उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा : राम मंदिरावरून भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांसह रविवारी, 16 जून रोजी पुन्हा एकदा अयोध्येत जात आहेत.

25 नोव्हेंबर 2018 रोजी त्यांनी असाच अयोध्या दौरा करून शक्तिप्रदर्शन केलं होतं. रविवारीसुद्धा पुन्हा एकदा तसंच शक्तिप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे.

त्यासाठी शनिवारी संध्याकाळपर्यंत शिवसेनेचे खासदार अयोध्येत पोहोचतील आणि रविवारी उद्धव ठाकरे अयोध्येत पोहोचतील, अशी शक्यता आहे. शिवसेनेचे सर्व 18 खासदारही त्यांच्याबरोबर उपस्थित असतील.

ट्विटरवरून दबाव

5 जूनपासूनच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या अयोध्या भेटीचे संकेत द्यायला सुरुवात केली होती. "शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत जात आहेत. तारीख नंतर कळवू. Commitment is Commitment," असं ट्वीट त्यांनी केलं होतं.

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी "भाजपकडे 303 खासदार आहेत, शिवसेनेकडे 18 खासदार. राम मंदिर निर्माणासाठी आणखी काय हवं?" असं ट्वीट करून आता राम मंदिर तयार करण्यासाठी सरकारकडे पुरेसे बळ असल्याचं त्यांनी सूचित केलं होतं.

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी "भाजपकडे 303 खासदार आहेत, शिवसेनेकडे 18 खासदार. राम मंदिर निर्माणासाठी आणखी काय हवं?" असं ट्वीट करून आता राम मंदिर तयार करण्यासाठी सरकारकडे पुरेसे बळ असल्याचं त्यांनी सूचित केलं होतं.

तसेच "जनता जनार्दन और भगवान राम से किया गया वादा पुरा करने का आशीर्वाद हमें मिला है और हमें उनका काम सबसे पहले पुरा करना होगा!" असं हिंदीमध्ये ट्वीट केलं होतं.

त्यानंतर 7 जून रोजी त्यांनी अयोध्या भेटीची तारीख जाहीर केली. शिवसेना कम्युनिकेशन हँडलवरूनही हिंदीमध्ये या कार्यक्रमाची माहिती जाहीर करण्यात आली.

निवडणुकांची पार्श्वभूमी आणि वेगवेगळ्या मागण्या

गेल्या लोकसभेच्या कार्यकाळामध्ये शिवसेना भाजपबरोबर सत्तेत असली तरी शिवसेनेने भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडली नव्हती. त्यामुळे विरोधकांची भूमिकाही त्यांनीच पार पाडली होती.

नोव्हेंबर महिन्यातील ठाकरे यांची अयोध्या भेट त्याचाच एक भाग मानली जात होती. मात्र ता शिवसेना कोणत्या मागण्यांसाठी अयोध्या दौरा करत आहे, याबद्दल अनेक शक्यता वर्तवली जात आहे. नव्या लोकसभेची स्थापना झाल्यावर लोकसभेच्या अध्यक्षानंतर उपाध्यक्षपद कुणाकडे जाईल, यावर चर्चा होत आहेत.

या पदावर आपला हक्क असल्याचं स्पष्ट मत संजय राऊत यांनी मांडलं होतं. तर हे पद YSR काँग्रेसकडे जाण्याची शक्यता असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे या पदावरून गोंधळ कायम आहे.

'इच्छा व्यक्त करणे म्हणजे नाराजी नाही'

कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या दौऱ्याबाबत पत्रकारांना सांगितलं. तसंच शिवसेनेच्या लोकसभा उपसभापती पदाच्या मागणीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.

"एखादी इच्छा व्यक्त करणे म्हणजे नाराज होणं नाही, आपली माणसं म्हणून त्यांच्याकडे हक्काने मागणे याला नाराजी समजू नये. ज्या गोष्टी मागायच्या आहेत त्या आम्ही हक्काने मागतो आहोत. ही युती काही झाल तरी आम्ही तुटू देणार नाही. आम्ही 16 तारखेला अयोध्येला जाण्याचा मनोदय केला आहे," असं उद्धव यांनी कोल्हापुरात म्हटलं होतं.

'रामाला विसरलो नाही'

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात कोणतंही राजकारण नसल्याचं स्पष्ट केलं.

"निवडणुकीपूर्वी आम्ही सर्वजण उद्धव ठाकरेंसोबत अयोध्येला गेलो होतो. निवडणुकीनंतरही आम्ही पुन्हा दर्शनाला येऊ, असं आम्ही त्यावेळीही म्हटलं होतं. निवडणूक झाली. आम्हाला बहुमत मिळालं आणि रामाला, अयोध्येला विसरलो, असं आम्ही करणार नाही. आमची बांधिलकी आहे," असं राऊत यांनी ANI सोबत बोलताना म्हटलं.

'हा दबाव तंत्राचा भाग'

लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान यांनी यापुढे शिवसेना ही राम मंदिराच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेईल, असा अंदाज बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केला.

उद्धव ठाकरेंचा दुसरा अयोध्या दौरा हा दबाव तंत्राचाच एक भाग असल्याचं संदीप प्रधान यांनी म्हटलं. "शिवसेना आता सरकारमध्ये आहे. पण मनासारखी मंत्रिपदं मिळाली नसल्यानं पक्षात नाराजी आहे. भाजपला जे प्रचंड बहुमत मिळालं आहे. ते पाहता शिवसेना आता आपला विरोध, नाराजी बोलून दाखवणार नाही.

"गेल्या वेळेप्रमाणे भाजपवर 'चौकीदार चोर है' सारखी टीका होणार नाही. पण कृतीतून शिवसेना दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा आणि राम मंदिर या मुद्द्यांचा वापर होईल," असं त्यांनी सांगितलं.

"मोदी सरकारच्या शपथविधीनंतर काही दिवसांतच सरसंघचालक मोहन भागवत यांनी 'राम का काम करना है, राम का काम होकर ही रहेगा,' असं विधान केलं होतं.

त्यामुळे आरएसएस राम मंदिराच्या मुद्द्यावर आक्रमक होणार हे लक्षात आल्यावर आपणही त्यात मागे नाही हे दाखवून देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असेल," असं संदीप प्रधान यांनी सांगितलं.

विधानसभा निवडणुकांची पार्श्वभूमी?

महाराष्ट्रात काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकांच्या दृष्टीनेही शिवसेनेसाठी राम मंदिर हा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो, असं मत प्रधान यांनी व्यक्त केलं.

"लोकसभा निवडणुकीत देशप्रेम, हिंदुत्व हे मुद्दे महत्त्वाचे ठरले होते. विधानसभा निवडणुकीतही काही प्रमाणात हे विषय गाजतील. अशावेळेस राम मंदिर व्हावं अशी भावना असलेला मतदारांचा जो गट आहे, त्याला आपल्याकडे आकर्षून घेण्यासाठी शिवसेना अयोध्या दौऱ्याचा वापर करेल. मतदारांनी आपल्या भूमिकेवर अधिकाधिक विश्वास ठेवावा यासाठी राम मंदिर हा आपल्यादृष्टिनं महत्त्वाचा प्रश्न आहे, हे शिवसेना दाखवून देणार.

दरम्यान, रविवारी 16 जून रोजी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं. याबाबतची आपली एक चर्चा झाली असून अंतिम चर्चा शनिवारी रात्री होईल, असं ते यावेळी म्हणाले.

रविवारी 16 जून रोजीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर जात आहेत, त्यामुळे या विस्तारात सेनेच्या पदरात काय पडतं, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)