You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुझफ्फरपूर: या हॉस्पिटलमधून मुलांचे मृतदेहच बाहेर येत आहेत- पालकांचा आक्रोश
- Author, प्रियांका दुबे
- Role, बीबीसी प्रतिनिधी, मुझफ्फरपूरहून
मुझ्झफरपूरच्या श्रीकृष्ण मेडिकल कॉलेजमध्ये आपली मुलं गमावलेल्या आयांचा आक्रोश घुमतोय. या महिलांनी गेल्या आठवड्याभरात याच हॉस्पिटलमध्ये त्यांचं मूल गमावलंय.
मेंदूज्वर आणि अॅक्यूट एन्सिफिलायटिस सिंड्रोम (AES) मुळे दगावलेल्या लहान मुलांची संख्या आता 93 वर पोहोचलेली आहे.
या हॉस्पिटलची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासमोर दोन मुलांनी प्राण सोडले.
श्रीकृष्ण मेडिकल कॉलेज (एम. के. एम. सी. एच)च्या बालरोग विशेष इंन्टेसिव्ह केअर युनिटच्या (ICU) बाहेर एक काचेचा दरवाजा आहे. पण वॉर्डमधला आक्रोश तरीही आतमध्ये ऐकू येतोय.
आठ बेड्सच्या या स्पेशल वॉर्डच्या कोपऱ्यामध्ये मान खाली घालून बसलेल्या बबिया देवी हुंदेक देऊन रडत होत्या. शेजारीच त्यांची पाच वर्षांची मुलगी मुन्नी मृत्यूशी झुंज देतीये. तिच्या बेडशेजारी लावलेल्या मॉनिटरवरच्या रेषा वर-खाली होत होत्या.
मॉनिटवरचे रंग आणि आवाजाबरोबर बबियांचा आक्रोश वाढत जातो. गेल्या काही दिवसांत अनेक लेकरांनी याच वॉर्डमध्ये अखेरचा श्वास घेतलाय. त्याची भीती बबियांच्या चेहऱ्यांवर पूर्णपणे दिसते. डॉक्टरांनी अजूनही हार मानली नसली तरी मुन्नी यातून बचावणार नाही, अशी भीती त्यांना वाटतीये.
माझ्या नजरेसमोर मॉनिटरमधून येणाऱ्या बीप..बीप... आवाजाचं प्रमाण वाढलं. एकाच वेळी दोन डॉक्टर्स मुन्नीच्या छातीवर आपल्या तळव्यांनी दाबून तिचा श्वास पुन्हा सुरू करायचा प्रयत्न करायला लागले.
डॉक्टरांच्या हातांनी पंप केला की त्या लहानशा जीवाचा चेहरा वर उचलला जायचा. तिचे ओठ पिवळे पडले होते आणि डोळ्यांच्या कडांमधून पाणी यायला लागलं. बबियाची आई भोजपुरी भाषेमध्ये एक हृदयद्रावक लोकगीत गायला लागली.
आदल्या दिवसापर्यंत धडधाकट होती मुन्नी
डॉक्टर्सना विचारल्यावर त्यांनी इतकंच सांगितलं, की आता मुन्नी वाचणं कठीण आहे. पण हसत्याखेळत्या मुन्नीला अचानक असं नेमकं काय झालं? मुन्नीला मेंदूज्वर झालाय की एन्सिफिलायटिस सिंड्रोम हे डॉक्टर्सना नक्की ठरवता येत नाहीये. बबियाला तर इतकंच आठवतंय की आदल्या दिवशीपर्यंत तिची लेक धडधाकट होती.
अश्रूंनी भिजलेला चेहरा पदराआड लपवत त्यांनी सांगितलं, ''आम्ही कोदरिया गोसावीपुर गावचे रहिवासी आहे. शनिवारी सकाळी 10 वाजता मुन्नीला या हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. शुक्रवारपर्यंत ती ठीक होती. खेळत होती. रात्री डाळ-भात खाऊन झोपून गेली. सकाळी उठून पाहिलं तर ती तापाने फणफणलेली होती.''
''आम्ही घाईघाईने तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. सुरुवातीचं काही अंतर पायी धावतच आलो, नंतर गाडी मिळाल्यानंतर भाडं भरून इथपर्यंत आलो. पण हॉस्पिटलमध्ये तिची तब्येत सुधारली नाही. तेव्हापासून तिने डोळे उघडलेले नाहीत.''
मुझफ्फरपूरमध्ये होणाऱ्या या मृत्यूंची तज्ज्ञ तपासणी करत आहेत. मुलांना येणारा हा मेंदूज्वर लिची फळामधल्या विषारी घटकांमुळे येत असल्याचं तपासात समोर आल्याचं एकीकडे म्हटलं जातंय, तर काही तज्ज्ञांच्या मते मुलांच्या शरीरात ग्लुकोजचं प्रमाण कमी झाल्यानं ती या वेगळ्या मेंदूज्वराला बळी पडताहेत.
काय आहेत मृत्यूची कारणं?
ज्येष्ठ डॉक्टर माला कनेरिया गेल्या अनेक वर्षांपासून विषाणू आणि संसर्ग याविषयी संशोधन करत आहेत. मुझफ्फरपूरमध्ये मुलांचे जे मृत्यू होत आहेत, त्यामागे अनेक कारणं असू शकतात, असं त्यांचं म्हणणं आहे.
