अक्षय कुमारचा केसरी : 21 शीख लढले होते 10 हजार पठाणांविरोधात

    • Author, रेहान फझल
    • Role, बीबीसी न्यूज

'हजारो पठाणांचं एक लष्कर आपल्याकडे कूच करत आहे' - असा संदेश 12 सप्टेंबर 1897ला सकाळी 8 वाजता सारागढी किल्ल्यावर असलेल्या द्वारपालानं पाठवला. अंदाजे 8,000 ते 14,000 पठाणांची सेना असावी, असा त्याचा अंदाज होता.

तात्काळ त्या द्वारापालाला आतमध्ये बोलावून घेण्यात आलं. सैनिकांचा नेता होता ईशेर सिंह. त्याने त्वरित सिग्नल मॅन गुरुमुख सिंगला आदेश दिला की, जवळच्याच लॉकहार्ट किल्ल्यात असलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांना विचार की आमच्यासाठी काय आदेश आहे.

कर्नल हॉटननं आदेश दिला की, "होल्ड युअर पोझिशन. तुम्ही तुमच्या जागी तैनात राहा."

एका तासात पूर्ण किल्ल्याला पठाणांनी घेरलं. पठाण किंवा ओरकजईच्या एका सैनिकाने आपल्या हातात पांढरा झेंडा घेतला आणि चालू लागला. तो म्हणाला, "आमचं तुमच्याशी काही भांडण नाही. आमचं वैर इंग्रजांशी आहे. तुमची संख्या कमी आहे. विनाकारण मारले जाल. तुम्ही आम्हाला शरण या. तुम्हाला सुरक्षितपणे येथून जाऊ दिलं जाईल."

ईशेर सिंहनं हा प्रस्ताव धुडकावून लावला. याबद्दल लिहिताना ब्रिटनच्या फौजेचा जनरल जेम्स लंट लिहितो, की ईशेर सिंहनं या प्रस्तावाचं उत्तर पश्तो भाषेत दिलं.

ईशेर सिंह यांची भाषा फक्त कठोरच नव्हती तर त्यांनी चिडून शिवीगाळ देखील केली होती. पुढं ते म्हणाले होते, "ही भूमी इंग्रजांची नाही तर महाराजा रणजीत सिंह यांची आहे. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत या भूमीची रक्षा करू."

त्याबरोबरच 'जो बोले सो निहाल, सत श्री अकाल'चा नारा सारागढीच्या परिसरात निनादला.

सारागढीची लढाई का झाली होती?

सारागढीचा किल्ला कोहाट जिल्ह्यात अंदाजे 6,000 फूट उंचीवर आहे. सध्या हे ठिकाण पाकिस्तानमध्ये आहे. 1880 मध्ये इंग्रजांनी या ठिकाणी तीन चौक्या बनवल्या. त्यांना स्थानिक ओरकजई लोकांनी विरोध केला. त्यामुळे इंग्रजांना आणखी चौक्या उघडाव्या लागल्या.

1891मध्ये इंग्रजांनी पुन्हा अभियान चालवलं. रबिया खेल यांच्याशी करार झाल्यानंतर इंग्रजांना गुलिस्ताँ, लॉकहार्ट आणि सारागढी या ठिकाणी तीन किल्ले बनवले. पण स्थानिकांचा या किल्ल्यांना विरोध होता. त्यांनी अनेक वेळा या किल्ल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जेणे करून इंग्रज तिथून पळून जातील.

3 सप्टेंबर 1897 रोजी पठाणांच्या मोठ्या लष्कराने तिन्ही किल्ल्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कर्नल हॉटन यांनी ते सांभाळून घेतलं. पण 12 सप्टेंबर रोजी ओरकजईंनी गुलिस्ताँ, लॉकहार्ट आणि सारागढी तिन्ही किल्ल्यांना घेरलं. लॉकहार्ट आणि गुलिस्ताँला सारागढीपासून वेगळं केलं.

फायरिंग रेंज

पठाणांचं पहिलं फायरिंग 9 वाजता झालं. सारागढीच्या युद्धावर ब्रिगेडियर कवलजीत यांनी 'द आयकॉनिक बॅटल ऑफ सारागढी' हे पुस्तक लिहिलं आहे. ते सांगतात, "हवालदार ईशेर सिंह यांनी आदेश दिला की जोपर्यंत अफगाणी सैन्य 1,000 यार्डांच्या रेंजमध्ये येत नाही, तोपर्यंत कोणी हल्ला करू नये."

