उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा- राम मंदिरासाठी सरकारनं वटहुकूम काढण्याची मागणी

    • Author, नीलेश धोत्रे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत पत्रकार परिषद घेऊन आता सरकारने राम मंदिरासाठी वटहुकूम काढावा अशी मागणी केली.

गेले अनेक दिवस त्यांच्या या दुसऱ्या अयोध्या दौऱ्याची चर्चा होती. आज रविवारी त्यांनी अयोध्येतील रामाचे दर्शन घेतले. त्यावेळेस त्यांच्याबरोबर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे सर्व खासदार उपस्थित होते.

बीबीसी मराठीशी बोलताना शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटलं," आम्ही 'आधी मंदिर आणि मग सरकार' घोषणा दिली होती पण नंतर बालाकोट झालं आणि राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवली. सरकार पुन्हा सत्तेत आलं आहे. आता राम मंदिर होईल."

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी शिवसेना खूपच आक्रमक झाली होती. भाजपवर टीका करण्याची किंवा त्यांना खिंडीत गाठण्याची कुठलीही संधी उद्धव ठाकरे यांनी सोडली नव्हती.

शिवसेनेची केंद्रात अवजड उद्योग मंत्री पदावर झालेली बोळवण, विधानसभेच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं पुन्हा एकदा राममंदिराचा राग आळवला आहे. मात्र यावेळी अयोध्येतला त्यांचा हा शो फारच मर्यादित स्वरुपाचा असल्याचं दिसून येतंय.

या दौऱ्याची फारशी चर्चा नाही

नोव्हेंबर 2018 मध्ये उद्धव ठाकरेंनी अयोध्या दौरा केला होता. या दौऱ्याचा मोठ्या प्रमाणावर गाजावाजाही झाला होता. यावेळी मात्र शिवसेनेकडून कुठलीही मोठी वातावरण निर्मिती करण्यात आलेली नाही. काही तुरळक ठिकाणी लावलेली होर्डिंग सोडली तर कुठेही उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची चर्चा नाही.

प्रचारादरम्यान राम मंदिराच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेणारी शिवसेना अचानक मवाळ का झाली? त्यांच्या या भूमिकेची धार का निघून गेली?

या प्रश्नांचं उत्तर लोकसभा निवडणुकांचे निकाल आणि राज्यातल्या विधानसभा निवडणुकांच्या जागा वाटपात असल्याचं वरिष्ठ पत्रकार सुजाता आनंदन यांना वाटतं.

"लोकसभेत भाजपला एवढ्या जागा मिळतील याचा अंदाज अमित शाह आणि मोदी यांना सुद्धा नव्हता. म्हणून त्यांनी मित्रपक्षांची मदत घेतली. बिहारमध्ये त्यांनी नितीश कुमार यांच्या कलाने जागावाटप केलं. अमित शाह स्वतः मातोश्रीवर गेले आणि शिवसेनेशी युती केली. शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेऊन भाजपला झुकवलं होतं. पण आता परिस्थिती बदलली आहे. भाजपच्या एकट्याच्या ३०३ जागा आहेत आणि तसं पाहिलं तर त्यांना शिवसेनेची फारशी गरज उरलेली नाही," असं सुजाता आनंदन सांगतात.

युतीसाठी आग्रह का?

खरंतर 2014ची विधानसभा निवडणूक शिवसेनेनं स्वबळावर लढवली होती. तेव्हा त्यांना कधी नव्हे तेवढ्या 62 जागा मिळाल्या. बाळासाहेबांच्या हयातीत सुद्धा शिवसेनेला कधी एवढं य़श मिळालं नव्हतं.

बीबीसीशी बोलताना संजय राऊत यांनी आमची युती झालेली आहे आणि आम्ही युतीतच निवडणुका लढवू असं म्हटलं.

गेल्या वेळेस एकटं लढून जास्त जागा मिळाल्या असताना यावेळी शिवसेना युतीसाठी आग्रही का दिसते? याचं कारण महाराष्ट्रात तयार झालेली नवी राजकीय समीकरणं आहेत, असं सुजाता आनंदन यांना वाटतं.

त्या सांगतात, गेल्या वेळी शिवसेना विरोधी पक्षात होती. मोदी लाटेतही त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधतली मतं चांगल्या पद्धतीनं त्यांच्याकडे खेचता आली. आता मात्र शिवसेना सत्तेत आहे. त्याशिवाय एकटं लढलो तर वंचित बहुजन आघाडीच्या फॅक्टरमुळे तोटा होण्याची भीती शिवसेनेला वाटत आहे, म्हणून त्यांना युती महत्त्वाची वाटते.

पण ही युती पूर्वीसारखी सहज असेल असं आनंदन यांना वाटत नाही. ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मोदींवर टीका केली होती. ते भाजप किंवा अमित शाह विसरणार नाहीत आणि यंदाच्या युतीमध्ये त्याचे पडसाद नक्की दिसतील. भाजपला आता प्रादेशिक पक्षांची गरज नाही. त्यामुळे भाजपकडून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न नक्की केला जाऊ शकतो आणि हे स्वतः शिवसेना सुद्धा जाणून असल्याचं सुजाता आनंदन यांनी म्हटलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)