नथुराम गोडसेबाबतच्या वक्तव्यावरून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची माफी

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसेंबाबत केलेल्या वक्तव्यावरून माफी मागितली आहे.

प्रज्ञा सिंह ठाकूर गुरुवारी म्हणाल्या होत्या, "नथुराम गोडसे देशभक्त होते,आहेत आणि देशभक्त राहतील."

तसंच त्या पुढे म्हणाल्या, "जे लोक त्यांना दहशतवादी म्हणतात, त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. अशा लोकांना निवडणुकीत चोख उत्तर देऊ."

पण भाजपनं त्यांच्या या विधानाशी सहमत नसल्याचं म्हणत त्यांना माफी मागावी लागेल असं म्हटलं होतं.

त्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांनी माफी मागितली आहे. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

"हे माझं खासगी वक्तव्य आहे. मी रोडशोमध्ये होते त्यावेळी जाता जाता मी हे उत्तर दिलं. माझ्या भावना तशा नव्हत्या. यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते. मीडियानं माझं वक्तव्य तोडूनमोडून दाखवलं. गांधीजींनी देशासाठी जे केलं आहे ते विसरता येणार नाही, मी त्यांचा सन्मान करते. मी पक्षाच्या शिस्तीचं पालन करते. जी पक्षाची भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे," असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

या आधी एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रज्ञा ठाकूर यांनी माफी मागण्यास नकार दिल्याचं वृत्त दिलं आहे.

भाजपनं मात्र प्रज्ञा यांच्या विधानापासून फारकत घेतली आहे. त्यांच्या विधानाशी पक्ष सहमत नाही, याचं स्पष्टीकरण पक्ष त्यांच्याकडे मागेल तसंच त्यांना या विधानाबद्दल सार्वजनिकरित्या माफी मागावी लागेल, असं भाजपा नेते जीवीएल नरसिह्मा राव यांनी सांगितलं होतं.

प्रज्ञा ठाकूर यांच्या विधानावर अमित शाह, मध्य प्रदेश भाजपानं स्पष्टीकरण द्यावं आणि देशाची माफी मागावी अशी मागणी भोपाळ मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांनी केली होती.

दिग्विजय सिंह म्हणाले, "मी या विधानाचा निषेध करतो. नथुराम गोडसे खुनी होता. त्याचं कौतुक करणं देशभक्ती नाही तर हा देशद्रोह आहे."

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, "गोडसेचे वंशज, सत्तारूढ भाजपाकडून भारताच्या आत्म्यावर हा हल्ला आहे. भाजपाच्या नेत्या राष्ट्रपित्याच्या मारेकऱ्याला सच्चा देशभक्त म्हणत आहेत. ज्या हेमंत करकरेंसारख्या लोकांनी देशासाठी प्राण दिले, त्यांना हे देशद्रोही म्हणत आहेत."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)