You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Avengers Endgame: मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स काय आहे? MCU ची गोष्ट मराठीत
- Author, गुलशनकुमार वनकर
- Role, बीबीसी मराठी
2019 मध्ये गेम ऑफ थ्रोन्स संपणार हे काय वाईट होतं की आता मार्व्हल सुपरहिरोजच्या मालिकेचाही अंत झालाय.
मार्व्हल स्टुडिओज आणि स्टॅन ली यांनी गेल्या 11 वर्षांमध्ये जगभरातल्या मार्व्हल फॅन्सच्या मनात तब्बल 21 सिनेमांमधून एक वेगळं विश्व निर्माण केलं होतं. हे मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स (किंवा MCU) अखेर संपतंय (की पुन्हा उभं होतंय, कुणास ठाऊक!), ही खरोखरंच जगभरातील कोट्यावधी लोकांसाठी दुःखद घटना असेल.
पण काय आहे हे वेड? गेल्या अनेक दशकांपासून, आधी कॉमिक्स आणि नंतर चित्रपटांद्वारे प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या या MCU आणि त्याला संपुष्टात आणणाऱ्या अव्हेंजर्स एंडगेम विषयी जाणून घ्यायलाच हवं.
1. MCU काय आहे?
तुम्ही स्पायडरमॅन हे नाव ऐकलं असेलच, कदाचित एखादा सिनेमाही पाहिला असेल? तोच स्पायडरमॅन बनवणारे स्टॅन ली यांनी आधी आपल्या कॉमिक्समधून डझनभराहून अधिक सुपरहिरो तयार केले.
आयर्न मॅन, कॅप्टन अमेरिका, हल्क, थॉर, कॅप्टन मार्वल ही अशीच काही प्रचलित नावं. आणखी बरेच आहेत, पण सर्वांची नावं लक्षात राहणार नाहीत, म्हणून असो.
अशी अनेक पात्र आधी कॉमिक्समधून आणि मग सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. यापैकी काही पात्रांवर आधारित आपापले स्वतंत्र अनेक सिनेमे आधी येऊन गेलेले. पण 2007 मध्ये डबघाईस लागलेल्या मार्व्हल स्टुडिओजला X-Men आणि स्पायडरमॅनसारख्या काही पात्रांचे मालकी हक्क 'सोनी'ला विकावे लागले.
मग कंपनीला पुनरुज्जीवित करण्यासाठी एक महाकाय प्लॅन रचला गेला - की उर्वरित सर्व मार्व्हल सुपरहिरोजवर स्वतंत्र सिनेमे तयार करायचे, मग त्यांना एकमेकांच्या विश्वात, एकाच कालखंडात एकत्र आणायचं, कधी एकमेकांबरोबर तर कधी एकमेकांपुढे उभं ठाकायचं. यातून रचला गेला अव्हेंजर्सचा पाया.
2008 ते 2019 म्हणजे गेल्या 11 वर्षांत 22 सिनेमांमध्ये हे मार्व्हल्सचं विश्व साठवलंय, ज्याला आता निर्माते The Infinity Saga म्हणत आहेत.
आजपर्यंत ही जगातली सर्वांत यशस्वी सिनेमालिका आहे, ज्यातून निर्मात्यांनी तब्बल 18.2 अब्ज डॉलर (जवळजवळ 1.275 लाख कोटी रुपये) कमावले आहेत. कदाचित हा आकडा युरोपमधल्या अनेक देशांचा GDP यापेक्षाही जास्त असेल.
2. कथा काय आहे?
सत्य विरुद्ध असत्य. चांगलं विरुद्ध वाईट. सत्प्रवृत्ती विरुद्ध दुष्प्रवृत्ती!
पण एवढ्या सिनेमांच्या या मालिकेत तुम्हाला अनेकदा कळत नाही की नेमकी कुणाची बाजू बरोबर आहे. म्हणून मध्यंतरी अव्हेंजर्समध्येच कॅप्टन अमेरिका विरुद्ध आयर्न मॅन, असे दोन गटही पडले होते.
तर थॅनोस नावाचा एक महाकाय जांभळा माणूस आहे, ज्याला ब्रह्मांडात "संतुलन" हवंय. त्याचं म्हणणं आहे की जर ब्रह्मांडातील निम्मे जीव नष्ट केलेत तरच उर्वरित जीवांना सुखाने राहणं शक्य होईल. त्यासाठी तो आपलं सैन्य तयार करून लोकांचा जीव घ्यायला सुरुवात करतो.
पण जीवांची कत्तल करताना तो, कुणाला मारायचं आणि कुणाला सोडायचं, याबाबत कसलाही भेदभाव करत नाही.
पण या ब्रह्मांडामध्ये पृथ्वीशिवाय इतर अनेक ग्रह आहेत, जिथे जीवसृष्टी आहे, म्हणून आपल्याला हे काम एकट्याने करणं शक्य होणार नाही, हे त्याच्या लक्षात येतं. पर्याय काय?
सहा Infinity Stones किंवा असे जादुई रत्न जे एका सोन्याच्या ग्लोव्हमध्ये धारण केले की एका चुटकीसरशी निम्मी सृष्टी नामशेष होईल. तर असं होऊ नये म्हणून 'अव्हेंजर्स' नावाचा सुपरहिरोंचा एक गट थॅनोसचा सामना करतोय.
