You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अहमदनगर लोकसभा निकाल : सुजय विखे पाटील अहमदनगरचे नवे खासदार, संग्राम जगताप यांचा केला पराभव
अहमदनगरमध्ये भाजपचे सुजय विखे पाटील विजयी झाले आहेत. 2 लाखांपेक्षा जास्त मतांनी ते विजयी झाले होते.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ज्या मतदारसंघांची सर्वाधिक चर्चा झाली त्यांपैकी एक म्हणजे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय यांनी बंडखोरीचा पवित्रा घेत भाजपमध्ये केलेल्या प्रवेशानंतर या मतदारसंघातील राजकीय समीकरणंच बदलली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विखे-पाटील कुटुंबियातील संघर्षाची पार्श्वभूमीही सुजय यांच्या भाजप प्रवेशाला असल्याचं मत विश्लेषकांनी व्यक्त केलं. एकूणच निवडणुकीच्या काळात चर्चेत राहिलेल्या या मतदारसंघाच्या निकालाकडेही सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं.
नगरमध्ये भाजपचे सुजय विखे पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीनं संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली.
या लढतीची पार्श्वभूमी काय?
आघाडीमध्ये जागावाटपात नगरच्या जागेचा तिढा बराच काळ कायम होता. राष्ट्रवादी काँग्रेसनं ही जागा काँग्रेससाठी सोडण्यास नकार दिला.
"ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातली आहे. नगरच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये 2 आमदार राष्ट्रवादीचे आहेत. काँग्रेसचा एकही सदस्य गेल्या निवडणुकीत निवडून आलेला नाही. तसंच उरलेल्या चारही मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला क्रमांक दोनची मतं आहेत.
"दुसरीकडे शिर्डीचा मतदासंघ काँग्रेसकडे आहे. त्यामुळे नगरची जागा काँग्रेसने मागण्याला काही अर्थच नाही. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच लढवेल," असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा सोडणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
"सुजय विखे पाटील गेल्या तीन वर्षांपासून मतदारसंघात काम करत होते. पण नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली. सुजय विखे-पाटील आता 37 वर्षांचे आहेत. आपली राजकीय कारकीर्द लवकर स्थिर व्हावी असं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे," असं मत स्थानिक पत्रकार अशोक तुपे यांनी सुजय यांच्या भाजप प्रवेशाच्या संदर्भात बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं होतं.
नगरमध्ये घराणेशाहीची प्रतिष्ठा
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप हे भाजपचे उमेदवार शिवाजीराव कार्डिले यांचे जावई. त्यामुळे नगरमध्ये एकीकडे घराणेशाही तर दुसरीकडे पक्षनिष्ठा असा संघर्षही पहायला मिळाला. राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत होतं. मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपण नगरमध्ये प्रचार करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
संग्राम जगताप यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे पडद्यामागून भाजपलाच मदत करत असल्याचा आरोप केला होता.
दुसरीकडे संग्राम जगताप यांचे सासरे आणि भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले हे भाजपच्या व्यासपीठावर जाऊन डॉ. सुजय विखे पाटील यांचा प्रचार करत होते. पण तरीही जावयाला पराभूत कसं करणार हा पेच त्यांच्यासमोर होता.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील समीकरणं
२००४ ला राष्ट्रवादीचे तुकाराम गडाख हे नगर दक्षिणमधून लोकसभा निवडून आले. त्यानंतर २००९ साली शिर्डी लोकसभा मतदारसंघ आरक्षित झाला. ही जागा राष्ट्रवादीतल्या गोटातली असली तरी २००९ पासून वारंवार या जागेवर राष्ट्रवादीचा पराभव झाला आहे.
२००४ ला राष्ट्रवादीचे तुकाराम गडाख इथून निवडून आले. २००९ ला राष्ट्रवादीकडून शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण त्यांचा पराभव झाला. भाजपचे उमेदवार दिलीप गांधी निवडून आले होते.
२०१४ ला राष्ट्रवादीकडून राजीव राजळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण त्यांना पराभूत करत पुन्हा भाजपचे दिलीप गांधी विजयी झाले होते.
अहमदनगर मतदारसंघावर राष्ट्रवादीची चांगली पकड होती. पण मागच्या १० वर्षात स्थानिक तडजोडींमुळे ती कमकुवत झाल्याचं ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कुलकर्णी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. २००९ नंतर नगरच्या दोन्ही मतदारसंघात शिवसेना-भाजपने वर्चस्व मिळवलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)