त्या म्हणतात, ''मुलांचा मृत्यू हा एन्सिफिलायटिसमुळे होतोय, सामान्य मेंदूज्वरामुळे होतोय की जपानी एन्सिफिलायटिसमुळे होतोय हे ठामपणे सांगणं खूप कठीण आहे. कारण या मृत्यूंमागे अनेक कारणं असू शकतात.''
''कच्च्या लिची फळातील विषारी घटक, मुलांमधलं कुपोषण, त्यांच्या शरीरामधली साखर तसंच सोडियमची कमी झालेली पातळी, शरीरातल्या इलेक्ट्रोलाईट्सची पातळी घसरणं अशी अनेक कारणं असू शकतात. जेव्हा एखादं मूल रात्री उपाशी पोटी झोपतं आणि सकाळी उठून लिची खातं, तेव्हा शरीरातलं ग्लुकोजचं प्रमाण कमी असल्याने या तापाचा शिकार ठरतं. पण लिची हे एकमेव कारण नाही. मुझ्झफरपूरमध्ये एन्सिफिलायटिसमुळे होणाऱ्या मृत्यूंमागे अनेक कारणं आहेत. ''
मुझफ्फरपूर हे लिचीसाठी प्रसिद्ध आहे आणि इथल्या ग्रामीण भागांमध्ये लिचीच्या बागा सर्रास दिसतात.
मुझफ्फरपूर मेडिकल कॉलेजच्या आयसीयू वॉर्डमध्ये मी बबियासोबत बसले असतानाच दोन बेड्स पलिकडून अचानक जोरजोरात रडण्याचा आवाज यायला लागला.
वळून पाहिलं तर तेच दोन डॉक्टर्स पलंगाच्या अर्धा भागावर झोपलेल्या एका लहानशा मुलीच्या छातीवर हाताने दाबून तिचं हृदय पुन्हा सुरू करायचा प्रयत्न करत होते. ती मुलगी सुन्न होती. एकच गोंधळ झाला आणि दोन स्त्रिया एकमेकींना बिलगून जोरजोरात रडायला लागल्या.
त्या दोनपैकी एक महिला होती रूबी खातून. पलंगावर झोपलेली तिची चार वर्षांची लेक तमन्ना खातून जीवन-मरणाच्या उंबरठ्यावर होती.
लिचीविषयी शंका
भिंतीवरती आपले दोन्ही हात आपटत बांगड्या फोडणाऱ्या रूबीच्या आक्रोशाने मी सुन्न झाले. रूबीच्या त्या दुःखाची कल्पनाही करणं शक्य नव्हतं. ती एक आई होती जिच्या नजरेसमोर तिचं मूल कायमचं हिरावून घेतलं जात होतं.
शोकात बुडालेली ही आई असंबद्ध बोलते, ''गेल्या दोन दिवसांमध्ये या हॉस्पिटलमधून एकही मूल बरं होऊन गेलेलं नाही. सगळी मुलं जीव गमावूनच परत गेलीयत. माझ्या मुलीने लिची खाल्ली नव्हती. मी रोटी केली होती. तीच खाऊन की झोपली. सकाळी उठवायला गेले, तर ती उठलीच नाही.''
''मला वाटलं की तिला अजून झोपायचं असेल, म्हणून मी तिला तसंच राहू दिलं. थोड्यावेळाने पाहिलं तर ती गुडघ्यांवर बसली होती. हात-पाय थरथरत होते. त्यानंतर ताबडतोब आम्ही या हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. पण इथे तिची तब्येत सुधारली नाही. डॉक्टर्स आपापसांत बोलतात आणि निघून जातात. मी माझ्या लेकीला खायलाप्यायला घालून मोठं केलं, ते एक दिवसं तिने असं जाण्यासाठी का?''
वॉर्डसमोरून जाताना पाहिलं की रुग्णांचे नातलग बाटल्यांमध्ये पाणी भरून आणत होते. चौकशी केल्यावर समजलं की संपूर्ण मेडिकल कॉलेजमध्ये पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय नाही. म्हणूनच एन्सिफिलायटिसच्या रुग्णांच्या नातलगांना हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या एका हँडपंपपर्यंत जाऊन पाणी भरावं लागतं.
हँडपंपातलं पाणी खराब असल्याची तक्रार करत अनेकांनी मला बाटल्यांमधलं मातकट रंगांचं गढूळ पाणी दाखवलं. तर आर्थिक परिस्थिती डबघाईची असूनही बाटलीबंद पाणी विकत घ्यावं लागत असल्याचं इतर कुटुंबांनी सांगितलं. कारण रुग्णालयात पिण्याचं पाणी उपलब्धच नाही.
संध्याकाळी याच हॉस्पिटलमध्ये एक पत्रकार परिषद झाली. त्यात बीबीसीने हा प्रश्न विचारला. त्याचं उत्तर देताना आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं की एन्सिफिलायटिसच्या रुग्णांसाठी पिण्याचं पाणी उपलब्ध नसणं हा 'गंभीर विषय' नाहीये.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)