You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमित शाह यांच्या रोड शोमध्ये झालेल्या हिंसाचाराने तापलं बंगालचं राजकारण
- Author, झुबैर अहमद
- Role, बीबीसी प्रतिनिधी, कोलकाता
पश्चिम बंगालमधल्या कोलकाता शहरात एक छोटंसं कॅम्पस असलेलं विद्यासागर कॉलेज. मात्र, मंगळवारच्या संध्याकाळपासून हा कॅम्पस राजकारणाचा आखाडा बनलाय.
चिंचोळे रस्ते आणि नेहमीच होणारी वाहतूक कोंडी, ही या भागाची ओळख. मंगळवारी संध्याकाळी या भागात जे घडलं त्यानंतर इथे बघ्यांची गर्दी उसळली आहे. विरोध प्रदर्शन करण्यासाठी शेकडो लोक जमले आहेत आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारीसुद्धा आहेत.
कोलकाता शहरात मंगळवारी संध्याकाळी भाजप अध्यक्ष अमित शाह यांचा रोड शो होता. या रोड शो दरम्यान हिंसाचार झाला. याच हिंसाचारादरम्यान काही समाजकंटकांनी कॉलेजमध्ये उभारलेला एकोणिसाव्या शतकातले समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड केली.
या मूर्तीच्या तोडफोडीनंतर राजकारण तापलं. तृणमूल काँग्रेस या घटनेला बंगाली अस्मितेशी जोडून बघतेय.
मूर्तीच्या तोडफोडीचा सर्वांत आधी विरोध केला तो सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया (कम्युनिस्ट) पक्षाने. या पक्षाने भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे.
ईश्वरचंद्र विद्यासागर यांची मूर्ती कोणी फोडली?
सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया (कम्युनिस्ट) पक्षाचे कार्यकर्ते शम्सूल आलम सांगतात, "भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी मूर्ती फोडली. त्यांनीच कॉलेजच्या आत गाड्या पेटवल्या. हिंसाचार त्यांनीच सुरू केला. भाजप आणि संघाच्या लोकांनी इतर राज्यांमध्येदेखील अनेकांच्या पुतळ्यांची विटंबना केली आहे."
मूर्ती फोडण्याचा विरोध करण्यासाठी डाव्या पक्षांचे शेकडो कार्यकर्ते बुधवारी एकत्र आले होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचीही (सीपीएम) एक रॅली इथून गेली. लोकांच्या हातात लाल झेंडे होतो. ते हिंसाचाराविरोधात घोषणाबाजी करत होते.
या रॅलीमध्ये सहभागी झालेले निरंजन चक्रवर्ती यांना मंगळवारच्या तोडफोडीसाठी कोण जबाबदार होतं, याबद्दल विचारलं असता ते म्हणाले, "हिंसाचारात दोन्ही पक्ष सामील होते. हा तृणमूल काँग्रेस आणि भाजप दोघांचा कट होता. हा पूर्वनियोजित हिंसाचार होता." हे कॉलेज गजबजलेल्या भागात आहे. या भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकानं आहेत. संपूर्ण घटनेविषयी या व्यापाऱ्यांनी त्या संध्याकाळी काय बघितलं, याविषयी विचारलं.
परिमल सहा नावाच्या व्यापाऱ्याने सांगितलं, "अमित शाह जाताच मारामारी सुरू झाली. हल्ला कुणी केला, हे आम्ही बघितलं नाही."
राजन चक्रवर्ती नावाचे आणखी एक व्यापारी आहेत. त्यांनी सांगितलं, "हिंसाचार सुरू होताच अफरातफर सुरू झाली. त्यानंतर मी दुकान बंद करून तिथून निघालो."
इथले दुकानदार काहीच स्पष्ट सांगू शकत नाहीत. आता दुकानं उघडली आहेत. तरीही काहीतरी अघटित घडण्याची भीती यांच्या मनात आहे.
मूर्ती तोडण्याचा मुद्द्यावरून राजकारण
ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मूर्तीची विटंबना झाल्याने राज्यभर नाराजी आहे. याविरोधात विरोध प्रदर्शन करण्यासाठी आलेले निमन रॉय यांना हा बंगाली संस्कृतीवर असलेला हल्ला वाटतो. ते म्हणतात, "संपूर्ण देश ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा आदर करतो. बंगालमध्ये तर त्यांच्याविषयी फारच आदर आहे. त्यांच्या मूर्तीवर केलेला हल्ला बंगाली संस्कृतीवरचा हल्ला आहे."
या मूर्तीची विटंबना संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये मुद्दा बनला आहे. मूर्ती फोडल्यानंतर तृणमूल काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलच्या डीपीमध्ये ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा फोटो लावला आहे. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा अपमान म्हणजे आपला अपमान, असा संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
सीपीएमच्या रॅलीमध्ये आलेल्या एका वयोवृद्ध कार्यकर्त्याने म्हटलं की ममता बॅनर्जी बंगाली अस्मितेचं सोंग करत आहेत. ते म्हणाले, "हे ममता आणि त्यांच्या पक्षाचं नाटक आहे. त्यांना या घटनेचा लाभ घ्यायचा आहे. मात्र, याचा काही राजकीय फायदा होईल, असं मला वाटत नाही." मात्र, यातून बॅनर्जींना फायदा होईल, असं अनेकांना वाटतं.
द हिंदू वृत्तपत्राचे ज्येष्ठ पत्रकार शुभोजीत बागची यांच्या मतेदेखील ममता बॅनर्जी यांना या घटनेचा फायदा होईल, असं वाटतं. ते म्हणतात, "कोलकात्यातल्या तीन जागांवर तृणमूल काँग्रेसला नक्कीच फायदा होईल." निवडणुकीच्या 19 मे रोजी होणाऱ्या शेवटच्या टप्प्यात प. बंगालमधल्या 9 जागांवर मतदान होणार आहे. यातल्या बहुतांश जागा या कोलकात्याच्या आसपासच्या आहेत आणि हे मतदारसंघ तृणमूल काँग्रेसचे गड समजले जातात.
पश्चिम बंगालमध्ये गेल्या सहाही टप्प्यांमध्ये हिंसा झाली. असं का होतं? सीपीएम कार्यकर्ते मनिष दास म्हणतात, "ममता यांच्या पायाखालची वाळू सरकतेय. त्यामुळेच त्या हिंसाचार घडवून आणत आहेत. तृणमूलचे कार्यकर्ते आपल्याला धमकावतात, मारहाण करतात, असा भाजपचा आरोप आहे."
तर भाजपच हिंसाचार घडवत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. मंगळवारच्या घटनेविषयी तृणमूल काँग्रेसचे समर्थक मोहन झा म्हणतात, "अमित शहा यांनी राज्याबाहेरून माणसं बोलवली आणि बाहेरून आलेल्या या लोकांनीच हिंसा भडकवली."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)