मुझफ्फरपूर : लिची खाल्ल्यामुळं शंभरहून अधिक मुलांनी गमावले प्राण?

    • Author, प्रियंका दुबे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी मुझफ्फरपूरहून

मुझफ्फरपूरमध्ये अॅक्यूट एन्सिफिलायटिस सिंड्रोमनं (AES) दगावणाऱ्या मुलांची संख्या आता 103 वर गेली आहे. मुलांच्या मृत्यूमुळं या शहराची ओळख असणारं आणि 'फळांची राणी' म्हणून ओळखलं जाणारं लिची हे रसरशीत फळ मात्र वादात सापडलंय.

लिची खाणं हे मुलांच्या मृत्यूंचं कारण असू शकतं असं डॉक्टर आणि बिहार सरकारच्या मंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. लिचीच्या बीमध्ये असलेल्या मिथाईल प्रोपाईड ग्लायसिनमुळं शरीरात ग्लुकोजचं प्रमाण कमी असणारी कुपोषित मुलं मृत्यूच्या उंबरठ्यावर असल्याचं मानलं जातंय. पण या मुद्द्यावरून तज्ज्ञांमध्ये मतमतांतरं आहेत.

आतापर्यंतच्या चाचण्यांनुसार लिची हे मुलांच्या मृत्यूच्या कारणांपैकी एक मानलं जातंय. या सगळ्या वादामुळं लिचीचे व्यापारी आणि लिची उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.

मुझफ्फरपूर परिसरातले शेतकरी हे लिचीवर अलंबून आहेत आणि कोणतेही ठोस पुरावे नसताना त्यांच्या उत्पादनाची अशी बदनामी झाल्यानं त्याचा परिणाम विक्रीवर होणार आहे.

या लहानग्यांच्या मृत्यूचं खरं कारण शोधता न आल्याने बिहार सरकार लिचीवर सगळं खापर फोडत असल्याचं शहरातल्या सामान्य नागरिकांचं म्हणणं आहे.

मुझफ्फरपूर रेल्वे स्टेशनच्या समोर लिची विकणाऱ्या शेतकऱ्यांसोबत उभे असणारे स्थानिक रहिवासी सुकेश कुमार साही लिची या शहराची शान असल्याचं सांगतात.

या रसरशीत फळांच्या टोपलीकडे बोट दाखवत ते म्हणतात, ''लिची आमची ओळख आहे. माझी साठी उलटलीये आणि माझं आख्खं आयुष्य लिची खात गेलंय. लोकांना जे म्हणायचंय ते म्हणू दे. पण वर्षानुवर्षं इथली मुलं लिची खातच मोठी झाली आहेत. उन्हामुळे मुलं आजारी पडलेली असू शकतात. कारण मुझफ्फरपूरमध्ये 45डिग्री इतका तीव्र उन्हाळा यापूर्वी कधीही नव्हता. लिचीला विनाकारण बदनाम केलं जातंय. पण खरंतर मुझफ्फरपूर म्हणजे लिची आणि लिची म्हणजे मुझफ्फरपूर.''

एन्सिफिलायटिसमुळे होणारे मुलांचे मृत्यू आणि लिची पिकण्याची वेळ नेमकी एकत्र आल्यानं यासाठी लिचीला कारणीभूत ठरवण्यात येत असल्याचं 'बिहार लिची उत्पादक संघटनेच्या' बच्चा प्रसाद सिंह यांना वाटतं.

''लिची खाल्ल्यानं जर मुलांचे मृत्यू होत असते तर शहरांतल्या मोठ्या घरातल्या मुलांचेही मृत्यू झाले असते. पण असं झालेलं नाहीये. फक्त गरीब घरांमधली कुपोषित मुलंच एन्सिफिलायटिसला बळी पडत आहेत. इथली लिची तर मुझ्झफरपूर-पटन्यापासून ते दिल्ली - मुंबईपर्यंतची लोकं खातात. मग फक्त ग्रामीण मुझफ्फरपूरमधल्या सर्वात गरीब घरांमध्येच मृत्यू का होत आहेत? इतर कारणं मिळाली नाहीत म्हणून सगळा दोष लिचीवर ढकलण्यात आलाय. कारण लिची तयार होणं आणि मुलं आजारी पडणं नेमकं एकाच कालावधीत झालं.''

बिहारची लिची

बिहारच्या मध्यातून वाहणाऱ्या गंडक नदीच्या उत्तरेकडच्या भागांमध्ये लिचीचं उत्पादन होतं. दरवर्षी समस्तीपूर, पूर्व चंपारण, वैशाली आणि मुझफ्फरपूर जिल्ह्यांमधल्या एकूण 32 हजार हेक्टर जमिनीवर लिचीचं उत्पादन घेतलं जातं. मेच्या शेवटी आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये लिची पिकून तयार होते. लिचीवर या परिसरातील 50 हजारपेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांची रोजीरोटी थेट अवलंबून आहे.

