You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तुम्हाला नकाशा काढता येतो का, असेल तरच तुम्ही या देशात राहू शकाल
जगात कोणत्याही शहरांमध्ये किंवा गावामध्ये राहाणाऱ्या लोकांना आपल्या घरचा पत्ता रस्त्यावरून, वसाहतीच्या नावाने, घराच्या नावाने, नंबरासह सांगता येतो.
उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही पुण्यात असाल तर सहकार नगर, कर्वेनगर, गुलटेकडी, भांडारकर रोड असे वेगवेगळे पत्ते तुम्ही सांगू शकाल. नागपूरला असाल तर हिंदुस्तान कॉलनी, धरमपेठ असे भाग सांगाल. औरंगाबादचे असाल तर अदालत रोड, सिडको, समर्थनगर असे वेगवेगळे पत्ते तुम्ही सांगू शकाल.
हे सोपं वाटत असलं तरी आफ्रिकेतल्या एका देशात मात्र असं आजिबात नाही. गांबियामध्ये रस्त्यांना वसाहतींना नावं नसल्यामुळे तिथं चक्क चित्रासारखा नकाशा काढून पत्ता सांगावा लागतो. 'सिएरा-लिओन-गांबिया'चे लेखक अडे डेरेमी यांनी गांबियाच्या या अनोख्या स्थितीबद्दल लिहिलं आहे.
ते सांगतात "लाल रंगाच्या कंटेनरच्या अथून उजवीकडे वळा, शाळेसमोर हायवे आहे. मग तुम्हाला दोन रस्ते दिसतील. त्यातल्या उजव्या रस्त्यावरून निघा मग डावीकडे वळा आणि न रंगवलेल्या दुकानापासून दुसरा चौक..."
गांबियामध्ये अशा पद्धतीनं पत्ते सांगितले जातात. एकदा का तुम्ही गांबियाची राजधानी बांजूल सोडून आजूबाजूच्या शहरांमध्ये गेलात की पत्ते शोधणं कर्मकठिण होऊन बसतं. त्या शहरांमध्ये काहीच रस्त्यांना नावं आहेत.
गांबियाचे ऑनलाइन नकाशे मी पाहायला गेलो तेव्हा माझा चांगलाच गोंधळ उडाला. त्या नकाशांमध्ये शेकडो नाही...कदाचित हजारो रस्त्यांना नावंच नव्हती.
मला तर वाटतं 'व्हेअर द स्ट्रीट हॅव नो नेम' हे गाणं आयरिश रॉक बँड यू2 ने गांबियामध्येच लिहिलं असावं
'इथं राहायचं तर खुणा लक्षात ठेवा'
पत्त्यांचा गोंधळ गांबियात असला तरी. राजधानी बांजूल मात्र त्याला अपवाद आहे. तिथं क्लार्कसन, वेलिंग्टन, अँग्लेसीआ, लँकेस्टर, पील, हडिंग्टन अशी रस्त्यांची नावं आहेत. ब्रिटिश वसाहतीमुळं इथल्या रस्त्यांना अशी नावं आहेत. तेव्हा बांजूलचं नाव बार्थस्ट असं होतं.
आता बांजूलमध्ये नव्या रस्त्यांना नेल्सन मंडेला रस्ता, ओएयू अवेन्यू, एकोवास रस्ता अशी नावं आहेत.
परंतु आजच्या गंबियातील ज्येष्ठ मंडळींना कधी रस्त्यांना नावं असणं, घरांना नंबर असणं ठाऊकच नव्हतं.
अशी स्थिती असली तरी तुम्हाला सगळीकडे अर्ज भरले की पत्त्यासाठी मोठा मोकळा बॉक्स ठेवलेला दिसून येतो.
मी बँकेत खातं काढायला गेलो तेव्हा तिथल्या अकाऊंट मॅनेजरला मी गंमतीत म्हटलंही. जर इथं रस्त्यांना नावं आणि घरांना नंबरच नाहीत तर मग लोकांना पत्ता विचारण्यात काय अर्थ आहे असं मी त्यांना विचारलं.
आता या प्रश्नाला उत्तर मिळेल असं वाटलं नव्हतं. ते अगदी सहजपणे म्हणाले, त्यासाठी त्या बॉक्समध्ये तुम्ही सगळ्या महत्वाच्या खाणा-खुणांसकट तुमच्या घराचा नकाशा काढू शकता.
मी माझ्या चित्रकलेचं सगळं कसब वापरून माझ्या घराचं वर्णन त्या बॉक्समध्ये केलं.
