You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नथुराम गोडसेचा विषय निघाल्यावर नरेंद्र मोदी बॅकफूटवर का जातात?
- Author, राजेश जोशी
- Role, बीबीसी हिंदी
मोदी शाह आणि शैलीचं राजकारण आक्रमक आहे, त्यात उग्र भावना आहेत आणि आपल्या निर्णयांवर कधीही खेद व्यक्त न करणंही समाविष्ट आहे. परंतु प्रज्ञा ठाकूरने सेल्फ गोल करून दोघांनाही बॅकफूटवर पाठवलं आहे.
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना कधी लाचार झालेलं तुम्ही कधी पाहिलं आहे का? ते दोघंही प्रत्येक गोष्ट ठणकावून-वाजवून करतात. त्यावर कधीही खेद व्यक्त करत नाहीत की त्यांना त्यावर स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही.
गुजरातमध्ये 2002 साली झालेली दंगल असो, सोहराबुद्दीन फेक एन्काउंटर असो, न्यायाधीश लोया यांचा मृत्यू असो, अमित शाह यांच्याविरोधात असलेले अनेक आरोप, नोटाबंदी, लिचिंग किंवा बॉम्बस्फोट करून निरपराध लोकांचे प्राण घेण्याचा आरोप असणाऱ्या प्रज्ञा ठाकूरला भोपाळमधून निवडणूक लढविण्याची संधी देण्याचा निर्णय. तुम्ही नरेंद्र मोदी आणि शाह यांना कधीही बॅकफूटवर गेलेलं पाहिलं नसेल.
कदाचित नथुराम गोडसे हे एकमेव असं व्यक्तिमत्त्व असेल ज्यानं मोदी आणि शाह यांच्यासारख्या आक्रमक राजकारण्यांना बॅकफूटवर पाठवलं असेल.
ज्या लोकांनी भगवा दहशतवाद संज्ञा वापरून हिंदू संस्कृतीला बदनाम केलं होतं त्यांना सांकेतिक प्रत्युत्तर देण्यासाठीच प्रज्ञा ठाकूरला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला असं मोदी-शाह म्हणत होते.
पण आता त्याच प्रज्ञा ठाकूरमुळे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना वारंवार मान खाली घालावी लागत आहे. मुंबई येथे झालेल्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांना आपण शाप दिला होता असं प्रज्ञा म्हणाल्या होत्या.
गुरूवारी त्यांनी गांधींचे मारेकरी गोडसे देशभक्त होते, देशभक्त आहेत आणि देशभक्त राहातील असं वक्तव्य केलं.
जो पक्ष देशभक्तीवर आपला कॉपीराइट सांगतो, ज्या पक्षाचे नेते येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला देशद्रोही असल्याचं प्रमाणपत्र देऊन पाकिस्तानात स्थायिक होण्याचा सल्ला देतात, त्या पक्षाची एक हायप्रोफाईल उमेदवार महात्मा गांधींच्या मारेकऱ्याला देशभक्त म्हणत असेल तर तर भाजप आणि संघ परिवाराचा राष्ट्रवाद आणि नथुराम गोडसेचा राष्ट्रवाद एकच आहे का प्रश्न विचारला जाणारच.
गोडसे आणि नरेंद्र मोदी यांची देशभक्ती एकसारखीच आहे का असा प्रश्न विचारला जाणारच.
आता त्यात जर-तर ला कोणताच वाव राहिला नसल्याचे प्रज्ञा सिंहच्या विधानातून स्पष्ट झाले होते. प्रश्नांपासून वाचण्यासाठी मोदींना टेलिव्हिजनवर दिलेल्या मुलाखतीत या विधानावर, "त्यांनी माफी मागितली आहे, मी त्यांना (प्रज्ञा ठाकूर) मनापासून कधीच माफ करू शकणार नाही हा भाग वेगळा" अशी बाजू मांडावी लागली.
याच मुलाखतीमध्ये ते म्हणाले, "ही गोष्ट खूप खराब आहे. हर प्रकारे निंदनीय आहे. कोणत्याही सभ्य समाजात अशा प्रकारच्या विचारांना स्थान असू नये."
