IPL 2019 मधले 11 रोमांचक क्षण: संतापलेला धोनी, मंकडिंग आणि जादूची झप्पी

    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

आयपीएलचा 12 वा हंगाम संपायला अवघे काही तास बाकी आहेत. खेळाइतकीच काही अविस्मरणीय घटनांनी ही स्पर्धा गाजवली. रन्स, विकेट्स, आकडेवारी यापल्याड संपूर्ण हंगामभर चर्चित राहिलेल्या अकरा प्रसंगांची ही उजळणी.

1.अश्विन बटलर मंकडिंग

आयपीएलच्या बाराव्या हंगामाचा सगळ्यात चर्चित प्रसंग म्हणजे किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार आणि फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरला मंकडेड बाद केलं. जयपूर इथे २५ मार्च रोजी झालेल्या लढतीत अश्विनने रनअपमध्येच थांबून बॅट्समनसाठी असलेल्या क्रीझच्या बाहेर उभा असलेल्या बटलरला आऊट केलं. आऊट होण्याच्या या प्रकाराला मंकडेड म्हणतात.

नियमानुसार बॅट्समन क्रीझमध्ये नसेल तर बॉलरला आऊट करता येतं. मात्र आऊट करण्याच्या याप्रकाराची रडीचा डाव म्हणून पाहिलं जातं. असं आऊट करणं स्पिरीट ऑफ द गेमला धरून नसल्याचंही अनेकांचं म्हणणं आहे. असं आऊट करण्यापूर्वी बॉलरने किमान एकदा वॉर्निंग द्यायला हवी असं अलिखित नियम आहे. त्या सामन्यात पंजाबने १८४ धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ सुस्थितीत होता. बटलर उत्तम फलंदाजी करत होता. बटलर बाद होताच मॅच फिरली. राजस्थानने सामना गमावला. मंकडेड प्रकरण प्रदीर्घ काळ चर्चेत राहिलं.

2.आणि कुलदीप यादव रडू लागला….

चायनामन स्पिनर कुलदीप यादव कोलकाता नाईट रायडर्स संघाचा अविभाज्य भाग आहे. २४ वर्षांच्या कुलदीपने याआधीच्या हंगामांमध्ये कोलकाताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. गेल्या दोन वर्षात टीम इंडियासाठी खेळताना सातत्यपूर्ण प्रदर्शनामुळे कुलदीपची वर्ल्डकप संघातही निवड झाली. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये कुलदीपला सूर गवसला नाही. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुविरुद्धच्या कोलकाता इथं झालेल्या मॅचमध्ये कुलदीपच्या एका ओव्हरमध्ये मोईन अलीने तीन सिक्स आणि दोन फोर लगावले. बेंगळुरूने कुलदीपच्या या ओव्हरमध्ये २७ धावा चोपून काढल्या. ही ओव्हर संपल्यानंतर कुलदीप चक्क रडू लागला.

जगभरातील चाहत्यांना आधी हे खरं वाटलं नाही पण परंतु कॅमेऱ्याने कुलदीपचे अश्रू नीट टिपल्यानंतर सोशल मीडियावर बराच काळ या रडण्याची चर्चा होती. संघातील सहकाऱ्यांनी सांत्वन केल्यानंतर कुलदीप रडणं थांबवून बाऊंड्रीवर क्षेत्ररक्षणासाठी रवाना झाला. मात्र आयपीएलमध्ये धुलाई झाल्यावर रडणारा बॉलर वर्ल्डकपमध्ये आपली कमान काय सांभाळणार अशी टीका कुलदीपवर झाली. मात्र प्रत्येक बॉलरला कधी ना कधी याचा सामना करावा लागतो असं म्हणत अनेकांनी कुलदीपला पाठिंबा व्यक्त केला.

3.बेल्सनी केलं बेलआऊट

क्रिकेटच्या नियमानुसार, स्टंप्सच्यावर असलेल्या बेल्स जागेवरून बाजूला झाल्या किंवा उडवल्या गेल्या तरच आऊट देण्यात येतं. यंदाच्या आयपीएलमध्ये दोनदा असं झालं की बॉल बेल्सला लागला मात्र बेल्स जागेवरून पडल्या नाहीत. ख्रिस लिन आणि चेन्नई सुपर किंग्सचा थला अर्थात महेंद्रसिंग धोनी यांना बेल्सनी बेलआऊट अर्थात जीवनदान मिळवून दिलं. लिनच्या वेळ बॉलर होता राजस्थानचा धवल कुलकर्णी तर धोनीच्या वेळी होता जोफ्रा आर्चर.