सगळं समजावण्याच्या पलिकडचं
एकदा मी गांबियातल्या कैराबा अवेन्यू या सर्वांत मोठ्या आणि मुख्य रस्त्यावर होतो. गांबियाच्या स्वांतंऱ्यलढ्यातील नेते, राष्ट्राध्यक्ष दावादा कैराबा जावारा यांच्या नावावरून त्याला हे नाव देण्यात आलं आहे. त्याच्या आजूबाजूला अनेक रस्ते जोडलेले आहेत.
त्यातल्या एका रस्त्यावरील सुपरमार्केटच्या लेबनीज वंशाच्या मालकाला मी त्या रस्त्याचं नाव विचारलं. तो म्हणाला, त्याचं दुकान गेली अनेक वर्षं तिथं आहे. 'मला कोणालातरी पत्ता सांगायचा आहे, जरा या रस्त्याचं नाव सांगाल का?' असं मी त्याला विचारलं.
तर तो म्हणाला, 'मला रस्त्याचं नाव माहिती नाही. पण तुम्ही कैराबा अवेन्यू रस्त्याजवळ पाईपलाइन मशिदीसमोरचा रस्ता असं सांगा.'
त्यामुळे दिवसभरात फोनवरच्या बोलण्यातला लोकांचा बहुतांश वेळ पत्ता सांगण्यातच जात असावा. पण इथं बरीच वर्षे किंवा आयुष्यभर राहिलेल्या लोकांना पत्ता शोधण्यात दिवसातले तास-दोन तास गेले तरी यात काहीच वावगं वाटत नाही.
मला चौकात भेटा असं सांगायचं झालं की इथं ट्रॅफिक लाइट, टर्नटेबलजवळ भेटा असं सांगावं लागतं. ते समजावून सांगताना मी कधीकधी कंटाळून माघार घेतो.
पण रस्त्यांना नावं न ठेवण्यामागे काही अंधश्रद्धा असेल असं वाटत नाही. असेल तर तो आताच्या काळातला प्रकार असावा. कारण बांजूलच्या जुन्या रस्त्यांना नावं देण्यात आलेली आहेत.
मग पार्सल पोहोचवण्यात काय अडचणी येतात?
कदाचित इथल्या बदलणाऱ्या आघाडी सरकारांना हा 'लहानसा' प्रश्न सोडवण्याची काळजी वाटत नसावी.
या प्रदेशातील इतर इंग्रजी आणि पोर्तुगीज वसाहतींमध्ये रस्त्यांना नावं आहेत. सिएरा लिओन देशाचं उदाहरण द्यायचं झालं तर इथं रस्त्यांना नावं आहेत. इथल्या रस्त्यांच्या नावानं फुटबॉलचे संघ मैदानात उतरण्याची प्रथा आहे. रस्त्याला नाव नसेल तर स्पर्धेत येऊन विजयी होणं कठिण होईल इतकं मोठं प्रस्थ आहे.
मी 1997 पासून गांबियामध्ये येत आहे. परंतु हे पत्त्यांचं कोडं सुटेल असं उत्तर निघताना आजवर मला दिसलेलं नाही.
जर पत्त्यांचा हा प्रश्न सोडवला तर किती रोजगार निर्मिती होईल याचा विचार करा. पोस्टमनला एका दिवसात अधिकाधिक पार्सल पोहोचवणं सोपं जाईल. घरांना नंबर दिले तर त्यांची विक्री करणं सोपं होईल.
या महिन्याच्या सुरूवातीला मी जेव्हा माझ्या इथल्या ऑफिसला जात होतो तेव्हा आंतरराष्ट्रीय डिलिवरी कंपनीचं ऑफिस दिसलं. तेव्हा आत जाऊन तुम्ही कसं काम करता असं विचारावसं वाटलं.
जरा जास्तंच कुतुहल वाढल्यावर मी डीएचलच्या ऑफिसला फोन करून विचारलं. तेव्हा कळलं ज्यांना पार्सल द्यायचं आहे, त्यांचं नाव आणि नंबर घेऊन ठेवलेला असतो. पार्सल कोठे पोहोचवायचं हे फोनवरून ठरवलं जातं.
कदाचित पत्रावर लिहित असावेत, 'तुमचाच, गोंधळलेला, हताश, कदाचित पेट्रोलपंपाजवळ उभा असलेला, हार्डवेअर शॉपच्या समोर, मोकळ्या कंटेनर पासून काही पावलं दूर, विमानतळाला जाणाऱ्या रस्त्यावर, जुनं यांडूम, गांबिया.'
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)