पण भाषेच्या बाबतीत स्वतः मोदींचा रेकॉर्ड फार काही उजळ नाही. निवडणुकीच्या प्रचारात भाषेचा स्तर कमी करण्याचे आरोप त्यांच्यावर होत आहेत. जेव्हा ते आपल्या भाषणात 'काँग्रेसची विधवा' असा उल्लेख करतात. तेव्हा त्यांचा इशारा कुणाकडे असतो. डिस्लेक्सिया असलेल्या मुलांबाबत प्रश्न विचारल्यानंतर मोदी विचारतात की '40-50 वर्षाच्या मुलाचाही उपचार होऊ शकतो का?' त्यावेळी त्यांचा इशारा कुणाकडे असतो?
गुजरातचे मुख्यमंत्री असताना जेव्हा ते म्हणतात 'हम दो हमारे पांच', किंवा रस्त्यावर पंक्चर काढणारे लोक, तेव्हा त्यांचा इशारा कुणाकडे होता? जेव्ह जनरल मुशर्रफ यांचं नाव ते घेत असत तेव्हा 'मियां' या शब्दावर जोर का देत असत? किंवा तत्कालीन निवडणूक आयुक्त जे. एम. लिंगडोह यांच्या पूर्ण नावाचा उच्चार जेम्स मायकल लिंगडोह असा करून ते लहान मुलांचं जनरल नॉलेज थोडीच वाढवत होते?
त्यामुळेच प्रज्ञा ठाकूर यांच्या विधानाला घृणास्पद म्हणणं आणि मनातून कधीच माफ न करण्याची घोषणा करणं हे मोदींच्या व्यक्तिमत्त्वाविरोधात तसेच त्यांच्या राजकारणाच्या शैलीविरोधात जाणारं आहे असं वाटतं.
हे विधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांच्या राजकारणाचा पोत याविरुद्ध आहे. या आधी नरेंद्र मोदींनी सुब्रमण्यम स्वामींसारख्या भाजप नेत्यांचं नाव घेता त्यांच्या विधानांवर टीका जरूर केली आहे. मात्र टोकाची विधानं करण्याबद्दल भाजप नेत्यांना त्यांनी माफी मागायला कधीही भाग पाडलं नाही.
वादग्रस्त मुद्द्यांवर ते मौन धारण करतात किंवा त्याचं सामान्यीकरण करत सांकेतिक भाषेत आपण त्या विधानांशी असहमत असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करतात.
पण आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा बनलेल्या प्रज्ञा ठाकूरला माफी मागायला लावणं ते टाळू शकले नाहीत.
ज्याप्रकारे सॅम पित्रोदा यांच्यावर राहुल गांधी यांनी सार्वजनिकरीत्या टीका केली तसेच त्यांच्या 1984 च्या शीख दंगलींबाबत विधानावर माफी मागायला लावली. त्याप्रमाणेच भाजपने देखील केलं असतं तर योग्य ठरलं असतं. प्रज्ञा ठाकूर यांच्या विधानावर सारवासारव करण्याची भाजपला काहीच गरज नव्हती.
भर लोकसभा निवडणुकीत महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसेंना देशभक्त म्हणून प्रज्ञा ठाकूरने मोदींच्या आजवरच्या कामावर जवळपास काजळी धरलीच होती. मोदी शाह कदाचित हे स्वीकारणार नाहीत परंतु अशा विधानांमुळं प्रज्ञा यांना तिकीट देण्याच्या निर्णयाबद्दल या दोघांना नक्कीच पश्चाताप झाला असेल.
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान शिल्लक असताना हा वाद निर्माण झाला आहे. प्रज्ञा ठाकूरला आपला उमेदवार बनवण्याचा निर्णय चूक होता हे दाखवण्याचा भाजप कधीच प्रयत्न करणार नाही.
त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी हा प्रश्न विचारला तेव्हा अमित शाह यांनी प्रज्ञा ठाकूर यांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय म्हणजे भगव्या दहशतवादाचा आरोप लावणाऱ्यांविरोधात केलेला सत्याग्रह आहे असे उत्तर दिले.
ज्या व्यक्तीच्या आधारावर मोदी-शाह 'सत्याग्रह' करत होते ती व्यक्ती निःशस्त्र गांधींची हत्या करणाऱ्याला देशभक्त म्हणते.
पण गोडसे यांच्याबाबत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे आणि पक्षाचे मध्य प्रदेश माध्यम संयोजक नलीन कतील यांनीही वादग्रस्त विधाने केली आहेत. त्याकडे अमित शाह कानाडोळा करू शकले नाहीत. गांधींच्या मारेकऱ्याचा उदोउदो करणारा माणूस या देशाच्या नजरेतून किती वेगाने उतरू शकतो हे त्यांना माहिती आहे. म्हणून त्यांनी या तिन्ही नेत्यांना दहा दिवसांच्या आत स्पष्टीकरण द्यायला सांगितले आहे.
