You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IPL Final - MI vs CSK: मुंबई इंडियन्सचा चेन्नई सुपर किंग्सवर चुरशीच्या सामन्यात विजय
IPLच्या 12व्या हंगामाचा फायनल सामना - मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स. विजयासाठी चेन्नईला शेवटच्या बॉलवर एक दोन रन्सची आवश्यकता होती. परिस्थिती अशी होती की जर या दोन धावा काढल्या तर चेन्नईचं चौथं IPL जेतेपद आणि जर त्यांना नाही जमलं तर मुंबईचं.
मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि चेन्नईसमोर 150 धावांचं लक्ष्य ठेवलं. चेन्नईकडून शेन वॉटसनने सर्वाधिक 80 धावा केल्या, पण त्याच्या या दमदार अर्धशतकानंतरही चेन्नई सुपर किंग्ज संघ पराभूत झाला.
हा सामना शेवटपर्यंत चुरशीचा झाला. कधी चेन्नईचं पारडं जड होत होतं तर कधी मुंबईचं.
शेवटच्या बॉलवर चेन्नईला दोन धावा हव्या होत्या. लसिथ मलिंगाने शेवटचा बॉल टाकला आणि शेवटच्या बॉलवर शार्दुल ठाकूरची विकेट घेतली. आणि आयपीएलचा 12 सिझन मुंबईच्या नावे करून दिला.
असे होते संघ
मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा (कर्णधार), इल्विन लुईस, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, युवराज सिंग, मिचेल मक्लेघान, लसिथ मलिंगा, जसप्रीत बुमराह, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, मकरंद मार्कंडेय, जयंत यादव, बरिंदर स्राण, राहुल चहर, अनमोलप्रीत सिंग, बेन कटिंग, ब्युआन हेन्ड्रिंक्स, पंकज जैस्वाल, सिद्धेश लाड, रसीख सलाम, अनुकूल रॉय, आदित्य तरे.
चेन्नई सुपर किंग्स- महेंद्र सिंग धोनी, शेन वॉटसन, फॅफ डू प्लेसिस, अंबाती रायुडू, सुरेश रैना, मुरली विजय, शार्दूल ठाकूर, हरभजन सिंग, इम्रान ताहीर, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, केएम आसिफ, चैतन्य बिश्नोई, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, नारायण जगदीशन, स्कॉट कुलेजिन, मोनू कुमार, मिचेल सँटनर, करण शर्मा, मोहित शर्मा, ध्रुव शोरे.
मुंबईचा डाव
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीपासूनच क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा यांनी तुफानी फटकेबाजीचा बेत केला होता.
पण त्यांना लगेचच चेन्नईच्या गोलंदाजांनी माघारी धाडलं. क्विंटन डी कॉकने 29 धावा केल्या तर कॅप्टन रोहित शर्माने 15.
यानंतर मुंबईच्या विकेट्स सातत्याने पडत होत्या पण अखेर किरन पोलार्डच्या 41 धावा केल्या आणि ईशान किशनच्या 23 धावांच्या भरवशावर मुंबईने 149पर्यंत मजल मारली.
चेन्नईकडून बॉलिंग आणि क्षेत्ररक्षणादरम्यान झालेल्या चुका नंतर त्यांनाच एका धावेने सामना हरल्यावर महाग पडल्या.
मुंबईकडून दीपक चहरने तीन विकेट तर शार्दुल ठाकूर आणि इम्रान ताहिर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
मुंबईने 149 धावसंख्या उभारून चेन्नईसमोर 150 धावांचं उद्दिष्ट ठेवलं.
चेन्नईचा डाव
चेन्नईच्या डावात सातत्यपूर्ण खेळ केला तो शेन वॉटसनने. त्याने या सामन्यात 59 बॉलमध्ये 80 धावा केल्या. त्यानंतर डुप्लेसीने 26 धावा केल्या. या व्यतिरिक्त कुणाला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही.
ड्वेन ब्राव्होने 15 धावा केल्या तर सुरेश रैनाने 8 धावा.
