अमित शाह विरुद्ध ममता बॅनर्जी : रोडशोवरून खडाजंगी, आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण

मंगळवारी कोलकात्यामध्ये भाजपच्या रोडशोदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर अध्यक्ष अमित शहा यांनी एका पत्रकार परिषदेत बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

बुधवारी दुपारी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, "कोलकात्यातील रोड शोला CRPFचं संरक्षण नसतं तर माझं वाचणं कठीण होतं. कालच्या रोड शोमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली."

रोड शोमध्ये काही विद्यार्थी गोंधळ करतील अशी शक्यता वर्तविली असूनही पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली गेली नाही, असं म्हणत अमित शाह यांनी तृणमूल काँग्रेस आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप केले.

या हिंसाचारामध्ये समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड भाजप कार्यकर्त्यांनी केल्याचे आरोप अमित शाह यांनी फेटाळून लावले.

आपल्या दाव्याला दुजोरा देण्यासाठी अमित शाह यांनी काही फोटो दाखवले. कॉलेजचं गेट बंद असल्याचा फोटो अमित शाह यांनी दाखवला आणि महाविद्यालयाच्या आत जाऊन एका खोलीत असलेला पुतळ्याची तोडफोड भाजप कार्यकर्ते कसे करू शकतात, असा प्रश्न उपस्थित केला.

तसंच संबंधित प्रकार हा संध्याकाळी साडे सात वाजता घडला. त्यावेळेस कॉलेज बंद झालं होतं. "त्यामुळे कुलूप उघडून आम्ही आतमध्ये जाऊन तोडफोड करू शकत नाही," असा युक्तिवाद अमित शाह यांनी केला.

खोटी सहानुभूती मिळवण्यासाठी आणि मतांचं राजकारण करण्यासाठीच तृणमूल काँग्रेसनं विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड केली असल्याचा आरोप अमित शाहांनी केला.

विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड ही ममता बॅनर्जींचे दिवस फिरल्याचं चिन्ह आहे, असंही शाह यांनी म्हटलं.

तृणमूलने आरोप फेटाळले

भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी पत्रकार परिषद घेतली.

अमित शहा खोटारडे आहेत असा आरोप त्यांनी केला. आपला मुद्दा मांडण्यासाठी त्यांनी अनेक व्हीडिओ आणि फोटो दाखवले आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा फोडल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

एक व्हीडिओही त्यांनी ट्वीट केला आहे. भाडोत्री गुंडातर्फे हे कृत्य केल्याचा आरोप त्यांनी केला. आम्हाला केंद्रीय सुरक्षा दलांच्या विरोधात कोणताही आकस नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. 

आमच्याकडे फोटोंच्या रुपात दोन पुरावे आहेत. त्यावरून भाजप आणि केंद्रीय दलांचं संगनमत असल्याचं सिद्ध होतं, असाही आरोप त्यांनी केला आहे.

'केवळ बंगालमध्येच हिंसाचार का?'

"देशभरात मतदानाचे सहा टप्पे पार पडले आहेत. या सहा टप्प्यांत पश्चिम बंगाल वगळता अन्य कोणत्याही राज्यात हिंसा झाली नाही. तरीही ममता बॅनर्जी भाजपवर हिंसाचाराचा आरोप करत आहेत," असं शहांनी म्हटलं. 

"तृणमूल काँग्रेस केवळ बंगालमधल्या 42 जागा लढवत आहे. भाजप देशभर लढत आहे. वेगवेगळ्या राज्यांत तिथल्या प्रादेशिक पक्षांविरोधात भाजप लढत आहे. पण तिथे हिंसाचाराच्या घटना घडल्या नाहीत. बंगालमध्ये मात्र प्रत्येक टप्प्यावर हिंसाचार झाला. इथं लोकशाहीचा गळा घोटला जातोय."

