You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मराठवाड्यातील दुष्काळ पुढच्या पिढीला दिसणार नाही - देवेंद्र फडणवीस #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया:
1. 'मराठवाड्याचा दुष्काळ पुढच्या पिढीला दिसणार नाही'
"मराठवाडा म्हणजे 12 महिने दुष्काळ. आजवरच्या पिढ्यांनी हेच चित्र पाहिले. पण पुढच्या पिढीला हे चित्र दिसता कामा नये, या दिशेने आम्ही काम करतो आहोत. मराठवाड्यातील दुष्काळ हा भूतकाळ झाला पाहिजे आणि तो केल्याशिवाय आम्ही राहणार नाही," अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे. औरंगाबादमधील दुष्काळाच्या पाहणीनंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
तसंच दुष्काळावर मात करण्यासाठी मराठवाड्यातील 11 मोठी धरणं जलवाहिन्यांद्वारे जोडण्याचं काम हाती घेण्यात येणार असून दोन महिन्यांत त्याच्या निविदा काढण्यात येतील असंही आश्वासन दिल्याची बातमी लोकसत्ताने दिली आहे.
2. मोदींच्या विमानासाठी एअरस्पेस द्या - भारताची पाककडे मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 13 तारखेला बिश्केक येथे शांघाय कॉऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या एक परिषदेला जाणार आहेत. त्यासाठी पाकिस्तानच्या एअर स्पेसमधून जाण्याची परवानगी भारत सरकारने पाकिस्तानकडे केल्याची बातमी द हिंदू ने दिली आहे.
बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने त्यांच्या एअर स्पेसमध्ये भारताच्या विमानांना परवानगी नाकारली होती. नंतर ही बंदी बहुतांश सेवांसाठी उठवली होती. तरी भारताकडून आणि भारताकडे जाणाऱ्या 11 मार्गांपैकी 2 मार्गच खुले केले.
गेल्या महिन्यात दोन्ही देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांसाठी ही एअर स्पेस पाकिस्तानने दिली होती. आता ही परवानगी पंतप्रधानांसाठी भारताने मागितली आहे.
3. दानवे-खोतकर यांच्यात 'निवडणुकीपूर्वीच सेटलमेंट'
अर्जून खोतकर आणि आमच्यात निवडणुकीच्या दोन महिने अगोदर सेटलमेंट झाली होती. नंतर फक्त नाटक सुरू होतं, असा गौप्यस्फोट रावसाहेब दानवेंनी केला आहे. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.
केंद्रीय राज्यमंत्रिपदी निवड झाल्यावर दानवे जालन्यात एका नागरी सत्कार कार्यक्रमात बोलत होते.
शिवसेना-भाजप युती होण्यापूर्वी दानवे आणि खोतकर यांच्यातील विस्तव जात नव्हता. अर्जून खोतकर यांनी जालन्याच्या जागेवर दावा केला होता. "दानवेंना जालन्यात अस्मान दाखवू," असा निश्चय खोतकरांनी केला होता.
परंतु युतीनंतर ही जागा भाजपला मिळाली. युतीनंतर या दोघांत दिलजमाई झाली होती.
4. आता रेल्वेत मिळणार मसाजची सुविधा
इंदूरहून सुरू झालेल्या ट्रेनमध्ये बसलात तर अत्यल्प दरात डोक्याला आणि पायाला मालिशची सुविधा मिळू शकते. भारतीय रेल्वेनेही सोय उपलब्ध करून दिल्याची बातमी इंडिया टुडे ने दिली आहे. हा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर असून पुढच्या दोन तीन आठवड्यात 39 गाड्यांमध्ये ही सुविधा मिळेल.
रेल्वेच्या रतलाम विभागात हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. इंदूर स्टेशनवरून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये सकाळी सहा ते रात्री दहा या वेळात मसाजची सेवा प्रवाशांना मिळेल. सहप्रवाशांना अजिबात त्रास होणार नाही तसंच स्वच्छतेच्या बाबतीत काटेकोर असणं, या दोन महत्त्वाच्या अटी आम्ही ठेवल्या आहेत.
रेल्वेतर्फे मसाज देणाऱ्या व्यक्तींना ओळखपत्र देण्यात येईल तसंच त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल, अशी माहिती रेल्वे बोर्डाच्या माहिती विभागाचे संचालक ब्रजेश अग्रवाल यांनी दिली.
5. योगी आदित्यनाथ यांचा अवमान केल्याप्रकरणी पत्रकाराला अटक
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी दिल्लीमधील एका मुक्त पत्रकाराला लखनौ पोलिसांनी अटक केल्याची बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. प्रशांत कनौजिया असं अटक झालेल्या पत्रकाराचं नाव आहे.
कनौजिया यांनी कानपूरमधील हेमा सक्सेना नामक एका महिलेचा व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओत हेमा पत्रकारांशी बोलताना सांगतेय की तिने योगी आदित्यनाथांना अनेक प्रेमपत्रं लिहिली असून त्यांच्याशी अनेकदा व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलली आहे.
त्यावर "कितीही लपवलं तरी प्रेम लपत नाही योगी जी," अशी कमेंट करत प्रशांत यांनी हा व्हीडिओ ट्वीट केला. त्यांना दिल्लीस्थित त्यांच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी FIR दाखल केला असून कनौजिया यांची चौकशी सुरू असल्याची माहिती लखनौचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक कलानिधी नैथनी यांनी दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)