You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हापूस आंबा: कोकणच्या राजानं महाराष्ट्रातले बाजार अजूनही का भरले नाहीत?
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी
निवडणुकीच्या आणि प्रचाराच्या ज्वरातून बाहेर आलेल्या महाराष्ट्राला आता प्रश्न हा पडलाय की, हापूस आंबा कुठे आहे? एव्हाना कोकणच्या राजानं महाराष्ट्रभरातले बाजार अद्याप भरले पाहिजे होते. पण मे उजाडला तरी हापूस अद्याप हवा तसा घराघरांत पोहोचला नाही आहे.
शक्यता अशी आहे की यंदा एकंदरीतच कमी झालेल्या उत्पादनानं हापूसची आवक आणि व्यापार कमी असेल. पण काही व्यावसायिकांचं म्हणणं हे आहे की मे महिन्यात हापूस आंब्याची आवक वाढत जाईल.
पण एक नक्की की बाजारात हापूस आंबे घ्यायला जाणा-यांना ते हवे तितके मिळत नाहीयेत आणि मिळाले तर इतके महाग आहेत की नाकं मुरडली जाताहेत. मे महिना उजाडला तरी हापूसचे दर आवाक्यात येत नाही आहे.
कर्नाटकच्या हापूसपेक्षा देवगड-रत्नागिरीच्या चवीशी प्रामाणिक असणा-या महाराष्ट्र-जनांना यंदा हापूस जिभेला आणि डोळ्यांना, दोन्हीलाही, कमी पडतो आहे.
मुंबईच्या वाशीत असलेली कृषी उत्पन्न बाजार समितीचं मार्केट महाराष्ट्रातलं मोठं मार्केट आणि ते कोकणपट्ट्याला सर्वात जवळचंही आहे. इथं येणा-या आंब्याच्या पेट्यांवरून यंदाच्या पहिल्या टप्प्यात हापूस किती कमी झाला आहे याचा अंदाज येतो.
२ मे पर्यंतच्या आठवडाभरातली आकडेवारी पाहिली तर दिवसाला ५० हजार ते सर्वाधिक ८० हजार पेट्यांपर्यंत आंब्याची आवक झाली आहे. इथं अनेक वर्षं व्यवसाय करणाऱ्यांच्या मतानुसार दिवसाला दीड ते दोन लाख पेट्यांपर्यंत ही आवक व्हायला हवी होती.
"रत्नागिरी-देवगडच्या पट्ट्यात आंब्याचा व्यवसाय करणा-या आम्हा सगळ्यांचा एक गट आहे आणि गेली तीन वर्षं वाशीच्या मार्केट मध्ये संपूर्ण सिझन मध्ये येणा-या आंब्यांची आकडेवारी आम्ही मोजतो आहोत. यंदा नेहमीपेक्षा ते ५० टक्क्यांनी कमी आहे. आतापर्यंत एक ते दीड लाख पेट्या रोज इथे यायला हव्या होत्या," ओंकार रानडे सांगतात. रानडे यांचा गेली ३५ वर्षं हापूस आंब्याचा कौटुंबिक व्यवसाय आहे. त्यांच्या रत्नागिरीत आंब्याच्या बागा आहेत आणि उन्हाळ्याच्या विक्रीच्या काळात ते पुण्यात व्यवसाय करतात.
नितीन जठारांचा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात आणि परदेशातही हापूस आंब्यांचा व्यवसाय आहे. त्यांच्या रत्नागिरी जिल्ह्यात आंब्याच्या बागा आहेत. `जेबी एग्रो` या त्यांच्या कंपनीनं गेल्या वर्षी साडे नऊ हजार पेट्यांचा व्यवसाय केला होता. पण यंदा ते जास्तीत जास्त ६ हजार पेट्यांपर्यंत पोहोचतील असं म्हणताहेत. " उत्पादनच यंदा कमी झालं आणि त्याचं कारण जास्त काळ लांबलेली थंडी हे आहे. यंदा मार्चच्या मध्यापर्यंत थंडी लांबली होती आणि त्याचा प्रतिकूल परिणाम झाला," जठार सांगतात.
पण लांबलेल्या थंडीमुळे काय होतं? "त्यामुळे अनेकदा मोहोर येतो. तीन वेळा मोहोर आला तर चालतं, पण त्यापेक्षा अधिक वेळा आला तर फळांची हवी तशी वाढ होत नाही आणि त्यात रसही हवा तसा येत नाही. नवीन मोहोराचं नवीन फळ आलं की अगोदरची फांदीवर असलेली फळं गळून पडतात. जरी ती फळं टिकली तरी त्यांचा आकार आणि रस चांगला नसतो," जठार उत्तर सांगतात.
