वायू चक्रीवादळाचा वेग वाढला, मुंबईत दुपारनंतर वादळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता

अरबी सुमद्रात तयार झालेलं वायू चक्रीवादळ गुरुवारी दुपारी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे.

सध्या हे चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्यापासून सध्या तरी दूर सरकलं आहे पण, ते वेगाने गुजरातच्या उत्तरेकडे सरकत आहे.

या काळात महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगतच्या भागात ताशी 70 किमी वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे.

सध्या या चक्रीवादळाचा वेग ताशी 155-165 किमी आहे. पण गुरुवारी दुपारपर्यंत त्याचा वेग ताशी 180 किमी होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे.

वायू

हे चक्रीवादळ कसं पुढे सरकत आहे हे तुम्ही इथं LIVE पाहू शकता.

राष्ट्रीय आपत्ती निवारण सज्ज

राष्ट्रीय आपत्ती निवारणाच्या सहा टीम पोरबंदर येथे सर्व तयारीनिशी उभ्या आहेत. हवामान खात्यानं सांगितलं आहे की या वादळाचा तडाखा गुजरातला बसणार नाही पण समुद्री किनाऱ्यावर असलेले जिल्हे यामुळे प्रभावित होऊ शकतात.

चक्रीवादळाचा परिणाम

  • पोरबंदर, दीव, भावनगर, केसोद, कंडला येथील विमानतळांवरील सेवा 24 तास बंद करण्यात आली आहे.
  • अमरेलीच्या जाफराबाद बंदरावरील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.
  • गुजरातला जाणाऱ्या काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे.
  • गिर सोमनाथ जिल्ह्यातील गिर सोमनाथ मंदिराला वादळाचा तडाखा बसला आहे.

"गुजरातमधील 3 लाख, तर दीवमधील 10 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. गृह मंत्रालय राज्य सरकारच्या नियमित संपर्कात आहे," असं गृहमंत्री अमित शहा यांनी ट्वीट केलं आहे.

या वादळामुळे मुंबईत वाऱ्यांचा वेग वाढला असून समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. बुधवारी दुपारपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये पाऊस पडत आहे. या पार्श्भूमीवर मुंबई पोलिसांनी ट्वीटरद्वारे आवाहन केलं आहे.

"गुजरातच्या सीमेवर वायू चक्रीवादळ धडकणार आहे. त्यामुळे मंबईत दुपारनंतर वादळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी समुद्र किनाऱ्यापासून दूर राहावं," असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.

समुद्र खवळलेला असल्यानं मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. तसंच पुढच्या 3 दिवसांत विदर्भ आणि मध्यप्रदेशमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

हवामान खात्यानं म्हटलं आहे की, येणाऱ्या 4 तासांत पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतील काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो.

"वायू चक्रीवादळाला ट्रॅक करता येऊ शकत नाही. ओडिशामध्ये आलेल्या फणी चक्रीवादळाला सायक्लोन डिटेक्शन रडारच्या माध्यमातून ट्रॅक करणं शक्य होतं," असं स्कायमेटनं म्हटलं आहे.

"सुरक्षेच्या कारणास्तव आतापर्यंत 1 लाख 20 हजार लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. जवळपास 3 लाख लोकांचं स्थलांतर करण्यात येणार आहे," असं गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत म्हटलं आहे, "वायू चक्रीवादामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर केंद्र सरकार बारीक लक्ष ठेवून आहे. मी राज्य सरकारच्या नियमित संपर्कात आहे. शक्य तेवढी सगळी मदत पुरवण्यासाठी NDRF आणि इंतर संस्था मदत करत आहेत."

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी ट्टीट केलं आहे की, "वायू चक्रीवादळ गुजरातच्या सीमेवर पोहोचत आहे. मी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, त्यांनी स्थानिकांच्या मदतीसाठी तयार राहावं."

'मुंबईत समुद्राची पातळी 1.8 मीटर इतकी वाढेल'

नव्या अभ्यासानुसार, आता अरबी समुद्रात चक्रीवादळांची संख्या वाढेल, असं संशोधकांचं मत आहे. याशिवाय चक्रीवादळांमुळे होणारे Storm Surge म्हणजेच वादळामुळे आलेलं सागरी उधाण आणि जागतिक तापमान वाढ या कारणांमुळे या शतकभरात मुंबईत समुद्राची पातळी 1.8 मीटर इतकी वाढेल, असंही मत काही संशोधकांचं आहे.

जपानमधील संशोधक एच. मुराकामी (जपान एजन्सी फॉर मरिन अर्थ सायन्स आणि तंत्रज्ञान), एम. सुगी आणि ए. किटोह (मेटेरॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, इबाकारी) यांच्या शोधनिबंधात मुंबईबाबत हा उल्लेख आहे.

यासंदर्भात अधिक माहितीसाठी बीबीसी मराठीने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीचे येथील वरिष्ठ संशोधक आर. मणीमुरली यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी जागतिक तापमान वाढीमुळं समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याचं मान्य केलंय.

तापमान वाढीमुळे या शतकात समुद्राच्या पातळीत होत असलेली वाढ मुंबईत 30 सेंमी असेल, असं त्यांनी सांगितलं. याबाबत आणखी वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)