लक्ष्मी पंधे: मुंबईची रिक्षावाली जी मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये अभिनयही करते...

    • Author, मधु पाल
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

'अगर किसी चीज़ को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है'. हा डायलॉग 'ओम शांती ओम'मधल्या शाहरुख खानवरच नव्हे तर मुंबईच्या मुलुंड भागात राहणाऱ्या 28 वर्षीय लक्ष्मी निवृत्ती पंधे यांनाही लागू होतो.

चित्रपटात आणि मालिकांमध्ये अभिनय करण्याचं लक्ष्मीचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं. लहानपणी घरी टीव्ही नसल्याने लक्ष्मी शेजाऱ्यांच्या घरी काम करायची आणि त्या मोबदल्यात टीव्ही बघायची.

टीव्ही पाहताना माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी यांच्या गाण्यांवर ती नाचायची. तिची ही आवड कधी तिचं स्वप्न बनलं, हे तिलाही कळलंच नाही. आणि आज ती घरची, कुटुंबाची जबाबदारी पार पाडता पाडता आपलं स्वप्नही पूर्ण करत आहेच. एकीकडे ऑटोरिक्षा चालवता चालवता ती दुसरीकडे आपल्या स्वप्नांच्या पंखांनी सिनेक्षेत्रात उडत आहे.

स्वप्न आणि घरची जबाबदारी

लक्ष्मीच्या कुटुंबात दोन मोठ्या बहिणी आणि एक मोठा भाऊ आहे. लक्ष्मी सर्वांत लहान आहे. बालपणीच वडिलांचं छत्र हरवलं. आजारी बहीण आणि आईची जबाबदारीही लहानपणापासून तिच्यावर होती.

घरात आईला घरकामात मदत करण्यासाठी तिने शिक्षण सोडून दिलं. आठवीनंतर ती दुसऱ्यांच्या घरी घरकाम करू लगली.

आपल्या आयुष्याचं हे वास्तव माहीत असतानादेखील लक्ष्मीने स्वतःची वाट निवडली. तिला माहीत होतं की, तिला कुणी गॉडफादर नाही आणि लुक्सच्या जोरावर तिला कुणी सिनेक्षेत्रात काम देणार नाही.

अभिनय आणि आपलं स्वप्नं लक्षात घेऊन तिला तिच्या घरची आर्थिक जबाबदारीसुद्धा पेलावी लागणार होती. मग तिने आपली वाट निवडली - आता अभिनयाबरोबरच घरच्यांचा सांभाळ करण्यासाठी रिक्षा चालवते.

बोमण ईराणीने बनवलं स्टार

लक्ष्मीची मातृभाषा मराठी आहे. म्हणून तिने आजवर 'देवयानी', 'लक्ष्य', 'तू माझा सांगाती' आणि 'स्वराज्यरक्षक संभाजी' सारख्या अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. एवढंच नव्हे तर 'मुंबई पुणे मुंबई' आणि 'मराठवाडा' या चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे.

पण हे करूनसुद्धा लक्ष्मीला खरी ओळख मिळाली ती प्रसिद्ध अभिनेता बोमन ईराणी यांनी आपल्या सोशल मीडियावर शेयर केलेल्या एका व्हिडिओमुळे.

त्यांनी लिहिलं की लक्ष्मी मराठी मालिकांमध्ये काम करते आणि उरलेल्या वेळेत रिक्षा चालवून कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी ती पडद्यावर भूमिका करते.

लक्ष्मी सांगते की, "मी खूप पूर्वीपासून बोमन ईराणी यांना ओळखते. झालं असं की मी जिथं शूटिंग करत होते, त्यादिवशीच बोमन सर मुंबईत फिल्मसिटी स्टूडियोमध्ये शूटिंग करून घरी परत जात होते."

"मी माझ्या काही को-स्टार्ससोबत घरी जात होते, त्यावेळी अचानक बोमन ईराणी यांची भेट झाली. बोमन सरांच्याबद्दल मी ऐकलं होतं की ते खूप चांगले आहेत. पण त्यादिवशी प्रत्यक्ष अनुभवही आला," ती सांगते.

"मी पाहिलं की बोमन सर त्यांच्या कारमध्ये व्हीडिओ काढत होते. ते त्यांच्या BMWमधून खाली उतरून माझ्याकडे आले आणि म्हणाले की एक राऊंड घेऊ या. मी त्यांना बघून खूप खूश झाले आणि त्यांच्या पाया पडू लागले. बोमन सर म्हणाले की माझ्या पाया पडू नकोस.

ती सांगते, "त्यांनी माझ्यासोबत फोटो काढला आणि माझी प्रशंसाही केली. मला विश्वासच बसत नव्हता की ते माझ्यासोबत आहेत."

रिक्षा आणि कुटुंब

अनेकांच्या घरी घरकाम करणारी लक्ष्मी सांगते, "मी पार्लरमध्येसुद्धा काम करत होते, पण इतर ठिकाणी काम करता-करता मी माझ्या अभिनयावर लक्ष देऊ शकत नव्हते."

ती सांगते की, "ऑडिशनसाठी मला अनेक ठिकाणी स्टूडिओमध्ये जावं लागतं होतं. त्या स्टूडिओचे अंतर खूप लांब होतं. माझ्याकडे पैसे नसायचे त्यामुळे अनेकवेळा मी जाऊ शकले नाही. लीड रोल मला मिळू शकत नाही हे मला माहित आहे, त्यामुळे मी साइड रोल करते."

"मराठी मालिकांमध्ये मला कधी गरोदर, कधी शेतकऱ्याची बायको, कधी कामवालीचे पात्र साकारायला मिळतात. अनेकदा काही खास अनुभवसुद्धा येतात."

लक्ष्मीला मालिकांमध्ये काम केल्यानंतर चार-पाच दिवसांनतंर पैसे मिळतात, यामुळे अनेकवेळा तिच्या कुटुंबाला उपाशी पोटी राहावं लागतं. यामुळे तिने रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला.

लक्ष्मी हसत सांगते, "रिक्षा चालवण्यात माझे दोन फायदे आहेत - एक तर रोजच्या रोज कमाई होते आणि दुसरा म्हणजे, कोणत्याही ठिकाणी मी सहज पोहोचू शकते. अनेकवेळा ऑडिशनसाठी लांब जाताना मी रिक्षामध्ये प्रवाशांना घेऊन जाते. त्यांना सोडून मग मी ऑडिशनला जाते."

रिक्षा चालवतानाचा अनुभव आठवून लक्ष्मी सांगते की ड्रायव्हिंग शिकणे ही तिच्यासाठी सोपी गोष्ट नव्हती. सुरुवातीला तिचे हात दुखायचे, पण आता ती तयार झाली आहे. ती सांगते की, "काही लोक म्हणतात की स्त्रियांचं ड्रायव्हिंग खूप भयानक असतं. स्त्रियांना ड्रायव्हिंग येत नाही.

"अनेक लोक सल्ला देतात की 'मुलींनी रिक्षा चालवणं योग्य दिसत नाही. तू दुसरं काम कर'. अशा लोकांना मी एकच उत्तर देते की 'स्त्रिया या तुमच्यासारख्या पुरुषांना जन्म देऊ शकतात तर ते जगातलं कोणतंही काम करू शकतात."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा..)