जठार यांच्या मते वातावरणातल्या अशा बदलांमुळे हापूसच्या उत्पादनावर परिणाम होणं हे साधारण १० वर्षांपासून अधिक सातत्यानं सुरू झालं. "पूर्वी केवळ मोहोर बघून बागा विकत घेतल्या जायच्या. पण आता फळ टिकेल याची शाश्वती नाही. आता फळ लागलं असेल तरी त्या कोणी घेत नाही. वाट पहावी लागते," जठार म्हणतात.
ओंकार रानडेंचं मते या बदलत चाललेल्या तापमानामुळे आणि लांबलेल्या थंडीमुळे कोकण किनारपट्टीवर हापूसच्या उत्पादनावर परिणाम होत चाललेला आहे. "नोव्हेंबरपासून मोहोर धरायला सुरुवात होते. थंडीतही तो होतो. पण थंडीचं हे चक्र लांबलं की अवघड होतं," ते म्हणतात.
अशोक हांडे गेल्या ३५ वर्षांपासून मुंबईत हापूस आंब्यांचा व्यवसाय करताहेत आणि वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ते आघाडीचे व्यावसायिक मानले जातात. त्यांच्या मते सुरुवातीला जरी वेग कमी होता तरी आता हापूसची आवक वाढली आहे. "१ मे पासून जवळपास सव्वा लाख पेट्या वाशीच्या मार्केटमध्ये येत आहेत. ही आवक अशी वाढल्यानं बाजारभावही लवकरच कमी होईल. सध्या १०० रूपयांपासून ६०० रूपये डझनापर्यंत आंबे मिळताहेत," ते म्हणतात.
पण हांडे यांच्या मते यंदा आलेल्या मालामध्ये 'वेस्टेज' जास्त आहे आणि ती या वर्षी त्यांना सर्वात जास्त वाटते आहे. "वेस्टेज म्हणजे काही आंबे कोवळेच राहतात, काही सडतात. प्रत्येक पेटीमागे त्यांचं प्रमाण वाढलं आहे. याचं मुख्य कारण अस्थिर वातावरण हे आहे," हांडे सांगतात.
पण यंदा हिवाळ्यामुळे असं होतं आहे का? गेल्या दशकभराच्या काळात तापमानाचा फटका वाढत गेला ही जशी तक्रार अनेक आंबा उत्पादक करताहेत तसंच व्यावसायिक म्हणून त्यांनाही वाटतं का? "निश्चित असं झालं. पण माझं निरिक्षण असं आहे की या वातावरणातल्या बदलानं प्रत्येक झाडामागे जे उत्पादन होतं ते कमी झालं, पण त्यासोबतच कोकणात प्लांटेशन, म्हणजे हापूसच्या कलमांची लागवड, वाढली. परिणामी एकूण मागणी जशी वाढत गेली, तशी आवकही वाढत गेली," हांडे म्हणतात.
कृषी विद्यापीठं आणि इतर कृषी संशोधन संस्थाही आंब्याच्या उत्पादनाबाबत निरिक्षणं करताहेत. वेंगुर्ल्याच्या 'प्रादेशिक फळ संशोधन केंद्रा'त सहयोगी संशोधन संचालक असलेले डॉ. प्रदीप हळदवणेकर म्हणतात की यंदा कोकणच्या एकूण क्षमतेच्या ६५-७०टक्के हापूसचं उत्पादन होईल पण परिस्थिती शास्त्रीय आणि व्यवस्थापनदृष्ट्या हाताळली तर आंबा उत्पादनाला कोणताही अडथळा भविष्यातही येणार नाही.
"पुढच्या आठवडाभरात कोकणातला ५० टक्के आंबा बाजारात येईल. तापमानात जे चढउतार झाले त्यामुळे पक्वतेसाठी जास्त दिवस लागताहेत आणि त्यामुळे उशीर होतो आहे. वातावरणात अनियमितता तर आहेच, पण व्यवस्थापनातही आहे. म्हणजे जेव्हा तापमानात बदल होणार असतो, हवामान बदलणार असतं तेव्हा शेतकऱ्यांना सांगितलं जातं, काय उपाय करावे हे सांगितलं जातं. त्याप्रमाणे जर ते केले तर उत्पादनक्षमता टिकवता येते. ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणारे परिणाम असेच हाताळता येतील," डॉ. हळदवणेकर सांगतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)