You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गुजरात: सेप्टिक टँकमध्ये सफाईसाठी उतरलेल्या 7 जणांचा गुदमरून मृत्यू
गुजरातच्या दभोई भागातील एका हॉटेलात शनिवारी सेप्टिक टँकची सफाई करण्यासाठी उतरलेल्या सात जणांचा गुदमरून मृत्यू झाला.
टँकची साफसफाई करण्यासाठी आत उतरलेली माणसं परत न आल्यामुळे त्यांना शोधण्यासाठी आणखी माणसं उतरली. मात्र कुणीच परत आलं नाही आणि एकेक करून सगळ्यांचा जीव गेला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, यापैकी तीन हॉटेलचे कर्मचारी होते.
याप्रकरणी हॉटेलचे मालक हसन अब्बास भोरानिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जीव गमावणाऱ्यांमध्ये तीन साफसफाई विभागाचे कर्मचारी, एक ड्रायव्हर आणि तीन हॉटेलचे कर्मचारी आहेत. सातही जणांचे मृतदेह हाती लागले आहेत, असं सब इन्स्पेक्टर के. एम. वाघेला यांनी सांगितलं.
नेमकं काय घडलं?
टँकच्या साफसफाईसाठी हे सात जण आत उतरले तेव्हा त्यांच्याकडे सुरक्षा उपकरणं नव्हती, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
मृतांपैकी महेश पाटनवाडिया ट्रॅक्टर ट्रॉली चालवण्याचं काम करायचे. सेप्टिक टँकमधील कचरा उचलण्यासाठी ते घटनास्थळी गेले होते.
सेप्टिक टँकच्या सफाईकरता सफाई कर्मचारी मॅनहोलमध्ये उतरले. त्यांचा ठावठिकाणा कळत नसल्याने ड्रायव्हर आणि हॉटेलचे कर्मचारी उतरले. मात्र विषारी वायूमुळे सगळ्यांचाच मृत्यू झाला.
मृतांपैकी महेश पाटनवाडिया, अशोक हरिजन, हितेश हरिजन आणि महेश हरिजन हे थुवावी या एकाच गावचे होते. अशोक आणि हितेश बापलेक असल्याचं थुवावी गावचे सरपंच चिराग पटेल यांनी सांगितलं. या दुर्घटनेमुळे गावावर शोकळळा पसरली आहे.
या गावात दलित लोकसंख्या 300-400 इतकी आहे. दलित समाजातील 5-6 जण साफसफाईचं काम करतात. सफाईच्या कामासाठी आवश्यक सुरक्षा उपकरणांविना ही माणसं काम करत असल्याचं चिराग पटेल यांनी सांगितलं.
मृतांपैकी महेश हरिजन यांचे आईवडील नाहीत. त्यांच्या पश्चात पत्नी आणि बहीण असा परिवार आहे. तर विजय चौधरी आणि सहदेव वसावा हे सुरतमधील उमरपाडा तालुक्यातील आहेत. अजयभाई वसावा नेत्रंग तालुक्यातील आहेत. हे सगळे हॉटेल कर्मचारी होते.
पोलिसांनी सगळे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. त्यानंतरच हे स्पष्ट होऊ शकेल की सेप्टिक टँकमधील कोणत्या विषारी वायूमुळे हे मृत्यू झाले.
दरम्यान, "सरकार पुतळे तयार करण्यासाठी तीन हजार कोटी खर्च करू शकतं. मात्र सफाई कर्मचाऱ्यांना गटारात, मॅनहोलमध्ये उतरायला लागू नये, मानवी मैला उचलायला लागू नये यासाठी यंत्रांच्या खरेदीसाठी पैसे देऊ शकत नाहीत," असं ट्वीट गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी केलं आहे.
नॅशनल सफाई कर्मचारी आयोगाच्या अहवालानुसार 1993 ते 2018 या कालावधीत गुजरात राज्यात सेप्टिक टँकची साफसफाई करताना 122 जणांचा मृत्यू झाला आहे.
या कालावधीत देशभरात 676 तर तामिळनाडूत सर्वाधिक म्हणजे 194 जणांचा याच कारणामुळे मृत्यू झाला आहे. गुजरात दुसऱ्या स्थानी आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)