उन्हाळ्याच्या 15 दिवसांमध्ये इथे अडीच लाख टनांपेक्षा जास्त लिचीचं उत्पादन होत असल्याचं बच्चा प्रसाद सांगतात. ''मुझफ्फरपूर आणि बिहारमधल्या विक्रीचा आकडा निश्चितपणे सांगता येणार नाही. देशातल्या इतर राज्यांमध्ये पाठवण्यात येणाऱ्या लिचीच्या 15 दिवसांच्या उत्पादनांमध्येच गंडक नदी परिसरातील शेतकऱ्यांना सुमारे 85 कोटी रुपयांपर्यंतचा व्यवसाय मिळतो. लिचीची होणारी बदनामी ही शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणारी आहे. यामुळे येत्या हंगामात आमचं मोठं नुकसान होणार आहे. ''

आंबा विरुद्ध लिची

स्थानिक शेतकरी भोला झा देखील लिचीचं उत्पादन करतात. त्यांना असं वाटतं, की लिचीला बदनाम करण्यामागे आंबा व्यापाऱ्यांचा हात आहे. बीबीसीसोबत बोलताना त्यांनी सांगितलं, ''मुलं दगावल्याचं दुःख आम्हा सगळ्यांनाच आहे. पण यामागची खरी कारणं शोधली जाणं गरजेचं आहे. इथली मुलं वर्षानुवर्षं लिची खात आहेत. पण चेन्नई, हैदराबाद आणि मुंबईमधली आंबा व्यापाऱ्यांची लॉबी मीडियाच्या मदतीनं लिचीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण जिथे या सीझनमध्ये आंबा 10-12 रुपयांच्या दराने विकला जातो, तिथे लिचीला महानगरांमध्ये 250 रुपयांपर्यंतचा भाव मिळतोय. म्हणूनच लिची उत्पादक शेतकऱ्यांना अशाप्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय. कोणीही पुराव्यांनिशी बोलत नाही. फक्त अंदाज व्यक्त करून संपूर्ण पीक बदनाम होतंय."

याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी आम्ही मुझ्झफरपूरमधील राष्ट्रीय लिची संशोधन केंद्राचे संचालक डॉक्टर विशाल नाथ यांच्यासोबत चर्चा केली. एन्सिफिलायटिससाठी लिची कारणीभूत असल्याचे ठोस पुरावे मिळाले नसल्याचं ते सांगतात.

"दक्षिण अमेरिकेतल्या काही भागांमध्ये मिळणारं 'एकी' नावाचं फळ लिचीसारखंच दिसतं. या फळाच्या बीमध्ये 'एमसीपीजी'चे अंश आढळलेले आहेत. वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीकोनातून एकी आणि लिची ही 'सॅपंडेसिया' नावाच्या एकाच जातीत मोडतात. म्हणूनच बांगलादेशात एन्सिफिलायटिसची काही प्रकरणं उघडकीस आल्यानंतर काही बालरोग तज्ज्ञांनी याला 'लिची डिसीज' म्हणजेच 'लिची रोग' म्हणायला सुरुवात केली. कारण या दोन्ही फळांची प्रजाती समान आहे आणि फळ पिकण्याचा हंगामही तोच आहे. पण लिचीचा एन्सिफिलायटिसशी थेट संबंध असल्याचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. ''

लिचीचे तीन भाग असतात. लिचीचं साल, गर आणि बी. यातला फक्त गर खाण्याजोगा असतो. डॉक्टर नाथ पुढे सांगतात, "लिचीच्या गरामध्ये बहुतांश प्रमाणात पोषक जीवनसत्त्वं आणि खनिजं असतात. कच्च्या लिचीच्या बीमध्ये एमसीपीजी ज्या काही अंशाची चर्चा होतेय, त्यातलं किती प्रमाणात फळाच्या गरात असतं, किती सालीमध्ये आणि किती बी मध्ये याविषयीची ठोस माहिती समोर आलेली नाही. म्हणूनच लिचीला एन्सिफिलायटिसचं कारण मानणं हा तर्क आहे. याचा कोणताही ठोस पुरावा नाही."

गेल्या शेकडो वर्षांपासून लिची पिकवून ती खाणाऱ्या बिहारमध्ये एन्सिफिलायटिसच्या या वादामुळे लिचीची शेती कायमची बंद होण्याचं संकट आता उभं ठाकलं असल्याचं डॉक्टर नाथ सांगतात.

"'जर पुढची दोन वर्षंही असंच होत राहिलं तर लिचीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मुझफ्फरपूरचे शेतकरी मोठ्या तोट्यात जातील आणि शेवटी लिचीची शेती थांबवण्याची वेळ त्यांच्यावर येईल. हे दुःखद आहे कारण एन्सिफिलायटिस होण्यामागे लिचीचा हात असल्याचं अद्याप सिद्ध झालेलं नाही. आम्ही स्वतः दोन वर्षं लिचीच्या 20 प्रकारांचा अभ्यास केला आहे. त्याचे निष्कर्ष आम्ही लवकरच प्रसिद्ध करू. एन्सिफिलायटिससाठी लिचीला थेट जबाबदार ठरवता येणार नसल्याचंच आमच्या संशोधनात आढळून आलंय."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)