गांधींबाबत लोकांचा दृष्टिकोन बदलत आहे आणि या वादावर गोडसे खुश झाले असतील असं अनंत कुमार हेगडे यांनी ट्वीट केलं होतं. नंतर त्यांनी ट्वीट डीलिट केलं आणि आपलं ट्विटर अकाऊंट हॅक झालं होतं असं सांगितलं. प्रज्ञा ठाकूरनेही माफी मागितली आहे.
गोडसेचं गुणगान करून नंतर माफी मागण्याचा प्रघात काही नवा नाही.
भाजप खासदार साक्षी महाराज यांनीही मोदी सरकार सत्तेत आल्यावर काही महिन्यांनी संसदेबाहेर पत्रकारांशी चर्चा करताना जर गांधी देशभक्त होते तर गोडसेसुद्धा देशभक्त होते असं विधान केलं होतं. या विधानावर गदारोळ झाल्यावर साक्षी महाराज यांनी माफी मागितली होती.
पण काही काळानंतर हरियाणाचे भाजप सरकारमधील मंत्री अनिल विज यांनी नरेंद्र मोदी हा गांधींपेक्षा मोठा ब्रॅंड असल्याचं सांगितलं. तसेच आता गांधींना खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडरवरूनसुद्धा हटवलं आहे, हळूहळू चलनी नोटांवरूनसुद्धा हटवलं जाईल असं सांगितलं.
आपल्या विधानाची मोडतोड करून ते प्रसिद्ध करण्यात आलं अशी सारवासारव त्यांनी नंतर केली होती. अनिल विज यांना संघानी अभाविपमधून भाजपात पाठवलं होतं. त्यांना सर्व राजकीय दीक्षा संघाच्या शाखांमध्येच मिळाली होती.
केवळ हे भाजप नेतेच नाही तर रा. स्व. संघाचे दिवंगत सरसंघचालक प्रोफेसर राजेंद्र सिंह ऊर्फ रज्जू भैय्यासुद्धा "गोडसे अखंड भारताच्या विचारांनी भारलेले होते. त्यांचं इप्सित ध्येय अयोग्य नव्हतं पण त्यांनी चुकीचा मार्ग अवलंबला" असं म्हणायचे.
भाजपसह रा. स्व.संघ आणि त्यांच्यासंबंधी असणाऱ्या संघटना नथुराममुळे नेहमी गोंधळलेल्या स्थितीत असतात. ते कधी खुलेपणाने गोडसेंची पूजा करू शकत नाहीत की टीका करू शकत नाहीत.
मोदी आणि शाह यांच्या विधानाकडे लक्ष दिलं तर त्यामध्ये महात्मा गांधींची प्रशंसा आणि त्यांच्याप्रती भक्ती दाखवणारे शब्द दिसतील पण नथुराम गोडसे आणि गांधीहत्येला प्रेरणा देणाऱ्या विचारांवर टीका करणारे कडक शब्द कधीतरीच दिसतील. संघ, भाजप आणि नरेंद्र मोदी यांचे बरेचसे समर्थक सोशल मीडियावर खुलेपणाने गोडसेच्या बाजूने बोलताना दिसतात. त्यातील अनेक लोकांना खुद्द पंतप्रधान मोदी ट्विटरवर फॉलो करतात.
गोडसे आणि त्यांच्या विचारप्रवाहावर खुलेपणाने टीका करून मोदी आणि शाह स्वतःला या समर्थकांपासून दूर करू इच्छित नाहीत. त्यामुळेच त्यांच्या बोलण्यात गांधींभक्ती झळकते परंतु गोडसे विचाराविरोधात साफ भूमिका दिसत नाही.
संघ परिवारातील एक भाग गोडसेंसमोर नतमस्तक होण्याची इच्छा मनात धरतो. मात्र गांधीजींचं विराट व्यक्तीमत्त्व त्यांना तसं करू देत नाही. तरीही गोडसेंप्रती भाजपनेते आपलं प्रेम लपवू शकत नाहीत. त्यांच्यामुळे सगळ्या पक्षाला मान खाली घालावी लागते.
पण फाशी दिल्यावरही सत्तर वर्षांनीही गोडसेबाबत भाजप इतकी लाचार आणि मजबूर का होते? हा प्रश्न उरतोच.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)