You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
24 वर्षानंतर मायावती आणि मुलायम सिंह एकाच व्यासपीठावर
तब्बल 24 वर्षानंतर बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती आणि समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव एकाच मंचावर आले. निमित्त होतं मैनपुरी मतदारसंघातील प्रचार रॅलीचं, जिथून खुद्द मुलायम सिंह यादव निवडणूक लढत आहेत.
यावेळी मंचावर मुलायम सिंह यादव, अखिलेश यादव आणि मायावती एकत्र दिसून आले. दोन्ही पक्षाचे कार्यकर्तेही या रॅलीला मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुलायम सिंह यादव म्हणाले, "आमची भाषणं तुम्ही अनेकदा ऐकली आहेत. त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही. तुम्ही मला विजयी करा. याआधीही तुम्ही मला विजयी केलं आहे. यावेळीही विजयी करा."
पुढे मुलायम यांनी म्हटलं की, "मायावतीजी आमच्यासोबत आहेत, त्यांनी आम्हाला साथ दिली मी त्यांचे उपकार कधीही विसरू शकत नाही. मला आनंद आहे की त्या आमच्यासोबत आहेत. आमच्या मतदारसंघात त्या आल्या आहेत."
यानंतर मायावती यांनी मुलायम सिंह यादव यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन केलं. त्या म्हणाल्या की "मुलायम सिंह यादव नरेंद्र मोदींसारखे बनावट मागासवर्गातले नाहीत. ते खऱ्या अर्थानं मागासवर्गीयांचे नेते आहेत."
गेस्ट हाऊस प्रकरण विसरून एकत्र
मायावती आणि मुलायम सिंह यांची नावे एकत्र आली की गेस्ट हाऊस प्रकरणाची आठवण होणं निश्चितच असतं. मायावती यांनी आपल्या भाषणामध्ये गेस्ट हाऊस प्रकरणाचा उल्लेखही केला. "हे प्रकरण विसरून एकत्र येण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. कधीकधी देशहितासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतात," असे मायावती यांनी सांगितलं.
'मोदींचा नकली मागासवर्ग'
मायावती आपल्या भाषणामध्ये पुढे म्हणाल्या, "इथले लोक मुलायम सिंह यांना आपले खरे नेते मानतात. पंतप्रधान मोदींसारखे ते नकली किंवा खोट्या मागासवर्गातील नाहीत. मोदींनी गुजरातमध्ये आपल्या जातीला मागासवर्गात समाविष्ट केलं आणि आता ते मागास जातींच्या हक्कांवर अतिक्रमण करत आहेत, हे सर्वांना माहिती आहे. नरेंद्र मोदी यांनी स्वतःला मागास म्हणवून त्याचा फायदा 2014च्या निवडणुकीत घेतला आणि अजूनही ते याचा फायदा घेत आहेत."
पण खरंच मोदींनी स्वतःची जात मागास करवून घेतली का?वाचा बीबीसीचा हा फॅक्ट चेक
ते कधीही मागासवर्गाचं भलं करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू शकत नाहीत. दलित आणि मागासवर्गीयांची लाखो पदं रिक्त आहेत, बेरोजगारी वाढत आहे. या निवडणुकीमध्ये 'असली आणि नकली' यांची ओळख होण्याची गरज आहे. तुमचं हित कोणता खरा नेता करू शकतो याची पारख तुम्ही करा. ही पारख करूनच तुम्ही अशा खऱ्या नेत्याला निवडून संसदेत पाठवा, ज्यांचा वारसा अखिलेश यादव प्रामाणिकपणे आणि निष्ठेने सांभाळत आहेत."
मायावती यांची काँग्रेसवरही टीका
मायावती यांनी यावेळेस काँग्रेसवरही उघड टीका केली, "स्वातंत्र्यापासून सत्ता काँग्रेसकडेच दीर्घकाळ राहिली आहे. त्यांच्या शासनकाळामधील चुकीच्या धोरणांमुळेच त्यांना सत्तेतून बाहेर पडावं लागलं.
