…तर भविष्यात माणसाला लांब बोटं, लांब नाक आणि मोठं डोकं असेल- हायकोर्ट #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. …तर भविष्यात माणसाला लांब बोटं, लांब नाक आणि मोठं डोकं असेल- हायकोर्ट

पर्यावरणाचा सतत ऱ्हास होऊ लागल्यानं भावी पिढीला त्याचे परिणाम भोगावे लागतील. कदाचित त्यांना शारीरिक अपंगत्वही येईल अशी भीती व्यक्त करताना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रदीप नंदराजोग यांनी चक्क तसे रेखाचित्रच काढून दाखवले.

मुख्य न्यायाधीश प्रदीप नंदराजोग आणि न्यायाधीश नितीन जमादार यांच्या खंडपीठापुढे सध्या कोस्टल रोडसंदर्भातील जनहित याचिकांवर अंतिम सुनावणी आहे.

समुद्र किनाऱ्यांवर भराव टाकून हा रस्ता करताना पर्यावरण विषयक कोणतीही परवानगी सरकारने घेतलेली नाही असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.

पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करताना भविष्यात मानवी शरीर कसं असू शकतं, हे सांगताना न्यायाधीशांनी कागदावर रेखाचित्र काढून दाखवलं. सतत संगणकापुढे बसल्यानं बोटे लांब होतील, प्रदुषित वायूमुळे लांब नाक होईल आणि हालचाल कमी झाल्यामुळे शरीर आखूड होऊन डोकं मोठं होईल, असं विश्लेषण त्यांनी केलं. हे वृत्त एबीपी माझाने प्रसिद्ध केलं आहे.

2. चार वर्षांमध्ये 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

महाराष्ट्रात 2015-2018 या चार वर्षांच्या कालावधीमध्ये 12 हजार 21 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन खात्याचे मंत्री सुभाष देशमुख यांनी एका लेखी उत्तरात दिली आहे.

यापैकी 6888 प्रकरणं जिल्हास्तरीय समित्यांमध्ये पात्र ठरली आहेत. त्यातील 6845 प्रकरणांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या वारसांना एक लाख रुपयांची मदत देण्यात आल्याचेही या उत्तरात म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या कीडबाधित क्षेत्र अहवालात महाराष्ट्राचा समावेश असल्याची माहिती कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी एका लेखी वृत्तात दिली. महाराष्ट्रात ऊस, मका आणि ज्वारी यांच्यावर कीड पडली असून मक्यावर नव्या लष्कर अळीचा प्रादुर्भाव आढळल्याचेही त्यांनी सांगितले. लोकमतने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

3. जेटकडे अडकले प्रवाशांचे 3200 कोटी

जेट एअरवेज कंपनीचा प्रवास दिवाळखोरीच्या दिशेनं होत असल्यामुळे प्रवाशांना याचा मोठा फटका बसणार आहे. कंपनीकडे प्रवाशांचे 3200 कोटी रुपये अडकले असून त्यांना परतावा मिळणे कठीण झाले आहे.

जेटचे आर्थिक व्यवस्थापन पाहणाऱ्या स्टेट बँकेने कंपनी विक्रीचा प्रयत्न करून पाहिला. तसे झाले असते तर तिकिटांचा परतावा मिळाला असता. नव्या कंपनीनेही परतावा नाकारला असता तर पैशांसाठी ग्राहक न्यायालयात जाण्याचा मार्गही उपलब्ध होता. मात्र कंपनी दिवाळखोरीत गेल्यावर हा मार्ग त्यांच्यासाठी बंद होईल.

आता फौजदारी प्रक्रियेचा वापर करून प्रवाशांना आपले पैसे मिळवावे लागणार आहेत. फेब्रुवारी महिन्यापासूनच कंपनीने आपली उड्डाणे कमी करायला सुरुवात केली आणि 17 एप्रिलपासून सर्वच उड्डाणे रद्द करण्यात आली. महाराष्ट्र टाइम्सने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

4. लोकसभेतील रणनिती ठरवण्यासाठी UPAची बैठक

लोकसभेत विरोधकांनी कशी भूमिका घ्यावी हे ठरविण्यासाठी UPAची बैठक बोलवण्यात आली होती. UPAच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या बैठकीचे नेतृत्व केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या बैठकीचा वृत्तांत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांनी सोनिया गांधी यांना सांगितला.

या बैठकीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, अधीर रंजन चौधरी, भाकपा नेते डी. राजा, द्रमुकच्या कनिमोळी आणि टी. आर बालू, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, व्हीसीकेचे तिरुमावलन थोल, आरएसपीचे प्रेमचंद्रन आणि इतर नेते उपस्थित होते. 17 जून ते 26 जुलै या काळात संसदेचे अधिवेशन होणार आहे. इंडिया टुडेने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

5. 11 वीच्या जागा वाढल्या, आजपासून प्रवेश

अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया आजपासून सुरु होत आहे. विज्ञान शाखेसाठी 5 टक्के, कला आणि वाणिज्य शाखेसाठी 8 टक्के जागा वाढवण्याचा निर्णय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी घेतला आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर येथिल कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जागा वाढवून देण्याचे या निर्णयात म्हटले आहे.

अकरावी प्रवेशाचा तिढा सोड़वण्यासाठी महाविद्यालयांची प्रवेश क्षमता वाढवण्यात येईल का याची चाचपणी शिक्षण विभागाकडून करण्यात आली होती. अकरावी प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले.

राज्यातील एकही विद्यार्थी अकरावी प्रवेशापासून वंचित राहाणार नाही असेही शेलार यांनी स्पष्ट केले. लोकसत्ताने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)