मुंबईकरांनो सावधान! अरबी समुद्रात आता चक्रीवादळं वाढणार

    • Author, मोहसीन मुल्ला
    • Role, बीबीसी मराठी

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ओखी चक्रीवादळाचा मुंबईसह उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीला तडाखा बसला आहे. सर्वसाधारणपणे बंगालच्या उपसागराच्या तुलनेत अरबी समुद्र सुरक्षित मानला जातो, तिथे चक्रीवादळं सहसा येत नाहीत.

पण नव्या अभ्यासानुसार, आता अरबी समुद्रात चक्रीवादळांची संख्या वाढेल, असं संशोधकांचं मत आहे. याशिवाय चक्रीवादळांमुळे होणारे Storm Surge म्हणजेच वादळामुळे आलेलं सागरी उधाण आणि जागतिक तापमान वाढ या कारणांमुळे या शतकभरात मुंबईत समुद्राची पातळी 1.8 मीटर इतकी वाढेल, असंही मत काही संशोधकांचं आहे.

जपानमधील संशोधक एच. मुराकामी (जपान एजन्सी फॉर मरिन अर्थ सायन्स आणि तंत्रज्ञान), एम. सुगी आणि ए. किटोह (मेटेरॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, इबाकारी) यांच्या शोधनिबंधात मुंबईबाबत हा उल्लेख आहे.

अरबी समुद्रात चक्रीवादळांची वारंवारता 46 टक्के इतकी वाढेल, तर बंगालच्या उपसागरमध्ये ही वारंवारिता 31 टक्केंनी कमी होईल, अशी माहिती या रिसर्च पेपरमध्ये देण्यात आली आहे.

'फ्युचर चेंज इन ट्रॉपिकल सायक्लॉन इन द नॉर्थ इंडियन ओशन प्रोजेक्टेड बाय हाय-रेझोल्युशन एमआरआय-एजीसीएम' या नावाचा रिसर्च पेपर या तीन संशोधकांनी सादर केला. हा रिसर्च पेपर 2012मध्ये पहिल्यांदा प्रसिद्ध झाला होता.

अरबी समुद्रात चक्रीवादळं वाढण्यामागची कारणमीमांसा करताना विविध थर्मोडायनॅमिक मानकांचा अभ्यास करण्यात आला आहे. चक्रीवादळांची तीव्रता वाढत्या तापमानामुळे वाढेल, असंही यात नमूद करण्यात आली आहे.

2007मध्ये अरबी समुद्रात निर्माण झालेलं चक्रीवादळ गोणू या भागातील पहिलं क्रमांक 5च्या तीव्रतेचं चक्रीवादळ होतं. या वादळाचा ओमानला मोठा तडाखा बसला होता. याशिवाय 1979 ते 1991 या कालावधीशी तुलना करता 1992 ते 2008 या कालावधीत अरबी समुद्रात दर वर्षीच्या वादळांच्या दिवसांत वाढ झाली आहे, अशीही माहिती यात देण्यात आली आहे.

या रिसर्च पेपरमध्ये ब्राऊन क्लाउडचा उल्लेखही आहे. ब्राऊन क्लाउड म्हणजे हवेतील प्रदूषणाचा थर होय. या ब्राऊन क्लाऊडमुळे अरबी समुद्रात मान्सूनपूर्व चक्रीवादळांची तीव्रता वाढली असल्याचं म्हटलं आहे.

वादळांमुळे समुद्राच्या पातळीत होणारी वाढ स्टॉर्म सर्ज (storm surge) म्हणून ओळखली जाते. नेहमीच्या भरतीपेक्षा स्टॉर्म सर्जच्या वेळी मोठ्या लाटा उसळतात आणि त्यामुळे समुद्राचं पाणी चढतं. याचा परिणाम म्हणून किनारपट्टीच्या भागात मोठे पूर येतात.

मुंबईत उधाण किती?

खरगपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे (आयआयटी) संशोधक सी. शाजी आणि टी. विशाल, तसंच आय. एम. सिस्टीम्स ग्रुप (मेरीलॅंड, अमेरिका) येथील संशोधक एस. कार यांनी 'स्टॉर्म सर्ज स्टडीज इन द नॉर्थ इंडियन ओशिएन : ए रिव्ह्यू' हा रिसर्च पेपर 2014मध्ये लिहिला. त्यामध्ये मुंबईतील Storm Surge ही 1.5 मीटर इतकी असल्याची नोंद करण्यात आली आहे.

यासंदर्भात अधिक माहितीसाठी बीबीसी मराठीने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीचे येथील वरिष्ठ संशोधक आर. मणीमुरली यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी जागतिक तापमान वाढीमुळं समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याचं मान्य केलंय

तापमान वाढीमुळे या शतकात समुद्राच्या पातळीत होत असलेली वाढ मुंबईत 30 सेंमी असेल, असं त्यांनी सांगितलं.

Storm Surge मुळे होणारी वाढ 1.5 सेंमी आणि तापमान वाढीमुळे होणारी वाढ 3 सेंमी धरली तर या शतकाभरातील समुद्राच्या पातळीतील वाढीचा प्रभाव 1.8 मीटर असेल, असं त्यांनी सांगितलं.

वर्ल्ड बँकेने 2013मध्ये एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये कोलकता आणि मुंबई ही शहरं समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणारी वाढ, चक्रीवादळं, नद्यांना येणारे पूर यांसाठी फारच असुरक्षित असल्याचं म्हटलं होतं.

या अहवालात दक्षिण आशियावर स्वतंत्र लेख असून जर जागतिक तापमान वाढ 4 डिग्री सेल्सियस झाली तर 2090पर्यंत समुद्राच्या पाण्याची पातळी 100 सेमीनं वाढेल, असं म्हटलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)