शीख सैनिकांकडे सिंग शॉट मार्टिनी हेनरी 303 या बंदुका होत्या. त्या एका मिनिटात 10 राऊंड फायर करू शकत. प्रत्येक सैनिकाकडे 400 गोळ्या होत्या. 100 त्यांच्या खिशात तर 300 रिझर्व्हमध्ये. त्यांनी पठाणांना आपल्या रेंजमध्ये येऊ दिलं आणि मग नेम धरून गोळीबारी सुरू करण्यात आली.

पठाणांचा पहिला अयशस्वी प्रयत्न

पहिल्या तासात पठाणांचे 60 सैनिक ठार झाले होते आणि शीखांच्या बाजूने लढणारे भगवान सिंग मृत्युमुखी पडले होते. नायक लाल सिंग हे गंभीररीत्या जखमी झाले होते. पठाणांचा पहिला हल्ला अयशस्वी झाला. ते सैरावैरा पळू लागले होते पण त्यांनी हल्ले करणं थांबवलं नव्हतं.

शीख त्यांना प्रत्युत्तर देत होते. पण हजारो सैनिकांसमोर 21 सैनिक कसा टिकाव धरू शकतील आणि किती वेळ?

गवताला आग लावली

तेव्हाच उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याने पठाणांना मदत केली. त्यांनी गवताला आग लावली आणि ती आग झपाट्याने पसरत पसरत किल्ल्याच्या भिंतीकडे जाऊ लागली. धुरामुळे पठाण किल्ल्याच्या जवळ पोहोचले. पण शीख त्यांच्यावर नेमका हल्ला करू लागले त्यामुळे त्यांना त्या ठिकाणाहून बाजूला व्हावं लागलं.

दरम्यान, शिखांपैकी अनेक जण जखमी होऊ लागले होते. बुटा सिंह आणि सुंदर सिंह यांना वीरमरण प्राप्त झालं होतं.

गोळ्या जपून वापरण्याचे आदेश

सिग्नल मॅन गुरमुख सिंह सातत्याने कर्नल हॉटन यांना सांकेतिक भाषेत सांगत होते की पठाण आणखी एक हल्ला करू शकतात आणि आमच्याजवळच्या गोळ्या संपत आल्या. कर्नलने उत्तर दिलं की अंदाधुंद गोळीबार करू नका. जेव्हा तुम्हाला खात्री असेल की गोळी शत्रूला लागेल तेव्हाच तुम्ही ती चालवा. तुम्हाला ऐनकेन प्रकारे मदत मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत.

अमरिंदर सिंह यांनी 'सारागढी अॅंड द डिफेन्स ऑफ द सामना फोर्ट' या पुस्तकात लिहिलं आहे की, लॉकहार्ट किल्ल्यावर असलेल्या रॉयल आयरिश रायफल्स या रेजिमेंटच्या 13 सैनिकांना सारागढीवर असलेल्या सैनिकांची मदत करण्याची इच्छा होती. पण त्यांना असं जाणवलं की आपण इतके कमी आहोत की 1,000 यार्डावरून जरी गोळीबार केला तरी त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही.

आणि जर ते जवळ गेले तर पठाणांकडे असलेल्या लांब नळीच्या जिजेल आणि मेटफोर्ड रायफलचं आपण भक्ष्य होऊ. त्यामुळे ते तेथून परतले.

पठाणांनी पाडलं भिंतीला भगदाड

हे सर्व सुरूच होतं तेव्हा दोन पठाण मुख्य किल्ल्याच्या उजव्या बाजूने असलेल्या भिंतीवर पोहोचण्यात यशस्वी झाले. त्या्ंच्याजवळ असलेल्या सुऱ्यांनी भिंतीवर असलेलं प्लास्टर काढायला सुरुवात केली. याचवेळी ईशेर सिंह हे गोळीबार करत होते आणि 4 शीख सैनिकांना त्यांनी कव्हर दिलं. म्हणजेच हे 4 शीख सैनिक किल्ल्याच्या मुख्य हॉलपर्यंत पोहोचले. पण पठाणांनी तोपर्यंत भिंतीला सात फुटाचं भगदाड पाडलं.

कंवलजीत सांगतात, "पठाणांनी आणखी एक युक्ती शोधली. त्यांनी आपल्या डोक्यावर खाटा घेतल्या. जेणेकरून शीखांना कळणार नाही नेम कुठे धरावा. किल्ल्याच्या रचनेत एक छोटासा कमकुवत भाग होता. त्यांनी त्याचाच फायदा घेतला. ते अशा ठिकाणी पोहोचले जिथं त्यांना किल्ल्यावरून भगदाड पाडताना कुणीच पाहू शकत नव्हतं."