या अव्हेंजर्सपैकी प्रत्येक सुपरहिरोने आपापल्या वैयक्तिक सिनेमात आपापल्या व्हिलनशी दोन हात करून स्वतःचं प्राबल्य सिद्ध केलं आहेच. शिवाय, तेही इथे एका टीमसारखे काम करतात, कधी एकमेकांसाठी जीव द्यायला तयार होतात तर कधी एकमेकांसाठी जीव घ्यायला.
3. आता Infinity Stones म्हणजे काय?
एकूण सहा Infinity Stones द्वारे भौतिक मार्व्हल विश्वातील सहा विविध शक्ती नियंत्रित करता येऊ शकतात -
1. काळ (Time stone) - ज्याने तुम्ही मागे भुतकाळात जाऊ शकता किंवा फॉर्वर्ड करून भविष्यात.
2. ऊर्जा (Powers stone) - ज्याने तुम्हाला इतकी ऊर्जा मिळू शकते की तुम्ही एखादा ग्रह उद्ध्वस्त करू शकता.
3. अंतराळ (Space stone) - ज्याने तुम्ही एका विश्वातून दुसऱ्या विश्वात जाऊ शकता, एका जादुई पोर्टलमधून त्वरित.
4. बुद्धी (Mind Stone) - लोकांच्या बुद्धीवर ताबा मिळवून त्यांना जसं हवं तसं करायला सांगणे.
5. आत्मा (Soul stone) - कुणाच्याही आत्म्यावर ताबा मिळवू शकता.
6. सत्य (किंवा त्याचा भास) (Reality Stone) - ज्याने तुम्ही एखाद्या वस्तू किंवा पदार्थाचं रूप बदलू शकता.
विश्वाच्या उत्पत्तीनंतर या सहा प्रमुख शक्तींनी रत्नांचं रूप धारण केलं आणि म्हणून जो हे सहा रत्न एकाच वेळी धारण करेल तो ब्रह्मांडात कुठलाही बदल एका झटक्यात करू शकेल.
पण या रत्नांची ऊर्जा इतकी प्रचंड आहे की ते सहज हातात धरता येत नाहीत. म्हणून हे कुठल्या न कुठल्या दुसऱ्या रूपात असतात, जसं की एखाद्या पेंडंटमध्ये किंवा राजदंडामध्ये.
4. मग अव्हेंजर्स एंडगेममध्ये एवढं काय विशेष?
कल्पना करा की तुमच्या शहरात वर्षानुवर्षं एक अतिमहाकाय असा पूल बनतोय, उदाहरणार्थ मुंबईचा सीलिंक किंवा नागपूरचा रामझुला. आता इतक्या वर्षांपूर्वीपासून जी कल्पना, जे स्वप्न लोकांच्या मनात पेरलं होतं, त्याचं फलित होताना दिसलं की कसं वाटेल? अगदी तसंच जगभरातल्या मार्व्हल फॅन्सला वाटतंय या क्षणाला.
लहानपणापासून आधी कॉमिक्स आणि नंतर सिनेमातून ज्या सुपरहिरोजना पाहिलंय, पूजलंय, त्यांना अखेरची लढाई लढताना पाहणं म्हणजे सचिनला शेवटचं बॅटिंग करताना पाहण्यासारखंच. मग डोळ्यातून अश्रू नाही निघणार तर आणखी काय!
अव्हेंजर्स एंडगेम भारतासह जगभरात 26 एप्रिलला रिलीज झाला. अनेकांनी पाहाटे 6चा, 6.30चा 'फर्स्ट डे - फर्स्ट शो' पाहिला आणि स्वतः साश्रू नयनांनी स्टॅन ली आणि त्यांच्या पात्रांना अखेरचा अलविदा केलं.
मी या मालिकेतील एखादाच सिनेमा पाहिलाय. पण सलमान खानचे वेडे फॅन्स आणि मार्व्हलचे वेडे फॅन्स यांच्यात कितपत अंतर आहे (किंवा ते आहे तरी का?), हे पाहण्यासाठी मी सुद्धा शुक्रवारी सकाळी पहिला शो पाहिला.
मार्व्हलचे हे भक्त पहाटे पूर्ण तयारीनिशी आले होते, अगदी अव्हेंजर्सचे टीशर्ट घालून वगैरे. सिनेमा सुरू झाला तेव्हा टाळ्या-शिट्ट्या वाजल्या, प्रत्येक हिरोच्या एंट्रीवर टाळ्या आल्या आणि प्रत्येकाच्या खास शस्त्रासाठी विशेष टाळ्या तर आल्याच. काही दुःखद घटनांमुळे अनेक जण रडलेसुद्धा.
आणि 'एंडगेम'च्या अखेरीस येणारे एंड क्रेडिट संपेपर्यंत लोक हॉलमध्ये वाट पाहत थांबलेले. कारण मार्व्हल सिनेमांचं एक वैशिष्ट्य आहे - शेवटी येणाऱ्या कलाकारांच्या नावांच्या अंती काही सेकंदांचा टीझर येतो, ज्यातून पुढच्या कथेबद्दल काहीतरी खूण सापडते.
पण MCUच्या या अखेरच्या सिनेमात असं काही होतं का? #DontSpoilTheEndgame असाही एक हॅशटॅग ट्रेंड आहे, म्हणून मी हे सांगणं बरोबर नाही. तुम्ही स्वतः जाऊन पाहायला हवं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)