचे संदर्भ हादिसमध्ये सापडतात.

अशा चर्चांचा वापर मतपेटीसाठी होतो असे सांगताना तांबोळी म्हणाले, "देशनिष्ठा आणि ईश्वरनिष्ठा यांची गल्लत केल्यामुळे हे प्रकार सध्या घडत आहेत. त्याला धार्मिक संदर्भ दिल्यानंतर त्याचा व्होट बँकेसाठी वापर केला जातो. त्यामुळे ही सगळी चर्चा धार्मिक राजकारणाचा भाग म्हणावा लागेल. इस्लाम आणि या वंदे मातरम विरोधाचा काहीही संबंध नाही."

वंदे मातरमला विरोध दुर्दैवी

वंदे मातरमला विरोध होणं दुर्दैवी असल्याचं मत भाजपचे प्रवक्ते आ. राम कदम यांनी व्यक्त केले आहे.

ते म्हणाले, "अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी रक्त सांडून देशाला स्वातंऱ्य मिळवून दिले. त्या मातीशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे गीत आहे. मात्र काही संकुचित मनाचे लोक त्याला धर्माशी जोडतात. कधीकधी हे लोक खरंच विरोध करतात की विरोध करत आहोत असे विशिष्ट समाजाला दाखवून आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात हे कळत नाही."

आनंदमठ कादंबरीबद्दल मतमतांतरे

बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ कादंबरीबद्दल गेल्या अनेक दशकांमध्ये चर्चा झाली आहे. आनंदमठची कथा 1772 साली पूर्णिया, दानापूर आणि तिरहूत येथे इंग्रज आणि स्थानिक मुस्लीम राजांविरोधात झालेल्या विद्रोहावर आधारित आहे. हिंदू संन्यासी लोकांनी मुस्लीम शासकांचा कसा पराभव केला हे यामध्ये लिहिले आहे. बंगालमधील मुस्लीम राजांवर बंकिमचंद्र यांनी कादंबरीतून टीका केली होती.

आनंदमठमध्ये एकेठिकाणी ते लिहितात, "आपण आपला धर्म, जाती, प्रतिष्ठा आणि कुटुंबाच्या नावाचा त्याग केला आहे. आता आम्ही जीवन अर्पित करू. जोपर्यंत 'यांना' पळवून लावत नाही तोपर्यंत हिंदू आपल्या धर्माचं रक्षण कसं करू शकतील?"

इतिहास अभ्यासक तनिका सरकार यांच्यामते, "भारतात इंग्रज येण्यापूर्वी मुस्लीम राजांनी बंगालची दुर्दशा केली होती असं बंकिमचंद्र चॅटर्जी यांचं मत होतं."

'बांग्ला इतिहासेर संबंधे एकटी कोथा'मध्ये बंकिमचंद्रांनी लिहिलं होतं, "मुघलांच्या विजयानंतर बंगालची संपत्ती बंगालमध्ये न राहाता दिल्लीला नेण्यात आली."

परंतु ज्येष्ठ इतिहास अभ्यासक के. एन. पण्णीकर यांच्यामते, "बंकिमचंद्रांच्या साहित्यात मुस्लीम राजांच्या विरोधात मतप्रदर्शन करण्यात आले आहे खरे. पण ते मुस्लीमविरोधी होते असं म्हणता येणार नाही. आनंदमठ एक साहित्यिक रचना आहे."

"बंकिमचंद्र इंग्रज सरकारचे कर्मचारी होते. आणि आनंदमठमध्ये इंग्रजांवर लिहिलेला मजकूर काढून टाकण्याचा त्यांच्यावर दबाव होता. 19 व्या शतकाच्या शेवटी लिहिलेल्या कादंबरीला तेव्हाच्या संदर्भांना समजून वाचलं पाहिजे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)