4.रियान परागचं फॅनबॉय मोमेंट

राजस्थान रॉयल्सच्या १७ वर्षीय रियान परागने आपल्या परिपक्व खेळाने सर्वांना चकित केलं. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथनेही परागची प्रशंसा केली. रियान परागचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत राहिला. गुवाहाटी येथे २००७ मध्ये झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या मॅचवेळी महेंद्रसिंग धोनीबरोबर तीन वर्षांच्या लहानशा रियानचा फोटो आहे.

बारा वर्षांनंतर त्यावेळचा लहानगा रियान धोनीविरुद्ध खेळायला उभा ठाकला. गंमत म्हणजे ९९-०० साली रणजी हंगामात पराग दास या आसामच्या खेळाडूला युवा विकेटकीपर धोनीने स्टंपिंग केलं होतं. पराग दास म्हणजे रियानचे बाबा.

5.मलिंगा काही तासात खेळला दोन देशात

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. वर्ल्डकपच्या दृष्टीने मलिंगा श्रीलंकेसाठी महत्त्वाचा आहे. वर्ल्डकपसाठी तयारी म्हणून मलिंगाने श्रीलंकेतील स्थानिक स्पर्धेत खेळावं अशी श्रीलंकेच्या बोर्डाची इच्छा होती. सुरुवातीला मलिंगा मुंबई इंडियन्ससाठी हंगामातील बहुतांश सामने खेळू शकणार नाही असं स्पष्ट झालं. श्रीलंकेच्या बोर्डाने आपली भूमिका बदलली. मलिंगाला मायदेशातील स्पर्धेत काही सामने खेळण्याचं सुचवण्यात आलं. 4 एप्रिल रोजी मलिंगा मुंबई इंडियन्सच्या चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये खेळला. मॅच आणि अन्य मीडिया कमिटमेंट साधारण बारा वाजेपर्यंत पूर्ण झाल्या.

मलिंगाने पहाटे लवकरच श्रीलंकेची फ्लाईट पकडली. कोलंबोला उतरल्यानंतर तो कँडीसाठी रवाना झाला तो थेट मैदानात दाखल झाला. त्यानंतर दिवसभर तो कँडी संघासाठी खेळला. मलिंगाने त्यादिवशी ४९ धावांच्या मोबदल्यात सात विकेट्सही मिळवल्या. अशा पद्धतीने अवघ्या काही तासात एका खेळाडूने दोन वेगवेगळ्या देशात खेळण्याचा विक्रम केला.

6.बदली खेळाडू, रेकॉर्डब्रेक पदार्पण आणि ब्रेकडाऊन

न्यूझीलंडचा अडम मिलने मुंबई इंडियन्स संघात होता. मात्र स्पर्धा सुरू झाल्यानंतर काही दिवसातच मिलने दुखापतग्रस्त असल्याने उर्वरित स्पर्धा खेळू शकणार नाही हे स्पष्ट झालं. मिलने मायदेशी परतल्याने मुंबई इंडियन्स संघाने वेस्ट इंडिजच्या अल्झारी जोसेफला रिप्लेसमेंट अर्थात बदली खेळाडू म्हणून घेतलं. गंमत म्हणजे यंदाच्या हंगामासाठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात जोसेफला विकत घेण्यात कोणत्याही संघाने स्वारस्य दाखवलं नाही. त्याच्या नावापुढे अनसोल्ड अशी पाटी लागली. मुंबईने हैदराबादविरुद्ध विरुद्ध जोसेफला पदार्पणाची संधी दिली.

पहिल्याच सामन्यात जोसेफने १२ धावांत ६ विकेट्स घेत ११ वर्ष जुना विक्रम मोडला. जोसेफचं पदार्पण चांगलंच गाजलं. मात्र पुढच्या पाच सामन्यात फलंदाजांना जोसेफच्या गोलंदाजीवर प्रचंड धावा लुटल्या. त्यातच दुखापतग्रस्त झाल्याने जोसेफ उर्वरित हंगाम खेळू शकणार नाही हे स्पष्ट झालं. अचानक संधी मिळून विक्रमी पदार्पण करणाऱ्या जोसेफसाठी हंगामाचा शेवटही अनपेक्षित असाच झाला.

7.ती जादूची झप्पी

क्रिकेटविश्वात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन देशांमधलं द्वंद्व सर्वश्रुत आहे. अशेस मालिकेदरम्यान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकतात. त्यावेळी दोन्ही देशांच्या खेळाडूंदरम्यान रंगणारी गोलंदाजी चर्चेचा विषय असते.

