फॅक्ट चेक: बॅलेट बॉक्समध्ये चिठ्ठी टाकून केली बीअरची मागणी?

    • Author, वम्सी चैतन्य पेडसनगंटी
    • Role, फॅक्ट चेक टीम

दक्षिण भारतात सोशल मीडियावर एक चिठ्ठी सध्या व्हायरल होतेय. तेलंगणातल्या मंडळ निवडणुकीदरम्यान एका मतदाराने बॅलेट बॉक्समध्ये चिठ्ठी टाकून त्याच्या भागात बीअर उपलब्ध करून देण्याची मागणी केल्याचं म्हटलं जातंय.

या व्हायरल चिठ्ठीनुसार हे प्रकरण तेलंगणा राज्यातल्या जगित्याल जिल्ह्यातलं आहे. मात्र, सोशल मीडियावर काही ठिकाणी ही चिठ्ठी करीमनगर जिल्ह्यातली असल्याचं सांगूनही शेअर होतेय.

साध्या वहीच्या पानावर ही चिठ्ठी लिहिली आहे. यावर 6 मे 2019 तारीख टाकली आहे. ही चिठ्ठी लिहिणाऱ्याने 'जगित्याल जिल्ह्यातल्या जनते'च्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यासाठी, असं लिहिलंय.

चिठ्ठीतला मजकूर आहे, "आमच्या जिल्ह्यातला किंगफिशर बीअरचा स्टॉक संपलाय. त्यामुळे आमच्या जिल्ह्यातले लोक बीअर घेण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यात जातात. म्हणूनच ही बीअर आमच्या राज्यातही उपलब्ध करून द्यावी."

सोशल मीडियावर ही चिठ्ठी इतकी व्हायरल झाली आहे की स्थानिक मीडियासोबतच टाईम्स ऑफ इंडिया सारख्या राष्ट्रीय न्यूज वेबसाईटवरही त्याची बातमी प्रकाशित करण्यात आलीय.

या वेबसाईटनुसार तेलंगणा मंडल निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांना ही चिठ्ठी मिळाली.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार तेलंगणातल्या जगित्याल जिल्ह्यात 6 मे 2019 रोजी मंडल निवडणुकीसाठी मतदान झालं होतं.

बीबीसीच्या अनेक वाचकांनी आम्हाला व्हॉट्सअपवरून ही चिठ्ठी पाठवून सत्य जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केलीय.

आमच्या पडताळणीत आढळलं की या चिठ्ठीबाबतचे दावे खोटे आहेत.

चिठ्ठीची पडताळणी

सोशल मीडियावर ज्या कथित चिठ्ठीचा फोटो शेअर होतोय ती चिठ्ठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना मिळाली आणि त्यांनीच ती प्रसिद्ध केल्याचं सांगितलं जातंय. मात्र, चिठ्ठी बघून असं वाटत नाही की ती दुमडून बॅलेट बॉक्समध्ये टाकण्यात आली असावी. कारण, फोटोत हे पान (चिठ्ठी) कॉपीशी जोडलेलं दाखवण्यात आलंय.

याबाबत अधिकृत माहिती मिळवण्यासाठी आम्ही तेलंगणा निवडणूक आयोग आणि जगित्याल जिल्ह्याचे जाइंट कलेक्टर यांच्याशी बातचीत केली.

तेलंगणा निवडणूक आयोगाचे सचिव एम. अशोक कुमार यांनी सांगितलं की मंडळ निवडणुकीचे बॅलेट बॉक्स जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यांसमोर उघडले जातात. त्यामुळे बीअरची मागणी करणाऱ्या कुठल्याच पत्राची माहिती निवडणूक आयोगाला नाही.

जगित्याल जिल्ह्याचे जाइंट कलेक्टर बी. राजेसम यांनी बीबीसीला सांगितलं की मंडळ निवडणुकीच्या मतमोजणीवेळी त्यांना बॅलेट बॉक्समध्ये एक चिठ्ठी मिळाली होती. जगित्यालमधल्या एका स्थानिकाने ती लिहिली होती आणि त्यात त्यांच्या भागात रस्ता बनवण्याची मागणी केली होती. पण, बीअरची मागणी केल्याची बातमी साफ चुकीची आहे.

मात्र, यापूर्वी असं कधी झालंय का की ज्यात एखाद्या मतदाराने अशी काही मागणी केलीय?

याविषयी जॉइंट कलेक्टर बी. राजेसम यांनी सांगितलं की 2018 साली 'प्रजा वाणी कार्यक्रमा'दरम्यान एका वयोवृद्ध मतदाराने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून त्यांच्या भागात मद्यपुरवठा करण्याची मागणी केली होती.

तेलंगणा राज्यात 'प्रजा वाणी कार्यक्रम' असा उपक्रम आहे ज्यात जिल्हाधिकारी आपल्या प्रभागातल्या लोकांशी भेटतात आणि त्यांच्या समस्या ऐकून घेतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)