सुरत आग: कोचिंग क्लासेसच्या इमारतीला भीषण आग, मृतांचा आकडा 20 वर

सुरतमधल्या एका कोचिंग क्लासेसच्या इमारतीला शुक्रवारी लागलेल्या भीषण आगीत मृत विद्यार्थ्यांची संख्या 20 वर गेली आहे.

सुरतमधल्या तक्षशीला कॉमप्लेक्स या इमारतीला आग लागली. याच इमारतीच्या चौथ्या मजल्यावर कोचिंग क्लासेस सुरू होते.

आग विझवण्यासाठी 19 अग्निशमन गाड्यांना पाचारण करण्यात आलं. सुरत मधल्या वराछा भागात ही इमारत आहे.

या आगीपासून वाचण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरून उड्या मारतानाचे व्हीडिओ सर्वत्र व्हायरल झाले आहेत.

आग लागताच स्थानिकांनी अडकलेल्या लोकांना इमारतीमधून बाहेर पडण्यासाठी मदत केली.

अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरून उड्या घेतल्या, त्यातल्या काहींना आम्ही रुग्णालयात पठवलं, असं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे.

आगीची घटना कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करून त्याबाबत दुःख व्यक्त केली आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. तसंच मृत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

दुपारी 4 च्या सुमारास ही आग लागली, आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

सुरतचे पोलीस आयुक्त सतीश शर्मा यांनी आतापर्यंत या आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचं बीबीसीशी बोलताना सांगितलं आहे.

स्थानिक खसादार दर्शना जरदोश यांनी प्रशासन, पोलीस आणि अग्निशामन दल बचावकार्य युद्धपातळीवर करत असल्याचं सांगितलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)