You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नारायण राणे यांच्या आत्मचरित्रातून नेमकी कुणाकुणाची 'पोलखोल' होणार?
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसीसाठी मुंबईहून
नारायण राणे यांचं आत्मचरित्राचं प्रकाशन लवकरच होणार आहे. राणे यांनी आत्मचरित्रातून अनेकांची 'पोलखोल' होणार असल्याचं सांगितलं आहे.
पण या आत्मचरित्राबाबत बोलताना आमदार नितेश राणे यांनी 'अब सबका हिसाब होगा' असं ट्वीट केलं होतं. त्यामुळे या पुस्तक प्रकाशनाआधीच याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यासंबधी खासदार नारायण राणे यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत अनेक खुलासे केले.
नितेश राणे यांच्या ट्वीटचा नेमका अर्थ काय असं विचारला असता राणे सांगतात की या आत्मचरित्रातून अनेकांची पोलखोल होणार आहे. त्यामुळेच नितेशने हे विधान केलं असावं.
कोकणातला एक मध्यमवर्गीय घरातला मुलगा मुंबईमध्ये येतो. घरची कुठलीही पार्श्वभूमी नसताना मुख्यमंत्री पदापर्यंत कसा जातो. त्यासाठी त्याला काय संघर्ष करावा लागला. हे नवीन पिढीला कळावं यासाठी हे आत्मचरित्र मी लिहिलं असल्याचं राणे सांगतात.
शिवसेनेमध्ये केलेल्या प्रवेशापासून ते शिवसेना का सोडली? इथपर्यंत या आत्मचरित्राचा पहिला टप्पा आहे. त्यात काही भाग हा काँग्रेसचा काळ आणि त्यानंतरचा भाजप प्रवेशाबाबतही आहे.
उध्दव ठाकरेंमुळेच मी शिवसेना सोडली
शिवसेनेचा मुद्दा आल्यानंतर उध्दव ठाकरेंबाबत ते बोलतात. या आत्मचरित्राचा बहुतांश भाग हा उध्दव ठाकरेंनी माझ्याबाबत केलेल्या षड्यंत्राबाबत असल्याचं राणे सांगतात.
मी ज्यावेळी मुख्यमंत्री झालो त्यानंतर उध्दव ठाकरेंनी माझ्या विरोधात कटकारस्थानं करायला सुरुवात केली. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हेसुद्धा त्यात सामील होते.
ही कटकारस्थानं इतकी टोकाला गेली की मी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. उध्दव ठाकरेंमुळेच मी शिवसेना सोडली हा उल्लेख त्यांनी पुन्हा केला. पण याची सविस्तर कहाणी या पुस्तकात असल्याचं ते सांगतात.
नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर आम्ही शिवसेनेतल्या काही नेत्यांना संपर्क करून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण नारायण राणेंवर कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे शिवसेनेची याबाबत कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
काँग्रेसने मुख्यमंत्री पदाच गाजर दाखवलं
२००५ साली नारायण राणेंनी यांनी शिवसेना सोडून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सहा महिन्यांत मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन दिलं. याला अहमद पटेल साक्षी होते. पण मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसमध्ये १२ वर्षं वाट पाहिली. पण काँग्रेसने घोर निराशा केली. त्यावेळीही महाराष्ट्रापासून ते दिल्लीपर्यंत अनेक नेत्यांनी मला मुख्यमंत्रीपद मिळू नये यासाठी षडयंत्र रचली. यामध्ये कोण कोण सामील होतं हे सविस्तरपणे या पुस्तकात मांडण्यात आलं असल्याचं राणे सांगतात.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांवरही या पुस्तकात मी टीका केल्याचं राणे आवर्जून सांगतात. पण ही राजकीय टीका असली तरी अशोक चव्हाणांना पुस्तक प्रकाशनाचं आमंत्रण देणार असल्याचही त्यांनी सांगितलं.
राणेंच्या विधानांवर आम्ही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा ते म्हणाले की ही मुलाखत पाहिल्यावरच प्रतिक्रिया देऊ. तेव्हा ही बातमी अपडेट करण्यात येईल.
ज्या नेत्यांवर या पुस्तकातून टीका करण्यात आली त्या सर्व नेत्यांना आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला निश्चित बोलवणार असल्याचं नारायण राणे यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांची वेळ मिळाल्यानंतर लोकसभा निकालाच्या पूर्वसंध्येला आणि विधानसभेच्या निवडणुकांआधी हे आत्मचरित्र प्रकाशित करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
इतर राजकीय प्रश्नांवर बोलताना त्यांनी राज ठाकरेंच्या आताच्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. पण मनसे आणि स्वाभिमान पक्ष एकत्र येणार का या प्रश्नावर त्यांनी बोलणं टाळलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)