अमित शाह यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हटलं, की "बंगालमध्ये पंचायतीच्या निवडणुकांमध्येही मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. 60 कार्यकर्त्यांची हत्या झाली. हे सर्व कार्यकर्ते विरोधी पक्षाचे होते. बहुतांश कार्यकर्ते तर भाजपचेच होते. हिंसाचाराच्या जोरावर आपण निवडणूक जिंकू असं ममता बॅनर्जींना वाटत असेल. पण बंगालची जनता कधीही हिंसेचं समर्थन करणार नाही."

दरम्यान, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे की भाजपने बाहेरून गुंड बोलवून तणाव निर्माण केला आणि हिंसाचार घडवून आणला. जवळच्या विद्यासागर कॉलेजमध्ये कथितरीत्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीचा त्यांनी निषेध केला.

'निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह'

बंगालमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर हिंसाचार होत असताना निवडणूक आयोग कोणतीही कारवाई का करत नाही, असा प्रश्न अमित शहांनी उपस्थित केला. 

"दोन दिवसांपूर्वी ममता बॅनर्जींनी 'बदला लूंगी' या शब्दांत व्यासपीठावरून धमकी दिली. योगी आदित्यनाथांच्या सभेवर बंदी घालण्यात आली. मात्र तरीही निवडणूक आयोगानं ममता बॅनर्जींवर तसंच तृणमूलच्या गुंडांबद्दल निवडणूक आयोगानं कोणतीही भूमिका का घेतली नाही," असा सवाल अमित शहांनी यावेळी उपस्थित केला.

या रोड शोच्या मुद्द्यावरून आधीपासूनच तणाव आणि आरोप-प्रत्यारोप होत होते. रोड शोच्या दोन तास आधी पोलिसांनी लेनिन सरणी या रस्त्यावरून, जिथे भाजपचा रोड शो होणार होता, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि कोलकाता उत्तरचे भाजप उमेदवार राहुल सिन्हा यांचे बॅनर, झेंडे आणि कटआऊट काढून टाकले होते.

पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांनी निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरून कटआऊट आणि बॅनर काढले होते. विनापरवानगी हे बॅनर राज्यातल्या सार्वजनिक ठिकाणी लावले होते, असं ते म्हणाले.

तुम्हाला या विषयी काय वाटतं? आपलं मत नोंदवा इथे

'भाजप स्वबळावर 300 हून अधिक जागा जिंकेल'

"मी पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत 16 सभा घेतल्या आहेत. सहा टप्प्यांतील मतदानही पार पडलं आहे. इथं भाजप जिंकणार हे आता जवळपास निश्चित झाल्यानं तृणमूल काँग्रेस हिंसाचार करत आहे," असं अमित शहांनी म्हटलं. 

बंगालमध्ये 42 पैकी 23 जागांवर भाजप विजय मिळवेल, असा विश्वास अमित शाहांनी व्यक्त केला. "देशात भाजपच्या 300 हून अधिक जागा येतील. विरोधकांना विरोधी पक्षनेते पद मिळविण्यासाठीच्या जागा जिंकणंही अवघड जाईल."

तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी बदलले त्यांचे डीपी

मंगळवारच्या हिंसाचारात ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड भाजप कार्यकर्त्यांनीच केली, या आरोपावर तृणमूल काँग्रेसही ठाम आहे. भाजपच्या या कथित कृत्याचा निषेध करण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूलच्या अन्य नेत्यांनी त्यांच्या फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवरील डीपी बदलले आहेत. या सर्व नेत्यांनी डीपी म्हणून ईश्वर चंद्र विद्यासागर यांचा फोटो ठेवला आहे.

तृणमूल काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर आणि फेसबुक पेजवरही विद्यासागर यांचेच फोटो दिसत आहेत.

दरम्यान, मंगळवारी झालेल्या हिंसाचारानंतर ममता बॅनर्जींनी अमित शाह यांच्यावर कडाडून टीका केली. "अमित शाह स्वतःला कोण समजतात? ते सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत का? त्यांना कुणी विरोध न करायला ते देव लागून गेलेत का?" असं ममता बॅनर्जी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)