यंदाच्या आयपीएलच्या निमित्ताने हे वैर ब्रोमान्समध्ये परावर्तित झाल्याचं पाहायला मिळालं. लिलावात सनरायझर्स हैदराबाद संघाने इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोला संघात घेतलं. बेअरस्टोची आयपीएलमध्ये खेळण्याची ही पहिलीच वेळ.

हैदराबाद संघाने डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो या धडाकेबाज सलामीवीरांना एकत्र उतरवलं. वर्ल्डकपसाठी रवाना होण्यापूर्वी या दोघांनी अक्षरक्ष: धुमाकूळ घातला. या दोघांनी तीन शतकी भागीदाऱ्या साकारल्या. बेंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये तर या दोघांनीही शतक झळकावलं. शतकानंतर दोघांनीही एकमेकांना आलिंगन दिलं. कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांना जादूची झप्पी देतानाचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

8.संतापलेला धोनी

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी कॅप्टन कुल म्हणून ओळखला जातो. दडपणाच्या परिस्थितीतही डोक्यावर बर्फ ठेवल्याप्रमाणे वागणारा धोनी अनेकांसाठी रोलमॉडेल आहे. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये चाहत्यांना संतापलेला धोनी पाहायला मिळाला. 12 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या लढतीत सामना रंगतदार स्थितीत पोहोचला होता. बेन स्टोक्स शेवटची ओव्हर टाकत होता. चौथा चेंडू टाकल्यावर अंपायर उल्हास गंधे यांनी नोबॉलची खूण केली.

मात्र स्क्वेअर लेग अंपायर ब्रूस ऑक्सनफोर्डशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय बदलला. हा निर्णय बदलल्याने चेन्नईसाठी विजयाचं समीकरण आणखी अवघड झालं. अंपायर्सनी निर्णय बदलताच संतापलेला धोनी मैदानात आला. धोनीचं हे रुप क्रिकेटविश्वाला नवीन होतं. धोनीच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता.

9.पाच वर्षांनंतर पहिल्यांदा मिळाली खेळायची संधी

सिद्धेश लाडला मुंबई इंडियन्स संघाने २०१४मध्ये आपल्या संघात समाविष्ट केलं. मात्र एकापेक्षा एक गुणवान खेळाडूंचा भरणा असल्याने सिद्धेशला संधी मिळत नव्हती. यंदा अखेर सिद्धेशला अंतिम अकरामध्ये खेळण्याची संधी मिळाली. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या पायाला दुखापत झाल्याने पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये तो खेळू शकला नाही आणि सिद्धेशचं पदार्पण पक्कं झालं. योगायोग म्हणजे सिद्धेशचे वडील दिनेश लाड हे रोहित शर्माचे बालपणीचे प्रशिक्षक. लाडक्या शिष्याला दुखापतीमुळे खेळायला मिळत नसल्याचं दु:ख मुलाच्या बहुप्रतीक्षित पदार्पणाने कमी झालं असावं.

10.डू प्लेसिस-व्हिलऑन नातेवाईक

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ डू प्लेसिस चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळतो. यंदाच्या आयपीएल हंगामात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज हार्डुस व्हिलऑनला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने आपल्या ताफ्यात समाविष्ट केलं.

कर्णधार आणि खेळाडू एवढीच या दोघांचं नातं नाही. फॅफ डू प्लेसिसची बहीण ही व्हिलऑनची बायको आहे. म्हणजे डू प्लेसिस आणि व्हिलऑनचा मेहुणा आहे. पंजाब आणि चेन्नई यांच्यादरम्यानच्या मॅचवेळी दोघे एकमेकांविरुद्ध उभे ठाकले. मॅचनंतर या तिघांचा फोटो बराच काळ ट्रेंड होत राहिला.

11.रबाडाचा यॉर्कर

कोलकाता नाईट रायडर्सचा आंद्रे रसेल यंदाच्या हंगामात झंझावाती फॉर्मध्ये होता. प्रत्येक सामन्यात प्रतिस्पर्धी गोलंदाजांना बुकलून काढण्याचं काम त्याने इमानेइतबारे केलं. दिल्ली आणि कोलकाता यांच्यादरम्यान ३० मार्च रोजी झालेली लढत बरोबरीत सुटली. मॅचचा निर्णय सुपर ओव्हरद्वारे झाला. सुपर ओव्हरमध्ये रबाडाने रसेलला टाकलेल्या भेदक यॉर्करची सगळीकडे अनेकदिवस चर्चा होती. स्टंप्सच्या बुंध्यात रसेलच्या बॅट आणि पाय यांना भेदत जाणाऱ्या त्या यॉर्करने अनेकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने या बॉलची बॉल ऑफ द आयपीएल म्हणून स्तुती केली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)