"फोर्ट गुलिस्ताँचे कमांडर मेजर दे वोए यांनी हा प्रकार पाहिला आणि त्यांनी सिग्नल पाठवलं. पण सिग्नलमॅन गुरूमुख सिंह हे लॉकहार्ट यांचे सिग्नल समजून घेण्यात व्यग्र होते. त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं नाही की आणखी कुणी आपल्याला सिग्नल पाठवतोय.

मदत पाठवण्याचे प्रयत्न निष्फळ

लान्स नायक चांद सिंग यांच्यासोबत मुख्य ब्लॉकमध्ये लढत असलेले साहिब सिंग, जीवन सिंग आणि दया सिंग मारले गेले. पण चांद सिंग हे जिवंत होते. ईशेर सिंग आणि त्यांच्याबरोबर लढणारे साथीदार यांनी आपल्या जागा सोडल्या आणि ते मुख्य ब्लॉकमध्ये आले. ईशेर सिंग यांनी आदेश दिला की सैनिकांनी आपल्या रायफलींना संगिनी जोडा. जो पठाण आत आला त्याच्यावर निशाणा साधला गेला किंवा त्याला संगिनीने मारण्यात आलं.

पण बाहेर कुणीच रक्षण करण्यासाठी नसल्यामुळे काही अफगाणी सैनिक बांबूच्या शिड्यांनी किल्ला चढून वर आले. अमरिंदर सिंग लिहितात की, या भागात अनेक पठाण घुसलेले असून देखील लेफ्टनंट मन आणि कर्नल हॉटन यांनी पुन्हा एकदा 78 सैनिकांच्या साहाय्याने हल्ला करण्यास सुरुवात केली. सारागढीतल्या शीख साथीदारांना याचा फायदा होईल असं त्यांना वाटत होतं. निदान पठाणांचं लक्ष विचलित तरी व्हावं अशी त्यांची योजना होती.

जेव्हा हे 78 सैनिक 500 मीटर दूर होते तेव्हा त्यांनी पाहिलं की पठाणांनी किल्ल्याच्या भिंतीवरून उड्या मारून आत शिरत आहेत. एका दरवाजाला आग लागलेली आहे. हॉटन यांना अंदाज आला की सारागढी आता आपल्या हातून गेलं आहे.

गुरुमुख सिंग यांचा शेवटचा संदेश

याचवेळी सिग्नलची व्यवस्था पाहणाऱ्या गुरुमुख सिंग यांनी शेवटचा संदेश पाठवला की पठाण मुख्य ब्लॉक पर्यंत पोहोचले आहेत. हे संदेश देणं थांबवून हातात रायफल घेण्याची परवानगी देण्यात यावी असं ते म्हणाले. कर्नलने त्यांना परवानगी दिली.

गुरुमुख सिंग यांनी आपल्या हेलिओला एका बाजूला ठेवलं आणि रायफल उचलून ते मुख्य ब्लॉककडे गेले. तिथं त्यांचे काही साथीदार लढत होते. तिथं ते पोहोचले. पठाणांनी बनवलेल्या भगदाडाजवळच काही पठाणांची प्रेतं पडलेली दिसत होती.

शेवटी नायक लाल सिंग, गुरुमुख सिंग आणि एक असैनिक सहकारी वाचले. लाल सिंह गंभीर जखमी झाल्यामुळे चालू शकत नव्हते. पण एकाच जागी बसून ते सातत्याने रायफल चालवून पठाणांचे प्राण घेत होते.

मदतनिसांनीही उचलली बंदूक

ब्रिटिश सैन्यात एक कायदा होता की सैनिकांव्यतिरिक्त कुणीच बंदुकीला हात लावायचा नाही. या सहकाऱ्याचं काम होतं की जखमी सैनिकांची सुश्रुषा करणं. सिग्नल घेऊन जाणं, शस्त्रास्त्रांचे डबे उघडून ते सैनिकांकडे सोपवणं.

जेव्हा मरणच जवळ आलं आहे, असं पाहून त्या मदतनिसाने बंदूक उचलली. मरण्याआधी त्याने पाच पठाणांचा जीव घेतला. अमरिंदर सिंग लिहितात, "शेवटी फक्त गुरुमुख सिंग वाचले. त्यांनी किमान 20 पठाणांना मारलं. युद्ध संपावं म्हणून पठाणांनी किल्ल्याला आग लावली."

"शिखांच्या सैन्यातील शेवटच्या सैनिकाने देखील हा निश्चय केला होता की शरणागती पत्करण्याऐवजी मरण पत्करणं बेहतर. ही लढाई किमान सात तास चालली. 21 शीख सैनिक आणि एक मदतनीस यांनी अंदाजे 180 ते 200 पठाण मारले. त्यात किमान 600 जण जखमी झाले असावे."