महेंद्र सिंह धोनी केवळ 2 धावा काढून धावबाद झाला. ईशान किशनने डायरेक्ट हिट घेऊन धोनीला धावबाद केलं.
सतराव्या ओव्हरमध्ये शेन राहुल चहरने कॅच सोडून वॅटसनला जीवदान दिलं. त्यावेळी तो वॉटसन 55 धावांवर खेळत होता. पण याचं त्याला अंतिम विजयात रूपांतर करता आलं नाही.
शेवटच्या ओव्हरमधला थरार
चेन्नईला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी नऊ धावा हव्या होत्या. कॅप्टन शर्मानं बॉल लसिथ मलिंगाच्या हातात दिला.
मलिंगानं त्याच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये 20 धावा दिल्या होत्या. अशावेळी आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ करण्याचा दबाव मलिंगावर होता. समोर चेन्नईचा दिग्गज फलंदाज शेन वॉटसन होता.
पहिला बॉल मलिंगानं यॉर्कर टाकला. वॉटसननं या चेंडूवर एक धाव घेतली.
दुसरा बॉल फुलटॉस होता ज्यावर रवींद्र जाडेजानंही एक धाव चोरली.
तिसरा चेंडू मलिंगानं लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला यॉर्कर होता. बाउंड्रीपर्यंत पोहोचलेल्या बॉलवर फक्त दोन धावा आल्या.
चौथ्या बॉलवर सामना फिरला, असं म्हणता येईल. स्क्वेअरकडे मारलेल्या शॉटवर आधी दोन धावा येतील, असं वाटत होतं. मात्र या प्रयत्नात असलेला वॉटसन फसला. कृणाल पांड्याचा थ्रो क्विंटन डि कॉकने कमाली धरला नि स्टंप्स उडवले. वॉटसन 59 बॉलमध्ये 80 धावांवर माघारी परतला.
आचा गरज होती 2 बॉलमध्ये चार धावांची.
पाचवा चेंडू वॉटसनच्या जागेवर आलेल्या शार्दूल ठाकूरनं बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेन खेळला. बाउंड्री जाते की काय, असं वाटत असतानाच फक्त दोन धावा आल्या.
शेवटच्या चेंडूवर आता चेन्नईला विजयासाठी केवळ दोन धावा हव्या होत्या. या चेंडूवर चेन्नईच्या खेळाडूची विकेट घेणं हा एकच पर्याय रोहित आणि मलिंगापाशी उरला होता.
चेन्नईनं शेवटच्या चेंडूवर एक जरी धाव घेतली असती तर सामना राहिला असता. आणि मग ट्रॉफी कोणाच्या हातात जाणार हे सुपर ओव्हरमध्ये ठरलं असतं.
मलिंगानं शेवटचा चेंडू मिडल स्टंपवर टाकला. हा स्लो यॉर्कर होता. हा चेंडू शार्दूल ठाकूरच्या पॅडला लागला. शार्दूल ठाकूर आउट झाल्याचा निर्णय अंपायरनं दिला. मुंबईनं चेन्नईवर शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला.
कर्णधार म्हणून IPLमधील सर्व अंतिम सामने जिंकण्याचं रोहित शर्माचं रेकॉर्डही मलिंगानं अबाधित राखलं.
या सामन्यानंतर टीमचा मेंटॉर सचिन तेंडुलकरने हार्दिक पांड्या, राहुल चहार आणि जसप्रीत बुमराह यांचं कौतुक केलं.
"महेंद्र सिंह धोनीची विकेट, हा सामन्याचा महत्त्वाचा क्षण होता. हार्दिक पांड्या संपूर्ण IPL हंगामात चांगला खेळलाय," असं सचिनने म्हटलं.
आतापर्यंत चेन्नईने 2018, 2011 आणि 2010 या तीन वर्षांत जेतेपद पटकावलं. तर मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017 आणि आता 2019मध्ये, अशी चार वेळा IPLची ट्रॉफी मुंबईला नेली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)