त्यानंतर भाजपवर हल्ला चढवत त्या म्हणाल्या, "आता केंद्रातील भाजपासुद्धा संघाशाही, भांडवलशाही आणि सांप्रदायिकतेचा प्रसार करत आहे. यावेळेस ते नक्की सत्तेतून बाहेर जातील. या निवडणुकीमध्ये नाटकबाजी, जुमलेबाजी चालणार नाही. चौकीदारी किंवा नाटकबाजीसुद्धा चालणार नाही.
"त्यांना कोणत्याही स्थितीत यश मिळणार नाही. सर्व लहान-मोठे चौकीदार एकत्र येऊन कितीही ताकद पणाला लावली तरी त्यांना यश मिळणार नाही. अच्छे दिन येण्याचं आपलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा वापर करून लोकांचं लक्ष विचलित करून त्यांची दिशाभूल करण्याचं काम ते करत आहेत."
"केंद्रामध्ये सत्तेत आल्यावर 100 दिवसांच्या आत परदेशातून काळा पैसा भारतात आणून प्रत्येक गरिबाला 15 लाख रुपये दिले जातील, असं गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि त्यावेळेस पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहाणाऱ्या मोदींनी निवडणुकीत आश्वासन दिलं होतं. नरेंद्र मोदी भरपूर स्वप्नं दाखवतात. निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भाजपा मतांसाठी प्रलोभनांनी भरलेली आश्वासनं देतील. या आश्वासनांमध्ये तुम्ही वाहून जाऊ नका.
गरिब बेकार लोकांचं भलं काँग्रेसही करणर नाही किंवा भाजपही करणार नाही. 'आम्ही स्थिर नोकऱ्या देऊन तुमच्या समस्यांची तड लावू', भाजपाचे नेते अनेक प्रकारची चित्र-विचित्र विधाने करतात. भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्याच्या नशेमध्ये तुम्ही चूर झाला आहात, असं म्हणून त्यांनी आघाडीला दारूची उपमा दिली होती."
"निवडणुकीच्या दोन टप्प्यांमध्ये भाजपची स्थिती खराब झाली आहे. आता तुम्हाला या आघाडीला यशस्वी बनवायचं आहे. या वयातसुद्धा मुलायम यांनी मैनपुरी सोडलं नाही. जोपर्यंत श्वास सुरू आहे तोपर्यंत मैनपुरीची सेवा करत राहाणार, खराखुरा सेवक होऊन सेवा करणार, असं त्यांनी सांगितलं आहे. नरेंद्र मोदी यांच्यासारखे ते खोटे सेवक नाहीत. तुम्ही सायकलला विसरू नका. सायकल चिन्हासमोरील बटण दाबून मुलायम यांना विजयी करायचं आहे."
'आम्ही जन्मजात मागास'
अखिलेश यादव यांनी, "मुलायम सिंह यांचा विजय मोठ्या विजयांपैकी एक झाला पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली. मायावतीजीसुद्दा जेव्हा मतासांठी आवाहन करतात तेव्हा हा विजय मोठ्या विजयांपैकी एक झाला पाहिजे."
"आता नवा पंतप्रधान बसवायचा आहे, असं सांगत सपा-बसपा आघाडीनं आपल्या लोकांना दिल्लीच्या जवळ आणलं आहे," असंही अखिलेश म्हणाले.
"पाच वर्षांपूर्वी ते चहावाला बनून आले होते, आता त्यांनी कसला चहा तयार केला हे लोकांच्या लक्षात आलं आहे. आता ते चौकीदार बनून आले आहेत. आता त्यांची चौकी (ठाणं) हिसकावून घ्यायची की नाही ते तुम्हीच ठरवा. मोदी केवळ कागदोपत्री मागास आहेत, आम्ही जन्मजात मागास आहोत", असं अखिलेश यांनी सांगितलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)