लाकडाच्या दरवाजाने किल्ला गमावला

ब्रिगेडियर कंवलजीत सांगतात, "लढाईनंतर सारागढी किल्ल्याच्या एका रचनेमध्ये एक त्रुटी सापडली. किल्ल्याचा मुख्य दरवाजा लाकडाचा बनलेला होता. तो मजबूत नव्हता, त्याला खिळेसुद्धा बसवलेले नव्हते."

"पठाणांच्या जिजेल रायफलचा सामना दरवाजांना करता आला नाही. दरवाजा कोसळला. पठाणांनी किल्ल्याच्या भिंतींना पाडलेलं भगदाड मोठं होऊन 12 फुटांचं झालं होतं."

एक दिवसानंतर पठाण सारगढीमधून पळून गेले

14 सप्टेंबर रोजी कोहाटमधून 9 माऊंटन बॅटरी इंग्रजांच्या मदतीसाठी पोहोचली. तेव्हा पठाण सारागढीच्या किल्ल्यातच होते. त्यांनी तोफगोळांचा मारा सुरू केला. पण इंग्रज सैनिकांनीही जोरदार हल्ला चढवला आणि सारागढीला पठाणांच्या तावडीतून सोडवलं. जेव्हा है सैनिक आत घुसले तेव्हा त्यांना नायक लाल सिंगचे छिन्नविच्छिन्न प्रेत सापडले.

तसेच इतर शीख सैनिक आणि मदतनिसांची प्रेतंही दिसली. इंग्रज अधिकारी या सर्व लढाईचं निरीक्षण लॉकहार्ट आणि गुलिस्ता किल्ल्यांवरून करत होते. मात्र पठाणांची संख्या पाहून इच्छा असूनही ते मदतीसाठी येऊ शकले नाहीत. या वीरांच्या पराक्रमाला लेफ्टनंट कर्नल जॉन हॉटन यांनी जाणलं. त्यांनी सारागढी पोस्टवरती मारल्या गेलेल्या आपल्या सहकार्यांच्या पराक्रमाला सलाम केला.

ब्रिटिश संसदेत शीख सैनिकांचा सन्मान

या लढाईला जगातल्या सर्वांत मोठ्या लास्ट-स्टॅंड्समध्ये जागा देण्यात आली. जेव्हा या शिखांचा बलिदानाची गोष्ट लंडनमध्ये पोहोचली, तेव्हा संसदेत सत्र सुरू होतं. सर्व सदस्यांनी त्यांना स्टॅंडिग ओव्हेशन दिलं.

लंडन गॅजेटच्या 21 फेब्रुवारीच्या 1898च्या 26,937व्या अंकाच्या 863व्या पेजवर ब्रिटिश खासदारांची प्रतिक्रिया आहे - "ब्रिटन आणि भारताला शिखांच्या 36व्या रेजिमेंटचा अभिमान आहे. या गोष्टीत काही अतिशयोक्ती नाही की या सैनिकांना कुणीच हरवू शकत नाही."

शौर्य पुरस्काराने सन्मान

जेव्हा महाराणी व्हिक्टोरियाला ही माहिती कळली, तेव्हा त्यांनी सर्व 21 सैनिकांना 'इंडियन ऑर्डर ऑफ मेरिट' देण्याची घोषणा केली. त्यावेळी भारतीयांना मिळणारं हे सर्वांत मोठा शौर्यपदक होतं. आजच्या व्हिक्टोरिया क्रॉस आणि परमवीर चक्राशी या पदकाची तुलना करता येईल.

त्यावेळी 'व्हिक्टोरिया क्रॉस' फक्त इंग्रज सैनिकांना आणि तेव्हा हयात असलेल्या सैनिकांना मिळत होता. 1911ला जॉर्ज (पाचवे) यांनी भारतीय सैनिकांना व्हीक्टोरिया क्रॉस देण्याची घोषणा केली.

या सैनिकांवर अवलंबितांना 500 रुपये आणि 50 एकर जमीन सरकारतर्फे देण्यात आली. फक्त एका व्यक्तीला ही मदत मिळाली नव्हती. या व्यक्तीकडे मदतनीस म्हणून काम होतं आणि शस्त्र उचलण्याचे अधिकार त्याला नव्हते.

अर्थात ब्रिटिश सरकारने केलेला हा मोठा अन्याय होता. कारण सैनिकी जबाबदारी नसतानाही या व्यक्तीने रायफल आणि संगीन वापरून 5 पठाणांना ठार मारलं होतं. युद्धानंतर मेजर जनरल यीटमॅन बिग्स म्हणतात, "21 शिखांचं शौर्य आणि हौतात्म्य ब्रिटिश इतिहासात नेहमी सुवर्णाक्षरांत लिहिलं जाईल."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)