नरेंद्र मोदी यांनी खरंच स्वत:ची जात 'सवर्ण'वरून OBC केली का?

मी मागास जातीतील असल्यानं माझ्यावर निशाणा साधला जात आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरच्या सभेत म्हणाले. काँग्रेसवर निशाणा साधताना स्वत:चा उल्लेख 'मागास प्रवर्गातील व्यक्ती' असा करण्याची पंतप्रधानांची ही पहिलीच वेळ नाही.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या 'चौकीदार चोर है' आणि 'सभी चोरों का सरनेम मोदी है' या वक्तव्यांविषयी त्यांनी म्हटलं की, "मागास असल्याकारणानं आम्हाला अनेकदा अशा अडचणींचा सामना करावा लागला आहे. अनेकदा काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी माझी जात काढली आहे."

"काँग्रेसच्या नेत्यानं पहिल्यांदा 'चौकीदार चोर है' असं म्हटलं. लोक याकडे लक्ष देत नाहीत म्हटल्यावर आता ते विचारत आहेत की, 'ज्यांचं नाव मोदी आहे, ते सर्व चोर का आहेत?' पण आता त्यांनी मर्यादा ओलांडली आहे. ते आता संपूर्ण मागास समाजाला चोर म्हणत आहेत," असंही मोदींनी राहुल यांना उद्देशून म्हटलं आहे.

2002 पूर्वी मोदी सवर्ण होते?

2014मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:ला मागास प्रवर्गातील म्हटलं होतं. यानंतर या बाबीवर खूप चर्चा झाली होती.

मोदींनी सत्तेत आल्यानंतर स्वत:च्या जातीचा समावेश OBC मध्ये केला आहे, असा आरोप तेव्हा काँग्रेसनं केला होता. यावर उत्तर देताना गुजरात सरकारनं म्हटलं होतं की, "घांची समाजाला 1994पासून OBCचा दर्जा मिळाला आहे. नरेंद्र मोदी यांची जात घांची आहे."

नरेंद्र मोदी मागास जातीचे नाहीत, असा आरोप गुजरात काँग्रेसचे नेते शक्तिसिंह गोहिल यांनी केला होता. गोहिल यांनी म्हटलं होतं की, "2001मध्ये मोदी गुजरातचे मुख्यमंत्री बनले आणि राजकीय लाभासाठी त्यांनी आपल्या जातीचा समावेश मागास प्रवर्गात केला."

गुजरात सरकारचा आदेश

गोहिल यांनी गुजरात सरकारच्या 2002च्या आदेशाचा हवाला देत म्हटलं होतं की, "मोदी यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर घांची जातीला मागास प्रवर्गात टाकण्यासाठी तडजोड केली होती."

त्यावेळी गोहिल यांनी बीबीसीला सांगितलं होतं की, "ही माहिती मिळवण्यासाठी माहितीच्या अधिकाराचा अर्ज केला होता. त्यात विचारलं होतं की, घांची जातीला राज्याच्या OBC प्रवर्गात कधी समाविष्ट करण्यात आलं?"

गोहिल यांच्या मते, "मोदी गुजरातमधील श्रीमंत मोढ घांची जातीचे आहेत. या समाजाला मोदी मुख्यमंत्री होण्यापूर्वी मागास प्रवर्गात सामील करण्यात आलं नव्हतं. मोदींनी गुजरात सरकारच्या व्यवस्थेला स्वत:च्या फायद्यासाठी हवं तसं बदललं आहे. मोढ घांची समाजाला OBCमध्ये टाकण्याची कधी कुणी मागणी केली नव्हती. पण स्वत:ला मागास प्रवर्गाचा सांगत वोट बँकेचं राजकारण करता यावं, यासाठी त्यांनी स्वत:ला मागास बनवलं."

बीबीसी हिंदीजवळ 1 जानेवारी 2002मध्ये गुजरात सरकारनं जारी केलेलं एक पत्रक आहे, ज्यात मोढ घांची समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केल्याची घोषणा करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या आरोपानंतर गुजरात सरकारनं दोन दशकांपूर्वीच्या एका आदेशाचा उल्लेख केला. त्यात मोढ घांची (तेली) समाजाला मागास प्रवर्गात सामील करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

राज्य सरकारचे प्रवक्ते नितीन पटेल यांच्या मते, "गुजरात सरकारच्या समाज कल्याण विभागानं 25 जुलै 1994ला एक आदेश जारी केला होता. या आदेशाअंतर्गत 36 जातींना OBC प्रवर्गात सामील करण्यात आलं होतं. यांतील 25 (ब)मध्ये मोढ घांची जातीचा उल्लेख करण्यात आला आहे. या जातीचा OBC मध्ये समावेश करण्यात आला आहे."

मोढ घांची कोण आहेत?

घांची यांना इतर राज्यांमध्ये साहू अथवा तेली म्हणून ओळखलं जातं. खाद्य तेलाचा व्यापार करणारे हे लोक आहेत. गुजरातमध्ये हिंदू आणि मुस्लीम या दोन धर्मांना मानणारे घांची आहेत.

यांतील उत्तर पूर्व गुजरातमधील मोढेरा येथील लोकांना मोढ घांची म्हटलं जातं. गुजरातच्या गोध्रा हत्याकांडामध्ये पकडलेले बहुतांश लोक घांची मुसलमान होते.

"मोदी हे बनावट OBC आहेत, असं म्हणणं चुकीचं ठरेल," असं विख्यात शास्त्रज्ञ अच्युत याग्निक सांगतात.

ते म्हणतात, "घांची पहिल्यापासूनच OBC मध्ये येतात, त्यामुळे काँग्रेसचा आरोप चुकीचा आहे. मोदी ज्या जातीचे आहेत, ती घांचीची एक उपजात आहे. त्यामुळे त्यांना ओबीसी म्हटलं जाईल."

परिपत्रक कशासाठी?

गुजरातमधील राजकीय विश्लेषक घनश्याम शाहसुद्धा याग्निक यांच्या मुद्द्याशी सहमती दर्शवतात.

घनश्याम यांनी म्हटलं की, "गुजरातमध्ये घांची समाज राज्यभर पसरला आहे. यापैकी एक भाग सूर्य मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या मोढेरा गावात आहे. इथल्या लोकांना मोढ घांची म्हटलं जातं."

पण प्रश्न हा आहे की, मोदींची जात OBC प्रवर्गात येत होती, तर सरकारनं 2002मध्ये हे परिपत्रक का जारी केलं?

याबाबत नाव न छापण्याच्या अटीवर गुजरात सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं बीबीसीला सांगितलं, "प्रश्न हा होता की, ज्यावेळी घांची समाजाला OBC मध्ये टाकण्यात आलं, त्यावेळी या समाजाच्या सगळ्या उपजातींना OBC मध्ये सहभागी करून घ्यायला हवं होतं. पण तसं झालं नाही. यासाठी गुजरात सरकारनं एक पत्रक जारी करत मोढ घांचींना त्यात सामील करून घेतलं."

हे मोदींच्या सांगण्यानुसार झालं का, असं विचारल्यानंतर मात्र या अधिकाऱ्यानं 'ते माहिती नाही,' असं म्हणत संभाषण संपवलं.

हेही वाचलंत का?

सवर्ण मतदार एकगठ्ठा मतदान करत नाहीत? नेमकं खरं काय?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)