You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रियंका चतुर्वेदी शिवसेनेत: 'काँग्रेसकडून मुंबईतून लढण्याची इच्छा होती, पण...'
मी पक्षासमोर उत्तर पश्चिम मुंबईत मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा खुलासा काँग्रेसमधून शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना केला.
काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून त्यांचं नाव पक्षात घेतलं जायचं, पण गेल्या काही दिवसांपासून त्या पक्षाशी नाराज होता. शुक्रवारी त्यांनी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत प्रवेश करताना काँग्रेसवरही शरसंधान साधलं.
मुंबईत मातोश्रीवर पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदी शिवेसेनेत प्रवेश करत असल्याची घोषणा केली
पक्ष कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या वाईट वागणुकमुळे आणि त्यानंतर स्त्रियांचा अपमान करणाऱ्यांना पक्षात परत घेतल्याच्या कारणावरून आपण राजीनामा देत आहोत, असं त्यांनी राजीनामा पत्रात म्हटलं आहे.
आपल्याला निवडणुकीचं तिकीट नाकारलं गेलं होतं का, असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, "मी पक्षासमोर उत्तर पश्चिम मुंबईत मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण (काँग्रेसमधून बाहेर पडण्यासाठीचा) तो एवढा मोठा मुद्दा नव्हता. मोठा मुद्दा होता तो महिलांच्या सुरक्षेचा, सन्मानाचा. पण पक्षाने माझ्या या मागणीकडे दर्लक्ष केलं. म्हणून मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
शिवसेनेकडून येत्या निवडणुकांसाठी काही ऑफर देण्यात आली आहे का, असं विचारल्यावर त्यांनी नकारार्थी उत्तर दिलं.
"शिवसेनेने माझं सन्मानपूर्वक पक्षात स्वागत केलं आहे. मी पक्षात यासाठी आले कारण हा पक्ष नेहमी मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी लढत आला आहे. लोकांनीही त्यांच्यावर भरवसा केला आहे," असं त्या बीबीसी मराठीच्या प्राजक्ता पोळ यांच्याशी बोलताना म्हणाल्या.
कोण आहेत प्रियंका चतुर्वेदी?
प्रियंका चतुर्वेदी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1979ला मुंबईमध्ये झाला. तहलका, DNA आणि फर्स्टपोस्ट साठी त्यांनी स्तंभलेखन केलं आहे.
याशिवाय त्या दोन स्वयंसेवी संस्था चालवतात. या माध्यमातून मुलांचं शिक्षण, महिला सशक्तिकरण आणि आरोग्याशी निगडित समस्यांवर त्या काम करतात. तसंच पुस्तकांचं विश्लेषण करणारा एक ब्लॉगही त्या लिहितात. हा ब्लॉग देशातल्या पहिल्या 10 ब्लॉगपैकी एक आहे.
प्रियंका याचं कुटुंब मथुरेतून मुंबईला आलं होतं. मुंबईतच त्यांनी कॉमर्सची पदवी घेतली.
राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी एका मीडिया कंपनीसाठी संचालक म्हणून काम केलं. 2010मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
का होत्या काँग्रेसवर नाराज?
गेल्या वर्षी मथुरामध्ये प्रियंका चतुर्वेदी यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्याठिकाणी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी प्रियंका चतुर्वेदी यांच्याशी गैरवर्तन करत गोंधळ घातला होता. याविरोधात प्रियंका चतुर्वेदी यांनी तक्रार केली होती. त्यानंतर जिल्हाध्यक्षांसह काही कार्यकर्त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केलं होतं.
मात्र दोन दिवसांपूर्वी अचानकपणे मथुरातील कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्यात आला. अशा नेत्यांना सामील केल्यानंतर प्रियंका चतुर्वेदी नाराज होत्या. त्यांनी ट्वीटरवरून जाहीरपणे त्याची वाच्यता केली होती.
पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या मध्यस्थीमुळे त्या कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्यात आला.
राजीनाम्यात कुणाचं नाव न घेता त्यांनी त्यांच्यासोबत झालेल्या वाईट वर्तणुकीचा उल्लेख केला. एकीकडे महिलांच्या सशक्तिकरणाठी पक्ष चर्चा करत आहे. आणि दुसरीकडं महिलांचा अवमान करणाऱ्यांना पक्षात स्थान दिलं जात आहे. या कारणांवरून मी पक्षाचा राजिनामा देत आहे, असं त्यांनी काँग्रेस पक्षाध्यक्ष यांना लिहिलेल्या राजिनाम्यात लिहिलं आहे.
यापुढंही पक्षात राहणं म्हणजे स्वत: च्या पायावर धोंडा मारुन घेतल्या सारखं आहे, त्यामुळं पक्ष सोडणं उचित आहे. असंही त्यांनी या पत्रात लिहिलं आहे.
मथुरा येथे राफेलच्या मुद्द्यावर काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्याठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्षेपार्ह व्यवहार केल्यानं त्याना निलंबित केलं होतं. पण उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रभारी ज्योतिरादित्य सिंधिया शिफारशीनंतर संबंधित कार्यकर्त्यांना परत पक्षात घेतलं जात आहे, असं यूपी काँग्रेसच्या पत्रात म्हटलं आहे.
झालेल्या मुद्द्यांवर कार्यकर्त्यांनी माफी मागितली आहेत आणि भविष्यात त्यांच्याकडून असा प्रकार होणार नाही असं त्यांच्याकडून लिहून घेतलं आहे, असं काँग्रेस पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, आपल्याला काँग्रेसमध्ये थांबवण्यासाठी राहुल गांधी किंवा वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केला नाही का? या प्रश्नाचं उत्तर देणं प्रियंका चतुर्वेदी यांनी टाळलं आहे.
काँग्रेस पक्षाकडून तिकिट मिळालं नाही, म्हणून तुम्ही पक्ष सोडत आहात का? असं विचारलं असता त्या म्हणाल्या, "पक्षाकडून तिकिट मिळावं ही माझी अपेक्षा होती. पण त्या कारणांवरून मी पक्ष सोडत नाही. पक्षात महिलांचा आदर होत नसल्यानं मी पक्ष सोडत आहोत," असं चतुर्वेदी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
तसंच मथुरेला त्यांचं येणंजाणं होतं. पण तिथून तिकिट मागितलं नसल्याचा त्यांनी खुलासा केला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)